सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार

सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 25/12/2025 : स्त्रिया शिकणार ही कल्पनाच मुळी समाज बाह्य होती. स्त्रियांमधील हा बदल विकसनशील आणि महत्वाचा होता. स्त्री शिकली तरच सारे कुटुंब शिकेल, प्रगती होईल हा विचार समाजात रुजणे खूप महत्वाचे होते. हे जाणून ज्योतीबांनी सावित्रीबाईंना शिकविण्यास सुरवात केली. संपूर्ण स्त्री जातीलाच शिक्षणाचा तेजस्वी मार्ग दाखवू या विचारानेच ज्योतीबा सावित्रीला शिकवू लागले. सावित्री सुध्दा मोठ्या आवडीने शिकू लागली. रोज दुपारी मळ्यात जेवण झाले की, आंब्याच्या झाडाखाली ज्योतीबांनी शाळा सुरु होई. सावित्रीबाई विद्यार्थी आणि जोतिराव शिक्षक. जमीन स्वच्छ करून जमिनीवर धुळपाटी तयार केली जाई व या धुळपाटीवर बोटांनी किंवा झाडाच्या काटकीने अक्षरे काढून शिकवायला सुरवात झाली. पाटी नाही, पेन्सिल नाही, खडू नाही, फळा नाही, कागद नाही, पेन नाही म्हणून शिक्षण अडले नाही.

जिच्या हाती पाळण्याची दोरी |

तिच जगाते उद्धारी |

ऐसी वर्णिली मातेची थोरी |

शेकडो गुरुहुनिही ||

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणजे "आई" तिच जगाचा उद्धार करु शकते कारण ती शंभर गुरुपेक्षाही महान आहे. आईची महती वर्णावी तेवढी कमी आहे. मुलींना शिक्षण देऊन नवचैतन्य जागं करणारी सावित्रीबाई ही एक माताच आहे. त्यांची बरोबरी जगातला कुठलाच पुरुष करु शकत नाही. सावित्रीबाई व ज्योतिबांचा एकच ध्यास होता की, सुशिक्षित माता घडविण्याचा. सावित्री एक एक अक्षर शिकू लागली, स्मरणात ठेवू लागली. सावित्री ही शिक्षण घेत आहे हे समाजातील लोकांना समजले, तेव्हा सगळेजण त्यांची अवहेलना करु लागले. निंदा करु लागले. या निंदेला ती तिळमात्र घाबरली नाही. तीने आपले शिक्षण व शिक्षिकेचे ट्रेनिंग पूर्ण केले.

          ज्योतिबा व सावित्रीबाईंना शिक्षणाचे महत्व कळले. स्त्री शिक्षणाची त्यांना धडपड लागली. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होणार नाही हे त्यांना समजले होते. आपल्या समाजाची ही दैन्यावस्था ही शिक्षण न घेतल्यामुळे झाली आहे हे त्यांनी जाणले. "विद्या हेच धन"  विद्येनेच माणुसपण येते. 1 जानेवारी 1948 रोजी बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु झाली. स्त्रीयांच्या प्रगतीसाठी सावित्रीबाईंनी पहिलं पाऊल उचललं. या कार्यात त्यांना सगुणाबाई व तात्यासाहेब भिडे यांनी खूप मदत केली. सुरुवातीला फक्त 6 मुली आल्या. सुरुवातीला शाळेत येण्यास कुणीच तयार होईना. मुलींनी शिकणे ही कल्पनाच लोकांना मान्य नव्हती. मग सावित्रीबाई घरोघरी जावून पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊ लागल्या. स्वतः सावित्रीबाई या मुलींना शिकवू लागल्या कारण पुरुषाने मुलींना शिकवणे ही कल्पनाच समाजाला मान्य नव्हती. सावित्रीबाई स्वतः शिक्षिका तर झाल्याच पण शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणूनही काम करु लागल्या. फातिमा शेख ह्या सहशिक्षिका होत्या. सावित्रीबाईचे हे कार्य सर्वांर्थाने महान आहे. महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. लोकांना स्त्रियांकरिता शाळा हा विचारच सहन झाला नाही. धर्म बुडाला म्हणून ओरड सुरु झाली. सनातणन्यांचा संताप शिगेला पोहचला. सावित्रीबाईंना त्रास देवून त्यांचे हे कार्य बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. सावित्रीबाई रस्त्याने जात असताना अंगावर शेणाचा मारा करीत, चिखल फेकत, खडे मारत, अचकट विचकट बोलत, निंदा नालस्ती करीत असे. अशा अनेक अडथळ्यांना त्यांनी भिक घातली नाही. त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाई सोबतच्या पिशवीत एक साडी ठेवत व शाळेत गेल्यावर खराब झालेली साडी काढून चांगली साडी घालत व मुलींना शिकवित असत. पुढे त्यांनी 18 मुलींच्या शाळा सुरु केल्या.

         हळूहळू मुलींची संख्या वाढू लागली परंतु काही सनातनी, कर्मठ लोक शाळेत जाणाऱ्या मुलींनाही रस्त्याने जाता येताना त्रास देत असत. तेव्हा या मुलीचे आईवडील वैतागुन व घाबरुन आपल्या मुलींना शाळेत पाठवत नसत. अशावेळी सावित्रीबाई मुलींच्या आईवडीलांना नीट समजावून सांगत. रोज सावित्रीबाई मुलींना सोबत घेऊन शाळेत जात असत.

यास पाहिजे आता वळविले |

ठिकठिकाणी शिक्षण दिले |

मुली-महिलांचे जीवन जगविले |

तरीच जगेल गावराज्य ||

         सावित्रीबाई फुले यांनी रुढीला वळण दिले. जागोजागी शिक्षणाची व्यवस्था करुन मुलीचे व महिलांचे जीवन उज्वल करुन त्यांना जागृत केले. म्हणूनच शिक्षणामुळे महिलांची प्रगती झाली आहे. त्यामुळे गावोगावी गावाच राज्य जगेल. आधुनिक स्त्रीच्या प्रगतीचा पाया सावित्रीबाईनी घातला असून स्त्रियांच्या पायातील अज्ञानरुपी गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याची ही सुरुवात होती. आजची स्त्री सर्व क्षेत्रात अग्रक्रमाने पुढे येत आहे. याचे श्रेय सावित्रीबाईंना आहे. सावित्रीबाईंनी आपल्या परीने समाजातला अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला व ज्ञानाचा प्रकाश सर्व दिशांना पसरवला. सावित्रीबाईंना कधीही विसरु नये कारण आधुनिक स्त्रीच्या प्रगतीचा पाया रोवणारी पहिली स्त्री सावित्रीबाई आहे. अन्याया विरुद्ध पेटून उठणाऱ्या सावित्रीबाईचा आदर्श कायम जीवनात ठेवावा. सावित्रीबाईंनी जसे न घाबरता एकाएका धटिंगणाला पळवून लावले होते तसेच आजही स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या धटिंगणांनी पळवून लावले पाहिजे.

 महिलांच्या हक्काबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी 1852 मध्ये महिला सेवा मंडळ उघडले. त्यांनी गर्भवती बलात्कार पिडीतांसाठी केअर सेंटर उघडले. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात नेटिव्ह फिमेल स्कूल आणि सोसायटी फाँर द प्रमोशन आँफ द एज्युकेशन आँफ महार, मांग्स इत्यादी. या दोन शैक्षणिक ट्रस्टची स्थापना केली. खरोखरच सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले या दाम्पत्याचे आपल्यवर अनंत उपकार आहेत.


पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9970404180

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या