🟠 सद्गुरु श्री .श्री .सा.का. चा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न
🟣 चेअरमन , संचालक मंडळ यांच्या सभासद व कामगारांच्या हिताच्या निर्णयाने आनंदी आनंद"
वृत्त एकसत्ता न्यूज
पिलीव प्रतिनिधी (रघुनाथ देवकर):-सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने आणि सर्व सभासद शेतकरी आणि सर्व घटकांच्या सहकार्याने सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि श्री नगर ( राजेवाडी) या कारखान्याने गेल्या एक तपाहून अधिक वर्षे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर चेअरमन एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने व "सेवा निसर्गाची उन्नती आपली"या ध्येयाने प्रेरित होऊन साखर कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करीत या भागातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, सभासद यांच्या हिताचा विचार करत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करीत २०२५-२६ च्या गळीत हंगामाकडे मोठ्या दिमाखाने व यशस्वीपणे मार्गक्रमण केलेले आहे. आणि या चालू हंगामातील कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक एन शेषागिरी राव यांचे शुभ हस्ते सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व धार्मिक विधी करून मा. व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील , संचालक मोहन आप्पा बागल, संतोष पुजारी, सौ. उषाताई मारकड, तसेच शेतकरी संघटनेचे नेते कांतीलाल भाऊ नाईकनवरे, राहुल बिडवे, यांचे समवेत बॉयलर अग्नी प्रदीपनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर झालेल्या सभेत केन मॅनेजर सुनील सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल वाचून दाखविला, शेतकरी नेते कांतीलाल नाईकनवरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सर्व शेतकरी बांधवांना सांगितले की, मी या कारखान्याच्या स्थापनेपासून माझा एकट्याचाच नव्हे तर आमच्या पंढरपूर भागातील ऊस या कारखान्याला हक्काचा आपला कारखाना म्हणून ऊस पुरवठा करीत असतो आणि माझ्या अनुभवानुसार या कारखान्याला आम्ही प्रति परमेश्वराप्रमाणे मानत आलो आहोत कारण शेतकऱ्याच्या पडत्या काळामध्ये या कारखान्याने शेतकऱ्यांचे हित पाहिलेले आहे याचा साक्षीदार माझे सहित पंढरपूर तालुक्यांमध्ये असंख्य शेतकरी बांधव आहे. कोणीही काहीही बोलत असेल आणि या कारखान्या बाबतीत काही अफवा पसरवत असतील तर त्यावरती कोणीही कसलाही विश्वास ठेवू नये हे माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून शेतकऱ्यांचे म्हणजे आपले हित साधून आपले भविष्य आपणालाच घडवायचे आहे. त्यानंतर श्याम तात्या मदने पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व या कारखान्यामुळे आमच्या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला हे ठणकाणून सांगितले.
तसेच व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून कारखान्याच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या प्रगतीचा लेखाजोखा सांगत असताना शेतकरी, कामगार व सर्व हितचिंतकांनी आम्हाला जे सहकार्य केले आहे हेच सहकार्य भविष्यातही दिले पाहिजे निश्चितच हा आपला कारखाना या सर्वांची जाणीव ठेवल्याशिवाय राहणार नाही कारण कारखाना नेहमीच शेतकरी,सभासद, कामगार,वाहन मालक चालक यांच्या हिताचे निर्णय घेत आलेला आहे. आणि यापुढेही घेत राहणार अशी ग्वाही दिली, आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा चेअरमन शेषागिरी रावसर यांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना सांगितले की, स्थापनेपासून आपण सर्वांनी हातात हात घालून येणाऱ्या संकटावरती मात करत कारखान्याला सहकार्य केलेले आहे तुमच्या विश्वासाच्या जोरावरती आम्ही निश्चितपणे भविष्यकाळात सद्गुरु श्री श्री यांच्या विचाराने पुढे जाऊन शेतकऱ्यांचे हित जपण्याचाच प्रयत्न करणार आहोत, हे सांगत असतानाच २०२४-२५ च्या हंगामामध्ये आलेल्या उसाला रुपये २८५०/-पहिली उचल दिलेली आहे. आणि आता दीपावली सणाचा विचार करता व शेतकऱ्याचे हित लक्षात घेता रुपये १५०/- अंतिम हप्ता देण्याचे जाहीर करून कामगार वर्गालाही पगार वाढ व दीपावलीला बोनस दिला जाणार आहे असे जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या घोषणेचे स्वागत केले. यावेळी राजेवाडी विकास संस्थेचे चेअरमन रवींद्र शिरकांडे, मळोली चे पोलीस पाटील तानाजी जाधव, शेळव्याचे अण्णासाहेब गाजरे, माऊली विठलापूरचे बाळासाहेब बाड,चांदापुरीचे नय्युम पठाण, शेतकरी संघटनेचे राहुल बिडवे त्याचप्रमाणे जनरल मॅनेजर, सर्व खाते प्रमुख कामगार कर्मचारी सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एच आर अँड एडमिन सचिन खटके शेतकी अधिकारी दत्ता क्षिरसागर व त्यांच्या टीमने चांगल्या प्रकारे केले. तर रघुनाथ देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानून उपस्थितांना धन्यवाद दिले. सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.


0 टिप्पण्या