ही श्रींची इच्छा!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/02/2026 :
काळाकुट्ट अंधार,
घुबडांचा घुत्कार,
हिंस्त्र श्वापदांचा संचार,
सर्वत्र जीवघेणी भयाण शांतता.
अचानक शिवनेरीच्या क्षितिजापलिकडून तुझी चाहुल लागलेली,
पाखरे हरहर महादेव करीत आकाशात उडालेली,
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून धिरगंभीर नाद उमटलेला.....,
'मानवतेचा राजा येतो आहे,
स्वातंत्र्य - समता - बंधुतेची ग्वाही देतो आहे!'
या मंत्राने दगड धोंड्यांनाही जाग आलेली,
घराची दारे हळूहळू उघडलेली,
तुझ्या प्रकाश किरणांची बोटे धरुन माणसे निर्भयपणे बाहेर पडलेली,
तुझ्या आगमनाने इथे आक्रित घडलेले,
जात - पात - धर्म - प्रांत सारेच भेद गळून पडलेले.
राजा,
तू आलास भवानीचा भुत्या होऊन.
डोक्यावर वासुदेवाची टोपी,
गळ्यात कवड्यांची माळ,
अन्यायाचा कर्दनकाळ होऊन तू मुहुर्तमेढ रोवलीस मानवी स्वराज्याची.
ऐषोआराम, धुंद बेधुंद मैफिली सोडून
मानवतेचा मंत्र जागवीत, जीवाला जीव देणारी माणसे जोडित तू रानोमाळ हिंडलास,
गरीबाच्या घरची मिठ भाकर खाऊन तू त्यांच्या डोळ्यातले अश्रु पुसलेस.
आणि तुला गोब्राह्मण प्रतिपालक बनऊ पाहणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून तू 'गोरगरिबांचा' प्रतिपालक झालास.
रानोमाळ हिंडणाऱ्या छाव्यांना तू एका सुत्रात बांधलेस आणि..........,
शेकडो जीवा तुझ्यासाठी जीव द्यायला तयार झाले,
हजारो मावळे तुझ्या रक्षणासाठी खिंड अडवून उभे ठाकले,
लाखो मुरारबाजी आपल्या प्राणांची बाजी लावून मोकळे झाले.
एवढं मोठं राज्य उभं केलस तू!
पण धर्मांधांनी देवळाची कळसे कापल्यावरही तू कधी वाकड्या नजरेने कुठल्या मशिदीकडे पाहिलं नाहिस.
अरे, तुझ्यावेळी बाबरी मशीद नव्हतीच काय?
आज हिंदू - मुसलमानांचे दंगे होताना मला आठवतं.........,
तुझ्या राज्यासाठी खांद्याला खांदा भिडऊन लढणारे हिरवे आणि भगवे.
त्यांना त्यावेळी आठवलाच नाही का.........
आपला धर्म, आपला रंग, आपली परंपरा?
की तू त्यांना एखादं वेगळच स्वप्न सांगीतलं होतस,
की जे ऐकताच त्यांनी आपला धर्म, आपला रंग, आपली परंपरा झुगारुन तुझ्या चरणाशी आपलं सर्वस्व अर्पण करावं?
राजा,
मला कधी कधी तुझं खरच नवल वाटतं की,
त्या धर्मवेड्या आलमगीराने तिकडे अल्ला हु अकबरची बांग देताच,
तू इकडे महाआरती का सुरु केली नाहीस ते.
आज तुझं नाव घेत कुणी पोचिराम, कुणी चंदर, तर कुणी अंबादास दगडाने ठेचून खतम केला जातोय,
कल्याणच्या सुभेदाराची सुन सन्मानाने परत करणारा तू,
आज तुझ्या नावाचा वारसा सांगणारे स्त्रियांना जाहिरपणे अचकट विचकट शिव्या घालताहेत,
एकविसाव्या शतकात तुला धर्ममार्तंडांचा म्होरक्या बनवलं जातय आणि.......
हेतुपुरस्सर तुझ्या मावळ्यांना जातीभेदाच्या अन् धर्मवादाच्या चक्रव्युहात अडकवलं जातय.
जाणून बुजून तुझ्या स्वप्नांना तडा देण्याचा प्रयत्न केला जातोय.
पण राजा, मला विश्वास आहे.
तुझी तपश्चर्या फोल जाणार नाही.
आज ना उद्या तुझ्या मावळ्यांना जाग येईल,
अठरा पगड जाती एकत्र येतील,
धर्मभेद गळून पडतील.
एकमेकाची प्रार्थनास्थळे उध्वस्त करणारे एकमेकाच्या ऱ्हदयस्थळाशी एकरुप होतील.
पुन्हा मानवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली जाईल,
तानाजी कोंढाण्यावर चालून जाईल,
हरेक मावळा खिंड अडवून उभा राहिल,
गद्दारांच्या अवलादींचा कडेलोट केला जाईल,
नाक्यानाक्यावर वडापाव विकणारे 'हर हर महादेव' करीत मानवतेच्या शत्रुसंगे झुंज देतील,
आणि मग पुन्हा तुझ्या स्वप्नातलं........
शोषितांचं, पिडितांचं, श्रमिकांचं राज्य निर्माण होईल.
तो दिवस दुर नाही राजा,
तेंव्हा तू सुध्दा शिवाजी पार्कच्या घोड्यावरुन पुटपुटशील............,
"ही तर श्रीं ची इच्छा!,
ही तर श्रीं ची इच्छा!"
- विवेक मोरे
कुळवाडी भुषण शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

0 टिप्पण्या