"समाज मनाचा आरसा असणारे पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतात"- डॉ. एम. के. इनामदार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/02/2026 :
समाज मनाचा आरसा असणारे पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतात. पत्रकार बंधूंनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. “शरीर माध्यम खलू धर्म साधनम्” या ब्रीदवाक्यानुसार निरोगी शरीर हेच सर्व साधनांचे माध्यम आहे, असे मत अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी व्यक्त केले.
अश्विनी हॉस्पिटल आणि माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात डॉ. इनामदार यांनी पत्रकारांना निरोगी जीवनाचा कानमंत्र देताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, “पूर्वी हृदयविकार साठीनंतर आढळत असे; मात्र सध्या २५–३० वर्षांचे तरुणही या आजाराचे बळी पडताना दिसत आहेत. बदललेली जीवनशैली, दूषित अन्न-पाणी आणि नकारात्मक विचारसरणी ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. आजाराचे वेळेवर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे.”
कोविड लसीमुळे हृदयविकार वाढल्याची चर्चा सध्या होत असली, तरी लस आणि हृदयविकार यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाढता कर्करोग ही गंभीर समस्या असून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि विविध कीटकनाशके ही त्याची मुळे आहेत. नागरिकांनी शक्य असल्यास स्वतःच्या परसबागेत गरजेपुरता भाजीपाला पिकवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
या तपासणी शिबिरासाठी हॉस्पिटलमधील शैलेश कुलकर्णी, कोंडाजी (कुमार) महादेव म्हावरकर, विनोद प्रल्हाद देवकुळे, प्रतीक्षा ज्ञानदेव खिलारे, वैभव नरेंद्र खैरमोडे, विकास साठे, मयुरी गणेश काटे, राहुल दिलीप बोडगे, संभाजी शिवाजी पाटोळे, साजिद रशीद शेख, रोहित सुरेश इंगळे, जयसिंग वामन थोरात व दिलीप नामदेव नवगन इत्यादींचे सहकार्य लाभले. यावेळी मुद्रित माध्यमे, विविध समाजमाध्यमे तसेच यूट्यूब पोर्टलचे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांना मानाचा फेटा शाल पुष्पहार गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी पत्रकारांच्या हस्ते अश्विनी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.


0 टिप्पण्या