सदाशिवराव माने विद्यालयात बालदिन उत्साहात; राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंचा गौरव
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 14/11/2025 :
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या तीन गुणवंत खेळाडूंचा विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋषिकेश गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी बालदिनानिमित्त बालकांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला उत्साह आणि आनंदाने वातावरण अधिक उत्साही बनले.
यावेळी मनमाड येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत विद्यालयातील चि. सार्थक काळे याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले असून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी अरुणाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. तसेच कु. अस्मिता काळे-पाटील हिनेही प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कमाई केली असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी संभाजीनगर येथे तिची निवड झाली आहे. चि. सुजल धडांबे याने द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले. दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून विद्यालयाचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल तिघा खेळाडूंचा यथोचित सत्कार मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच उपस्थित मान्यवर खेळाडू व स्पर्धेसाठी अनमोल मार्गदर्शन केलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख दिग्विजय जाधव यांनी बालदिनाचे महत्त्व आणि नेहरूंच्या बालप्रेमावर मार्मिक भाष्य केले.
या कार्यक्रमास माजी खेळाडू समाधान माने, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उत्साह, आनंद आणि गौरव यांचे अनोखे वातावरण लाभत बालदिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ यशस्वीरीत्या पार पडला.

0 टिप्पण्या