रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे येथे मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे यांची सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/12/2025 : रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रत्नत्रय शैक्षणिक संकुलाच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. संस्थेच्या प्रशासक मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात केलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यातून इतर शिक्षण संस्थांनीही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर श्री. ढेकणे यांनी शिक्षकांशी सखोल संवाद साधत मार्गदर्शन केले. शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी घडवावे, तसेच माणूस घडविणे हेच शिक्षकांचे खरे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हेच देशाचे खरे भवितव्य असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हा कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व सेवाभावी असावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे गुण प्रत्येक शिक्षकांमध्ये असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनंतलाल रतनचंद दोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सेवा हीच खरी संपत्ती असल्याचे सांगितले. शिक्षणातून माणसाचा उद्धार होतो, या विचारातूनच शिक्षण संस्था सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी यांनी श्रीपाद ढेकणे यांचे सोबत आलेले विविध अनुभव सांगितले. शाळेला दिलेली भेट व केलेले मार्गदर्शन हे नेहमीच प्रेरणादायी राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त करून श्रीपाद ढेकणे यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले.
सदर प्रसंगी अनंतलाल दोशी, विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, महादेव सपकाळ, विशाल गांधी, वैभव शहा, अमित गांधी, रामभाऊ गोफणे,विनायक ठवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहीगावचे मुख्याध्यापक सतीश हांगे यांनी केले. रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या देसाई यांनी स्वागत केले, तर आभार प्रदर्शन विलासचंद्र एम. मेहता आयटीआय कॉलेजचे प्राचार्य गजेश जगताप यांनी केले.


0 टिप्पण्या