व्हेटर्नरी डॉक्टर चैताली अव्हाड
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 01/02/2026 : केडगाव सरकारी पशु वैद्यकीय दवाखाना येथील व्हेटर्नरी डॉक्टर चैताली अव्हाड यांची भेटी संदर्भातील एक आठवण येथे मांडत आहे.
आमच्या सोनूची (म्हणजे डॉगीची) एक सर्जरी झाली. खरं तर डॉगीची सर्जरी करून घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ज्या डॉक्टरांनी ही सर्जरी केली त्या एक लेडी डॉक्टर होत्या. खरं सांगायचं तर त्या माझ्या परिचयाच्या नव्हत्या आणि प्रत्यक्ष भेटही झाली नव्हती, त्यामुळे मनात थोडी शंका होती. साहजिकच फोनवर आणि मेसेजद्वारे मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांनीही अत्यंत संयमाने आणि अचूक उत्तरे दिली, तरीही मनात प्रश्न घेऊनच मी आज सोनूला सर्जरीसाठी घेऊन गेले.
त्यांच्यासोबत आणखी एक मदतीला ओळखीचे डॉक्टरही होते.डॉ.नवनाथ अडसुळ त्यांनी ही खुप छान सगळे समजाऊन सांगीतले. जेव्हा मी डॉक्टर चैताली यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि भेटले, तेव्हा माझ्या मनातील सगळ्या शंका आपोआप दूर झाल्या. त्यांनी सर्जरी अतिशय काळजीपूर्वक, शांतपणे आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने केली. सर्जरीनंतर सोनूची कशी काळजी घ्यायची हेही त्यांनी सविस्तर समजावून सांगितलं.
आज मला मनापासून जाणवलं की ज्या स्त्रीला प्राण्यांविषयी खऱ्या अर्थाने दया, माया आणि प्रेम असतं, तीच स्त्री उत्तम व्हेटर्नरी डॉक्टर आणि सर्जन बनू शकते. मी त्यांच्याकडे अभिमानाने पाहतच राहिले. मनात लगेच आलं – किती महान असतात ती माणसं, जी प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात.
तीन तास मी तिथेच होते. डॉक्टर चैताली यांचं काम पाहत निरीक्षण करत होते. किती साध्या, सिंपल स्वभावाच्या, उंचीने लहान पण कर्तृत्वाने महान! दवाखान्याच्या विकासासाठी हक्काने लढणाऱ्या, पेशंट प्राणी असले तरी त्यांना प्रेमाने तपासणाऱ्या, कोणताही द्वेष न ठेवता व्यवस्थित ट्रीटमेंट देणाऱ्या – खरंच त्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. सरकारी सेवेतही प्रामाणिक, समर्पित आणि प्रेरणादायी व्यक्ती असतात. साध्या परिस्थितीतही उत्तम सेवा देता येते, हे त्यांनी सिद्ध केलं.
संशयापेक्षा विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. सुरुवातीचा संभ्रम प्रत्यक्ष अनुभवाने दूर होतो हे शिकता आले .
©️सौ.धनश्री म्हेत्रस पुणे

0 टिप्पण्या