सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मोफत ॲनिमिया तपासणी शिबिर संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 29/12/2025 :
आज सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे महिला कर्मचारी व विद्यार्थिनींसाठी मोफत ॲनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र, अकलूज यांच्या सहकार्याने पार पडले.
या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.संभाजी गंगाधरे, आरोग्य सहायिका श्रीमती एस. डी. मोरे, आरोग्य सेवक व्ही.एस. झुरुळे व निलेश चव्हाण आणि आरोग्य सेविका श्रीमती कीर्तके उपस्थित होत्या. शिबिरामध्ये सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तपासणीनंतर ॲनिमिया तपासणीची गरज व ते होऊ नये यासाठीचे उपाय याविषयी आवश्यक मार्गदर्शन दिले. या शिबिरामध्ये 113 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व आपले आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रगती पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता रिसवडकर यांनी केले.

0 टिप्पण्या