निशब्द! जन्मताच आईनं सोडलं, खेळण्यातील बाहुलीत 'त्यानं' माय शोधली

 

निशब्द! जन्मताच आईनं सोडलं, खेळण्यातील बाहुलीत 'त्यानं'  माय शोधली

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 23/02/2026 :

आईपासून मुलं कधीही वेगळी होऊ शकत नाहीत. मग मुले कितीही मोठी असली आणि आईपासून कितीही लांब राहत असली तरी आईच्या प्रेमापासून ती दूर जात नाहीत. मुलं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या आईच्या मायेला शोधत असतात. आईच्या कुशीत मिळालेली ऊब कायम आठवणीत राहते. या सगळ्या भावना माणसांमध्येच असतात असं नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे डोळे नकळत पाण्याने ओले होत आहेत. ही कहाणी आहे बेबी मंकीची..

टबॉलीवूड सिनेमातील एक फेमस डायलॉग सगळ्यांना आठवत असेल, मेरे पास माँ है...जगातील सर्व सुख एकीकडे आणि आईचं आपल्या आयुष्यात असणं हेच सगळ्यांवर भारी पडते. जपानमधील बेबी मंकीच्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात अनेकांना भावूक केले आहे. जपानच्या इचिकावा शहरातील प्राणी संग्रहालयातील हा व्हिडिओ आहे. २६ जुलै २०२५ रोजी याठिकाणी जन्मलेला एका चिमुकला माकड सध्या जगात ट्रेंडमध्ये आहे. या बेबी मंकीने जन्म घेताच त्याच्या आईने त्याला दूर केले. तेव्हापासून या माकडाचा प्रवास एकटेपणात सुरू झाला. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा सांभाळ केला. त्याला खायला प्यायला दिले आणि प्रेमाने त्याचे नाव पंच ठेवले.

पंच मोठा झाला तसं त्याने त्याच्या आईकडे आणि इतर माकडांकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी त्याला झिडकारण्यात आले. इतर माकडांपासून तो घाबरून पळू लागला. पंचचा एकटेपणा दूर करण्यासाठी प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्याने त्याला खेळण्यातील माकड आणून दिले. पंचसाठी हे खेळणे नव्हते तर त्यात तो त्याची आई शोधू लागला. या खेळण्याने त्याला मायेची ऊब मिळत होती. या खेळण्यातून त्याला सुरक्षा मिळत होती. पंचचा हा व्हिडिओ एका कर्मचाऱ्याने शूट केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. बेबी पंच त्याच्या सॉफ्ट टॉयला घेऊन मिठी मारत होता, त्याला आपल्यासोबत घेऊन जात होता. हा व्हिडिओ पाहून आईच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बेबी पंचची कहाणी व्हायरल झाली.

या व्हिडिओतून लोक पंचमधील एकटेपणा, बालपण आणि आपल्या गरजा पाहू लागले. काही जण या माकडाला आपल्यासोबत घेण्याची इच्छा व्यक्त करू लागले. सोशल मीडियात पंचचे फोटो आणि व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. जपानी माकडे कायम टोळीत राहतात. जेव्हा पंचचा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन ५०० ग्राम होते. भीषण गरमीमुळे प्रसुती वेदनेने थकलेल्या आईने त्याच्याकडे फार लक्ष दिले नाही. समुहातील इतर मादी माकडांनीही पंचला जवळ केले नाही. त्यामुळे जन्माच्या दुसऱ्या दिवशीपासून प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला बॉटलने दूध पाजणे सुरू केले. कर्मचाऱ्यांनी पंचसमोर चादर आणि खेळणी ठेवली. त्यातील ओरांगुटान टॉय पंचला खूप आवडला. हा टॉय पंचच्या आयुष्यातील त्याची आई बनली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या