🛑 बैलगाडा शर्यतीतील निमगाव (म.) येथील "हिंदकेसरी बैल शंभू ६५६५" चे अकस्मात निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 05/09/2025 :
बैलगाडा शर्यत विश्वातील हिंद केसरी असणारा,आपल्या विद्युत चपळाईने हौशी लोकांना वेड लावणारा निमगावचा शंभू ६५६५ चे बुधवारी अचानक निधन झाले.त्याच्या अंत्यविधीसाठी माळशिरस तालुक्यातील बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हजारो प्रेमींनी हजेरी लावली,आज त्याचा तिसरा दिवसही विधिवात करण्यात आला यासाठीही अनेक चाहते जमले होते.
निमगाव ता.माळशिरस, जिल्हा सोलापूर (महाराष्ट्र राज्य) येथील अण्णा मंडले यांच्या मालकीचा हा बैल अचानक मयत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.अण्णा मंडले यांची आर्थिक परिस्थिती नसताना म्हणजे अगदी रहायला ही स्वतःच्या मालकीची जागा नाही,निमगाव गावठाणात राहूनही त्यांनी घरच्या गायीला जन्मलेल्या शंभुला जीवापाड जपले होते.केवळ ३७ महिन्यांचेच वय असलेल्या शंभूनेही २५ /३० मैदानातच मालकाचे नाव महाराष्ट्रात केले होते.त्याने या क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी नंतर नुकताच दि.१७ ऑगस्ट रोजी माण तालुक्यातील विरकरवाडी येथे झालेल्या बैलगाडी शर्यतीत हिंद केसरी हा मानाचा किताब मिळवला होता. बैलगाडी शर्यतीतील नामवंत बैल सावकार ,बकासुर ,सोन्या यांच्या बरोबरच बरोबरच शंभू 65 65 या बैलाचे नाव या बैलगाडा शर्यत विश्वात झाले होते निमगाव येथीलच भारत वळकुंडे यांचा सावकार व मंडले यांचा शंभू ६५६५ ही जोड असेल त्या मैदानात इतर स्पर्धक क्रमांकाची अपेक्षा ठेवत नसत.
शंभूची यशस्वी कारकीर्द पाहून या क्षेत्रातील अनेकांनी त्याची ४५ लाख रुपयांपर्यंत ची मागणी केली होती,मात्र मालक त्यास विकण्यास तयार नव्हते, व शंभू ही पाय खुतून बसायचा,तो ही जायला तयार नसायचा. शर्यतीला जाण्याआधी घरापुढील देवाला गुडघे टेकून नमस्कार करायचा शंभूने दिनांक ३१ ऑगस्ट रोजी पेडगाव येथील मैदान गाजवून आल्यानंतर सायंकाळी व त्यानंतर २ दिवस मजेत घालवले.मात्र बुधवार दिनांक ३ रोजी त्यास अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या.मंडले यांनी त्यासाठी पशू वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर आणले परंतू कुणाला त्याच्या आजाराचे निदान झाले नाही.व सायंकाळी ५ च्या सुमारास त्याने आपल्या मालकाच्या घरी जीव सोडला.
शंभू च्या निधनाची बातमी या क्षेत्रातील हौशी लोकांत वाऱ्यासारखी पसरली. व त्याच्या अंत्यविधीसाठी सुमारे ४ हजार लोक उपस्थित राहिले.बुधवारी रात्री ९.३० वा.मालकाच्या घरासमोरच त्याचा दफनविधी अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आला.
शुक्रवार दि.5/9/2025 रोजी शंभूचा तिसरा असल्याने मालक मंडले यांनी कालच आपल्या दारात या शंभूचे स्मारक उभारले आहे.
🟪 "शंभू वर आमचे कुटुंबियांनी जीवापाड प्रेम केले.त्यानेही कुठल्याही मैदानावर आमची मान खाली जाऊ दिली नाही. त्याचे जाण्याने आमचे कुटुंबाचे च नव्हे तर बैलगाडी क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याने मिळवून दिलेले बक्षिसे, ट्रॉफी पाहूनच त्याची आठवण येत राहणार. आमचा घरातीलच तो सदस्य होता. आम्ही त्याला नाही तर त्यांनी आम्हाला जगवले." - अण्णा मंडले, निमगाव( म.)


0 टिप्पण्या