🔰 मेंढपाळ व मेंढ्यांची संख्या वाढली तरच भविष्यात मटण, लोकर आणि दुधाचे उत्पादन वाढेल - संजय वाघमोडे,
🟡 अविकानगर (राजस्थान) येथे राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/12/2025 :
भविष्यात मटण, लोकर आणि दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर मेंढपाळ आणि मेंढ्यांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ विकास (चराई कुरण) समिती महाराष्ट्र राज्य चे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे यांनी केले. ते सशक्त मेंढीपालन तंत्रज्ञानाद्वारे विकसित भारतासाठी लोकर, मांस, आणि दुध उत्पादन, या विषयावर भारतीय कृषी संशोधन संस्था व अविकानगर ( राजस्थान) येथील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था येथे भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात बोलत होते.
राष्ट्रीय परिसंवादात भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीण मलिक, संयुक्त सचिव डॉ. मुथुकुमारस्वामी बी, हिमाचल प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाचे सचिव रितेश चौहान, आणि आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक, प्राणी शरीरविज्ञान आणि पुनरुत्पादन डॉ. जी.के. गौर यशवंत क्रांती च्या महिला प्रदेशाध्यक्षा स्वाती चितळकर, सौ. संजीवनी वाघमोडे, उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ. अरुण कुमार तोमर आणि संघटन सचिव डॉ. विनोद कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की सुविधांच्या अभावामुळे मेंढपाळांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यांना सुविधा पुरवणे आवश्यक आहे. सरकारने २५ लाख रुपयांपर्यंतचे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत मेंढी तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. देशातील वेगवेगळ्या वातावरणात टिकून राहू शकतील अशा मेंढ्यांच्या जाती विकसित करणे आवश्यक आहे. मेंढ्यांसाठी विमा संरक्षण नसल्याने, रोग, विषबाधा, अपघात, वन्य प्राणी, भटक्या कुत्र्यांचे हल्ले रोगराई मुळे मेंढ्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात आणि मेंढपाळांना नुकसानाची भरपाई मिळत नाही. मेंढपाळांसाठी आर्थिक नुकसान झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त होते. मेंढपाळ आणि मेंढ्यांना विमाकवच मिळाले तर मेंढपाळांना मृत मेंढ्यांची भरपाई मिळेल. मेंढपाळांना आधुनिक प्रशिक्षण नसल्याने ते पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करतात. आधुनिक पध्दतीचे मेंढपाळांना प्रशिक्षण दिले गेले तर मेंढपाळ आणि मेंढ्यांची संख्या वाढेल. तालुका व जिल्हा पातळीवर मेंढ्या आणि लोकर खरेदी केंद्रे स्थापन करून मेंढ्या आणि लोकरीस हमी भाव मिळाला तर मेंढपाळांसाठी खरेदी आणि विक्री करणे सोपे होईल.फसवणुक हहोणार नाही. लोकरीपासून फक्त कंबल व झेन बनविण्याऐवजी स्वेटर, स्कार्फ आणि इतर वस्तूंचे उत्पादन वाढवावे. भटक्या मेंढपाळांना ७५% अनुदानाने फिरती घरे आणि फोल्ड करण्यायोग्य आणि हलवता येणारे मेंढीचे गोठे उपलब्ध करून द्यावेत.
बारामाही पाणी शेतीसाठी उपलब्ध असल्याने शेतकरी बारामाही पिके घेऊ लागले तसेच गायरानावर अतिक्रमणे व वनक्षेत्रात चराई बंदी यामुळे चराईक्षेत्र कमी झाले. शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये संघर्ष सुरू होऊन मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली जात आहे. हिंसाचारात काही मेंढपाळांचा मृत्यूही झाला आहे. शिवाय, मेंढ्या चोरीच्या तपासानंतरही, एकाही मेंढ्या चोराला शिक्षा झालेली नाही. त्यामुळे, मेंढ्या चोर रात्रीच्या वेळी येतात, मेंढपाळांना मारहाण करतात आणि मेंढ्यांचे संपूर्ण कळप घेऊन जातात. मेंढपाळांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मेंढपाळांच्या संरक्षणासाठी अँट्रासिटी कायद्यासारखे कठोर कायदे केले तर मेंढपाळांवर होणारे हल्ले व चोरीचे प्रमाण कमी होईल. ६ फुटापेक्षा जास्त उंच झाडे असणारे वनक्षेत्र खुले करावे. मेंढपाळांना ओळखपत्रे देऊन भटकंतीचा नकाशा तयार केला पाहिजे जेणेकरून त्यांना भटकंती करताना येणाऱ्या समस्यांसाठी सरकारी मदत मिळू शकेल. भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा आणि वसतिगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. मेंढपाळांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे. यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापना करावी. मेंढ्या सहसा फक्त एकच कोकरू जन्माला घालतात, तर काही दोन किंवा तीन पिलांना जन्म देतात. या विषयावर संशोधन केले आणि जास्तीत जास्त दोन कोकरू जन्म देणाऱ्या मेंढ्यांची संख्या वाढवली तर उत्पन्न वाढेल. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की मेंढ्यांच्या दुधामुळे कर्करोगा सारखे आजार बरे होऊ शकतात. परंतु मेंढपाळ अंधश्रद्धेमुळे दूध देत नाहीत, म्हणून त्यांना शिक्षित करणे महत्वाचे आहे.चांगले काम करणाऱ्या मेंढपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिले पाहिजेत.
अविकानगर संस्थेचे संचालक डॉ. अरुण कुमार तोमर यांनी पाहुण्यांना संस्थेच्या विविध मेंढ्या, शेळ्या आणि सशांच्या जातींच्या प्रदर्शनांची तसेच इतर उपलब्ध तंत्रज्ञानाची भेट दिली आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सर्व पाहुण्यांचे संस्थेने उत्पादित केलेल्या उत्पादनांसह स्वागत केले आणि वर्तमान आणि भविष्यातील मेंढीपालनाच्या संधी आणि आव्हानांवर सादरीकरण केले. राष्ट्रीय परिसंवादाचे प्रमुख पाहुणे नरेश पाल गंगवार यांनी विकसित भारतासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले, प्रत्येक प्राणी आणि त्यांच्या उत्पादनांचे उत्पादन आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी उपस्थित सर्वांना देशातील शेतकऱ्यांसाठी मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या सध्याच्या योजना आणि भविष्यातील गरजांनुसार तयार केलेल्या स्पष्ट कृती आराखड्याची माहिती दिली. इतर पाहुण्यांनीही विविध सत्रांमध्ये विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि प्रत्येक सत्रात वर्तमान आणि भविष्याचा विचार करण्यात आला. आव्हानांना तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. एसईझेडच्या धर्तीवर मेंढपाळांना राखीव क्षेत्र तयार करून त्यांना सोईसवलत उपलब्ध कराव्यात, असे स्वाती चितळकर यांनी सांगितले
मेंढीपालनाशी संबंधित व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या स्टार्टअप्स, प्रगतीशील शेतकरी, उद्योग भागीदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसह एकूण २०० सहभागींनी त्यांचे अनुभव आणि भविष्यातील विविध शक्यता शेअर केल्या.
राष्ट्रीय चर्चासत्राचे संचालन समन्वयक आणि आयोजन सचिव डॉ. विनोद कदम यांनी केले. आभार प्रदर्शन पशुसंवर्धन विभागाचे डॉ. खन्ना यांनी केले.


0 टिप्पण्या