स्वातंत्र्य मिळालं… पण गुलामगिरी संपली का?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : भाग्यवंत ल. नायकुडे,
अकलूज दिनांक 14/02/2026 : स्वातंत्र्य मिळालं… पण गुलामगिरी संपली का? कोण म्हणाले की आपण स्वतंत्र झालो?फक्त सत्तेचा रंग बदलला एवढंच. काल परकीय शासक होते, आज स्वदेशी राज्यकर्ते आहेत. काल गोरे साहेब होते, आज पांढरे कुर्ते घालणारे नेते आहेत. फरक एवढाच—ते आपल्यावर थेट अन्याय करत होते, हे आपल्यालाच भावनिक गुलाम बनवून लुटत आहेत.
ब्रिटिशांनी देशाला गरिबी दिली, हे मान्य.
पण आजच्या नेत्यांनी गरिबांना काय दिलं?
सहानुभूती. भाषणं. घोषणा. आश्वासनं.
आणि निवडणुकीपुरती आठवण.
ब्रिटिशांनी कधीच असं सांगितलं नाही की,
“आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचं आयुष्य बदलू.”
ते सरळ लुटत होते.
आजचे नेते मात्र आधी स्वप्न दाखवतात…
आणि नंतर स्वप्न पाहणाऱ्यालाच दोष देतात.
लोकशाही की लोकांची फसवणूक?
आज आपण लोकशाहीत आहोत असं सांगितलं जातं.
पण खरी लोकशाही असती, तर
पिण्याच्या पाण्यामुळे लोक मरले नसते.
उपचाराअभावी मुलांचे प्राण गेले नसते.
शेतकरी आत्महत्या करत नसते.
तरुण हातात पदवी घेऊन रस्त्यावर फिरत नसते.
देशातील विधानसभेत आणि लोकसभेत बसलेल्या सुमारे ७० टक्के नेत्यांकडे राजकारणात येताना काहीच नव्हतं.
आज मात्र त्यांच्याकडे
अब्जावधी रुपयांची मालमत्ता आहे,
परदेशात बंगल्यांची रांग आहे,
त्यांची मुलं लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत.
आणि तुम्ही?
तुमचं घर तिथेच आहे.
तुमचं उत्पन्न तिथेच आहे.
तुमचं आयुष्य तिथेच अडकलेलं आहे.
हा विकास कोणाचा झाला?
सत्ता : एकमेव जात, पैसा : एकमेव धर्म आपल्याला शिकवलं गेलं—
जात पाहून मत द्या.
धर्म पाहून मत द्या.
पक्ष पाहून मत द्या.
पण सत्य असं आहे की
त्या नेत्याची एकमेव जात म्हणजे सत्ता
आणि एकमेव धर्म म्हणजे पैसा.
निवडणुकीच्या आधी ते तुमच्या दारात येतात. निवडणुकीनंतर तुम्ही त्यांच्या दारात गेलात, तर गेटवरचा सुरक्षारक्षकही आत जाऊ देत नाही.
ते तुमच्या दुःखावर भाषण करतात,
पण तुमच्या दुःखात उभे राहत नाहीत.
गरीब अधिक गरीब, नेते अधिक श्रीमंत—हा योगायोग नाही
नेते म्हणतात,
“देश प्रगती करत आहे.”
होय, देश प्रगती करत आहे…
पण त्या प्रगतीचा रस्ता
तुमच्या घरासमोरून जात नाही.
जसं-जसं नेते श्रीमंत होतात,
तसं-तसं गरीब अधिक गरीब होत जातो.
कारण व्यवस्था अशी आहे की
गरिबासाठी योजना असतात,
पण अंमलबजावणी नसते.
फाईल्स फिरतात,
कमिशन वाढतं,
आणि गरिबाच्या हातात फक्त कागद राहतो.
आरोग्य, शिक्षण आणि पाणी—तीन मूलभूत हक्क, तीन मोठी अपयश
आजही या देशात
लोक दूषित पाणी पिऊन मरत आहेत.
आजही सरकारी रुग्णालयात बेड नाही, डॉक्टर नाहीत, औषध नाही.
आजही शिक्षण हे हक्कापेक्षा व्यवसाय बनलं आहे.
नेत्यांची मुलं खासगी शाळांत, परदेशात शिकतात.
त्यांना सरकारी शाळेत बसायची वेळ येत नाही.
म्हणूनच सरकारी शाळांची अवस्था अशी आहे.
नेत्यांना सरकारी रुग्णालयात जावं लागत नाही.
म्हणूनच तिथे माणसांपेक्षा उंदीर जास्त आहेत.
प्रश्न विचारणं गुन्हा कधीपासून झालं?
आज जो प्रश्न विचारतो,
तो देशद्रोही ठरवला जातो.
जो अन्याय दाखवतो,
तो विरोधकांचा एजंट ठरतो.
जो सत्य बोलतो,
तो गप्प केला जातो.
लोकशाहीत प्रश्न विचारणं हा हक्क असतो.
पण आज प्रश्न विचारणं धाडस झालं आहे.
खरा दोष कुणाचा?
संपूर्ण दोष फक्त नेत्यांचा नाही.
थोडा दोष आपलाही आहे.
आपण भावनांवर मत देतो.
आपण घोषणा ऐकतो, काम पाहत नाही.
आपण जात पाहतो, प्रामाणिकपणा पाहत नाही.
निवडणुकीच्या दिवशी
दारू, पैशाला विकलेलं मत
पाच वर्षांच्या दुर्दशेची पावती असते.
स्वातंत्र्य अजून अपूर्ण आहे
स्वातंत्र्य म्हणजे फक्त झेंडा फडकवणं नाही.
स्वातंत्र्य म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद.
स्वातंत्र्य म्हणजे हक्क मिळवण्याची जिद्द.
स्वातंत्र्य म्हणजे नेत्यांना घाबरवणारा जागरूक नागरिक.
जोपर्यंत
नेते जनतेपेक्षा मोठे राहतील,
तोपर्यंत देश छोटाच राहणार.
जोपर्यंत
आपण बदलाची जबाबदारी फक्त भाषणांवर सोडू,
तोपर्यंत बदल कधीच होणार नाही.
ब्रिटिश गेले…
पण लुट थांबली का?
जर उत्तर “नाही” असेल,
तर समजा—
स्वातंत्र्य अजून फक्त कागदावरच आहे.
✍️ निलेश सुमन प्रभाकर ठाकरे
राष्ट्रीय संघटक, नगीनाबाग, चंद्रपूर
8668935154

0 टिप्पण्या