राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील धर्म संकल्पना

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील धर्म संकल्पना 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 19/09/2025 :

माणसामाणसांत आणि धर्माधर्मात तसेच पंथापंथात भेदभाव केला जात आहे. कुणी म्हणतात, हे भागवत, पोथी पुराण फडतूस आणि फालतू आहे. म्हणजे पंथापंथात भेदभाव, भांडणे लागतील ना? बरे पुढे पाहू या. कुठल्याही व्यक्तीच्या जन्मावरुन धर्म ओळखता येत नाही, तर कृतीतून व्यक्तीचा धर्म ठरला पाहिजे. माणसांना जोडतो तोच खरा धर्म असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्माचा नेमका अर्थ सांगताना म्हणतात.

मुख्य धर्माचे लक्षण । त्याग, अहिंसा, सत्यपूर्ण ।

अपरिग्रह, ब्रम्हचर्य जाण तारतम्य युक्त  ।।

प्रत्येकासी शरीर, मन । वाणी, इंद्रिये, बुद्धी प्राण ।

या सर्वांचे विकास साधन । तोचि  धर्म  ।।

      धर्माचरणामुळे मनुष्य जीवनाचा विकास होतो. त्यामुळे प्रत्येकाला धर्माच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले पाहिजे. तरच तो त्याप्रमाणे जीवन जगू शकेल असे महाराज म्हणतात. म्हणून "व्यक्ती व्हावी धार्मिक" असे ते म्हणतात. धर्माची स्थापना सत्य, संयम आणि सरल हृदयात होते. प्रत्येकाच्या जीवनात कठिण प्रसंग येतच असतात. या प्रसंगांना तोंड देऊन जो यशाची वाट काढतो तोच धर्म परिक्षेत उर्तीर्ण होतो. जेथे ज्ञान दर्शन, चारित्र्य गुण असतात. तेथेच धर्म वाढीस लागते. या विपरीत जेथे क्रोध, माया, लोभ, मत्सर आदि दुर्गूणांचा वास असतो, तेथे धर्म राहू शकत नाही. तेथे अधर्माची स्थापना होते. धर्मामुळे जीवनातील अनावश्यक तत्त्व नष्ट होतात. आज व्यक्ती धर्मासाठी कष्ट घेताना दिसत नाही. सर्वधर्म समभावाचा सोपा अर्थ सांगताना राष्ट्रसंत म्हणतात.


 "मानव" हेचि आपुले नाम ।

 मग स्वधर्म म्हणजे मानवधर्म ।

 मानवता हिच आहे  खूण ।

 सर्व धर्म समन्वयाची  ।।

     अशाप्रमाणे समाजधारणा करतो तोच खरा धर्म आणि जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असा संदेश महाराज देतात. सहनशक्ती आणि सामंजस्य जिथे आहे तेथेच धर्माची वाढ होते. वासना आणि व्यसनापासून दूर नेणारा, सर्वाप्रती प्रेम, माया आणि दुर्भाव जोपासणारा खरा धर्म असतो. तर मग सर्व प्रांत, धर्म, पंथ, संप्रदायाच्या भिंती तोडून समाजाचा समानतेच्या एका सूत्रात बांधणारी विश्वशांतीची प्रार्थना म्हणावी लागेल. 


है प्रार्थना गुरुदेवसे ।

यह स्वर्गसम संसार हो !

अति उच्चत्तम जीवन बने ।

परमार्थमय व्यवहार हो  ।।

              राष्ट्रसंतांच्या आध्यात्मिक विचाराचे सार या एका प्रार्थनेमध्ये साठलेले आहे. जर या प्रार्थनेचे चिंतन प्रत्येकाने केले आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला "स्वर्गसम" समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

     धर्म भारतीय लोकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग असून, धर्माचा संबंध जीवननिष्ठेशी आहे. "जीवनाला आकार देण्याचे, रक्षण करण्याचे कार्य करतो, तोच धर्म" आहे. भारतात हिंदू धर्माबरोबर अनेक धर्म सांप्रदाय पंथ आहेत. ही वेळोवेळी समाजात जागृती आणण्यासाठीची एक पवित्र योजना आहे. धर्माच्या साधना, आचरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मूळ तत्त्वज्ञान मानवाचे कल्याण करणे हेच आहे. राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात.


जगी दिसती विभिन्न धर्म ।

परि सर्वांचे एकचि वर्म  ।

विश्वधारणेचा मार्ग उत्तम ।

सद् धर्म तोचि  ।।

      संपूर्ण विश्वात सुखशांती निर्माण होण्यासाठी सर्वच संतांनी, धर्म प्रवर्तकांनी आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. सर्व नद्या ज्याप्रमाणे शेवटी सागराशी एकरुप होतात. त्याचप्रमाणे जगातील सर्व धर्माचे मूळ मानव कल्याण असून, जगचालक परमेश्वर हा एकच आहे. राष्ट्रसंत म्हणतात.


मै किसी पंथ, पक्ष या,

किसी गुट का आदमी नही हूं  । 

सारे पंथ, धर्म, देश,

मै अपने मानता हूं ।।

         विविध जाती धर्माच्या प्रवचन, किर्तनकारांना प्रचलित धर्म संप्रदायातील गोष्टीकडे न गुंतता सर्वधर्म सम-भावाची शिकवण व राष्ट्रधर्माचे कार्य करण्याचा संदेश राष्ट्रसंतानी दिला. राष्ट्रसंतांनी राष्ट्रधर्म बळकट होण्यासाठी व्यक्तीधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म समाजाला अतिशय सोप्या भाषेत ग्रामगीतेत समजावून सांगितला.

  १) व्यक्तीधर्मः- महाराज म्हणतात, व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक । कुटुंब व्हावे समाजपोषक । कोणत्याही राष्ट्राची उन्नती ।। प्रगती सुविद्द-सुसंस्कारित नागरिकांवरच अवलंबून असते. प्रत्येक व्यक्ती संस्कारित झाला पाहिजे.

विश्वाचा घटक देश ।

गाव हाचि देशाचा अंश ।

गावाचा मूळ पाया माणूस ।

त्यासि करावे धार्मिक ।।

२) कुटुंब धर्मः- कुटुंब समाज जीवनाची प्रथम पाठशाळा आहे, त्यामुळे कुटुंबातून सुसंस्काराची रुजवणूक झाली पाहिजे. 


 घडावया उत्तम संस्कार ।

 मायबाप शिकविती सदाचार ।

 व्हावया उत्तम, गुणी, चतुर ।

 मोठेपणी  ।।

        प्रत्येक कुटुंब सुखी, समाधानी, सुसंस्कारित झाले तरच समाज राष्ट्र उन्नत होण्यास वेळ लागणार नाही.

३) समाजधर्मः- मनुष्य समाजात लहानाचा मोठा होतो. समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचा व्यक्तीमत्व विकासावर परिणाम होतो म्हणून समाज उन्नत व्हावा, समाजाची प्रगती होण्यासाठी प्रत्येकामध्ये सेवाभाव असावा. राष्ट्रसंतांनीही मानवता मंदिरे, गावागावात संस्कार निर्मितीची केंद्र म्हणून कार्य करीत आहेत. सर्वधर्म समभावाचे प्रतिक ही मंदिरे आहेत. येथे होणारी सामुदायिक प्रार्थना सर्व धर्मींयांचे ऐक्य साधणारी आहे.

सर्व धर्माचा समन्वय ।

विश्वशांतीचा उपाय ।

लोक सुधारणेचे विद्यालय ।

सामुदायिक प्रार्थना ।।

राष्ट्रसंत म्हणतात, "आम्हाला धर्म सांगण्याचा प्रसंग आला तर ज्या धर्म परंपरेत आमचे पूर्वज राहिले, तेच संस्कार आमच्यात असल्याने आम्हाला हिंदू धर्म हेच सांगणे आजतरी योग्य होईल."


पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- ९९२१७९१६७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या