💢 प्रीतिसंगमावरून
🔰 चव्हाण साहेबांच्या विचारछायेत कराडचा नवा अध्याय
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/02/2026 :
कराडची ओळख ही केवळ नकाशावरच्या एका शहराची नाही; ती विचारांची, नेतृत्वाची आणि संस्कारांची परंपरा जपणारी भूमी आहे. या भूमीने महाराष्ट्राला दिलेले सर्वात मोठे दान म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. चव्हाण साहेबांनी कराडला ज्या उंचीवर नेऊन ठेवले, ती उंची आजही राज्याच्या राजकारणात मानदंड मानली जाते. कराड आणि चव्हाण साहेब यांचे नाते हे केवळ जन्मभूमीचे नाही; ते जडणघडणीचे, विचारांचे आणि अभिमानाचे आहे.
त्यांचे बालपण कराडच्या मातीत रुजले, शिक्षण याच परिसरात झाले. मातृसत्ताक कुटुंबातील संस्कारांमधून नेतृत्व, जिद्द आणि सामाजिक बांधिलकी यांचा पाया मजबूत झाला. पुढे मुंबईतून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी प्रवेश केला. राज्याच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्थैर्य आणि विकासाचा पाया घातला. केंद्रात गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून जबाबदार्या सांभाळताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीपर्यंत झेपावणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व हे महाराष्ट्रासाठी अभिमानाचे शिखर होते, आणि तो नेता कराडचा होता, ही कराडकरांसाठी असामान्य गौरवाची बाब आहे.
25 नोव्हेंबर 1984 साली त्यांच्या निधनानंतर कराडने आपल्या या सुपुत्राला कृतज्ञतेची आदरांजली अर्पण केली. कृष्णा नदीकाठी ‘स्वामींची बाग’ म्हणून ओळखल्या जाणार्या परिसरात तत्कालीन नगराध्यक्ष पी.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारलेली समाधी ही केवळ वास्तू नाही, तर लोकसहभागातून साकारलेले स्मारक आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आपल्या शेअर्समधून निधी दिला; व्यापार्यांनी आणि दानशूरांनी उदार हात दिला. कोल्हापूरचे आर्किटेक्ट बेरी यांनी केलेली रचना आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झालेले उद्घाटन, या सर्व घटनांनी समाधीस्थळाला ऐतिहासिक परिमाण दिले. तेव्हापासून 25 नोव्हेंबरला राज्यातील मुख्यमंत्री येथे येऊन अभिवादन करण्याची परंपरा निर्माण झाली. ही केवळ औपचारिकता नाही; ती मूल्यांना वंदन करण्याची परंपरा आहे.
याच परंपरेचा अर्थ समजून घेत कराड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी शुक्रवारी आपल्या कारकीर्दीतील पहिली विशेष बजेट सभा या समाधी परिसरात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाकडे केवळ प्रतिकात्मक कृती म्हणून पाहता येणार नाही. शहराच्या भविष्यास दिशा देणार्या बजेट सभेची सुरुवात प्रेरणास्थानी उभे राहून करणे, हा संदेश अधिक व्यापक आहे. विकासाचा आराखडा आखताना मूल्यांची आठवण ठेवणे, सत्ता ही अधिकारापेक्षा जबाबदारी आहे हे मान्य करणे, हीच या कृतीची खरी भूमिका आहे.
कराडकरांच्या मनात आजही एक दृढ भावना आहे की कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करून केली, तर त्या कार्याला नैतिक बळ आणि लोकमान्यता लाभते. ही श्रद्धा अंधविश्वास नाही; ती इतिहासाने घडवलेली आहे. कारण चव्हाण साहेबांचे जीवन हे संयम, सर्वसमावेशकता आणि लोकहिताच्या तत्त्वांचे उदाहरण आहे.
आजची बजेट सभा म्हणूनच केवळ आर्थिक तरतुदींची चर्चा नाही. ती कराडच्या विकासाच्या नव्या पर्वाची घोषणा आहे. समाधीस्थळी घेतलेला हा निर्णय कराडच्या राजकारणाला नवे भान देणारा ठरू शकतो. इतिहासाच्या साक्षीने, मूल्यांच्या छायेत आणि लोकांच्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय अधिक जबाबदारीची जाणीव करून देतात.
कराडचा अभिमान असलेल्या त्या महापुरुषाच्या स्मृतीपुढे उभे राहून शहराच्या भविष्यास आकार देण्याची ही वेळ आहे. आणि कदाचित म्हणूनच, कराडच्या नव्या विकासयुगाची सुरुवात त्या पवित्र भूमीतून होत आहे, जिथे इतिहास, श्रद्धा आणि नेतृत्व यांचा संगम आहे.
कराडच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असताना एक महत्त्वाची अपेक्षा शहरवासीयांच्या मनात स्पष्टपणे उमटताना दिसते. नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गाने चालण्याचा इरादा जाहीरपणे व्यक्त केला होता. त्यांच्या आघाडीचे नावही यशवंत असे ठेवण्यात आले, ही केवळ राजकीय रणनीती नव्हे, तर एका परंपरेचा मान राखण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कराडकरांच्या भक्कम पाठिंब्यावर मोठ्या मताधिक्याने निवडून येणे आणि नगरपालिकेत 21 नगरसेवकांचा पाठिंबा मिळणे, ही राजकीय स्थैर्याची चिन्हे आहेत. या संख्याबळामुळे प्रशासन चालवताना तांत्रिक अडचणी येणार नाहीत, हे स्पष्ट आहे. परंतु केवळ बहुमत असणे म्हणजे यशाची हमी नसते; खरा कस असतो तो नेतृत्वशैलीचा.
चव्हाण साहेबांचा आदर्श केवळ पदांपुरता नव्हता. त्यांनी विरोधकांनाही सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची परंपरा निर्माण केली. संयम, संवाद आणि सर्वसमावेशकता ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. म्हणूनच त्यांच्या नावाचा उच्चार करताना जबाबदारीची उंचीही तितकीच वाढते.
आज राजेंद्रसिंह यादव यांच्यासमोर संधी आहे, बहुमताच्या बळावर निर्णय घेण्याची नाही, तर सर्वपक्षीय समन्वयातून विकासाची दिशा ठरवण्याची. कराडचा विकास हा केवळ एका आघाडीचा अजेंडा नसून संपूर्ण शहराची सामूहिक जबाबदारी आहे. चव्हाण साहेबांच्या मार्गाने चालायचे असेल, तर मतभेदांवर संवादाचा पूल बांधावा लागेल, टीकेला संयमाने सामोरे जावे लागेल आणि प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागेल.
‘यशवंत’ या नावाला खरा अर्थ तेव्हाच येईल, जेव्हा प्रशासनात पारदर्शकता, निर्णयांत सर्वसमावेशकता आणि कार्यात सातत्य दिसेल. बहुमताच्या जोरावर सत्ता टिकवता येते; परंतु विश्वासाच्या बळावर इतिहास घडवता येतो.
कराडकरांची अपेक्षा स्पष्ट आहे, चव्हाण साहेबांचा आदर्श केवळ भाषणात नव्हे, तर कृतीत उतरावा. सर्वांना बरोबरीने घेऊन, शहराच्या हिताला प्राधान्य देत काम केले तरच या नव्या नेतृत्वाला खर्या अर्थाने यशवंत म्हणता येईल.साभार पुढारी.
सतीश मोरे, कराड
९८८११९१३०२

0 टिप्पण्या