विधाता ! मृत्यू हो ऐसी !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/01/2026 : मृत्यू ही एक अढळ नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो येणारच. मृत्यू हा शांत, वेदनामुक्त, समाधानी, खंत विरहित असावा. याला आध्यात्मिक दृष्ट्या उत्तम मरण मानले जाते. ईश्वराचे स्मरण करुन मृत्यू यावा. भगवत्गीता म्हणते की, आत्मा कधीच जन्मत नाही किंवा मरत नाही. मृत्यूला जीवनाचा आरंभ मानते. आत्मा जुने कपडे बदलून नवीन कपडे परिधान करतो तसेच शरीर बदलतो. मृत्यूला भीतीने नव्हे तर आध्यात्मिक समर्पणाने स्विकारले पाहिजे. ध्यान, योग आणि प्रार्थना यामुळे मृत्यूची भीती कमी होते. सत्कर्म, साधना आणि आत्मज्ञान यांच्या साहाय्याने मृत्यूनंतर आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सदुपयोग केल्यास मृत्यूला आनंदाने सामोरे जाता येते.
विधाता ! मृत्यू हो ऐसी, हजारो लोग रोते हो |
सफल हो जिंदगी सबकी, कीर्ती घरघर में गाते हो ||टेक||
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन मृत्यूचे स्वरुप कसे असावे यावर आधारित आहे. हे ईश्वरा, असा मृत्यू येवो की हजारो लोक तुमच्यासाठी रडतील. तुमचे जीवन सत्यावर आधारित होते म्हणून तुमच्या मृत्यूनंतरही प्रत्येक घरात तुमची कीर्ती गायली जाईल. जिथे मृत्यू भाग्यवान असतो तिथेच लोक रडतात. "मरावे परि कीर्ती रुपे उरावे" मनुष्य नश्वर असला तरी त्याने आपल्या आयुष्यात चांगली कामे करून अमर व्हावे. यातून निस्वार्थ कार्य, सद्गुणांचा वारसा आणि मरणोत्तर स्मरणात राहावे. जीवनात असे कार्य करावे की मृत्यूनंतरही लोक तुमची आठवण ठेवतील.
किया हो काम गरीबों का, दुआ सबसे बडी उनकी |
मिला हो प्रेम सेवा का, प्रेमी दिल मनसे भाते हो ||1||
ज्या व्यक्तीने गोरगरीबांची सेवा केली, ज्यांना त्यांची प्रार्थना (दुआ) मिळाली. ज्याला सेवेतूनच प्रेम मिळाले असे प्रेमळ लोकच मनाला भावतात.
कहे जनता न मरने दो, उसी मरने में हासिल है |
जरा भी दुःख ना दिलपर, यही अचरज की बाते हो ||2||
जेव्हा जनता म्हणते की, त्यांना मरु देऊ नका. तेव्हा त्या मरण्यातच मोठे यश आहे. अशा व्यक्तीच्या मृत्यने मनाला जराही दुःख होत नाही. हेच आश्चर्यकारक आहे. राष्ट्रसंत म्हणतात, "मरना हकका बाना है" जीवनाचा अंत निश्चित आहे. हे मानवी जीवनाचे शाश्वत सत्य आहे. मरणाला घाबरु नये.
सभी तन-मन है सेवा का, धर्म का, देश-भक्ती का |
कृपा गुरुदेव की उनपर, काल देखे लजाते हो ||3||
ज्या व्यक्तीचे तन, मन (शरीर, मन) सेवा, धर्म आणि देशभक्ती समर्पित आहे, त्यांच्यावर गुरुदेवांची कृपा असते, त्यामुळे मृत्यूची देवता (काल) सुद्धा त्यांना पाहून लाजते.
मातृ-भू चाहती उसकी, अस्थिया गोद धरने को |
देवता पुष्प की वर्षा, डालकर रथी सजाते हो ||4||
मातृभूमी म्हणजे आपली भारतमाता अशा वीरांची अस्थी आपल्या कुशीत (गोद) घेण्यासाठी आसुरलेली असते. जशी लहान बालकाला आई पोटाशी धरते. अशा वीरांच्या रथावर देवता फुलांचा वर्षाव करुन तो सजवितात.
राजसत्ता मिले सारी, कदर करने को मृत्यू की |
अरे, यह क्या हुआ ऐसा, आँखोमें नीर लाते हो ||5||
सर्व राजसत्ता मिळूनही, अशा मृत्यूची किंमत कळत नाही. अरे असे काय झाले की तुमच्या डोळ्यात पाणी येते.
वह तुकड्यादास कहता है, भाग्य है ऐसे मरनेका |
अमर हो नाम भारत में, शत्रू झुककर नमते हो ||6||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, असा मृत्यू येणे हेच भाग्य आहे. अशा व्यक्तीचे नाव भारतात अमर होते आणि शत्रूही नतमस्तक होतात.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9970404180


0 टिप्पण्या