🟡 आज गौराईचे थाटामाटात आगमन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/8/2025 : भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्रात तिचे पूजन करून मूळ नक्षत्रावर तिथे विसर्जन केले जाते. रविवार 31 ऑगस्ट रोजी गौरी आवाहन, 1 सप्टेंबर रोजी गौरी पूजन व मंगळवार 2 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे.
माहेरवाशीण असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यान्पिढ्या बसविल्या जातात. काही घरांमध्ये नवसाच्या तर काहीजण हौस म्हणून गौराई बसवतात. स्थळपरत्वे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ आदींपैकी एक दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवून त्यांची पूजा केली जाते.
गणपतीबरोबर येणार्या गौरी सणाला एक वेगळे वलय आहे. यामध्ये गौरीची स्थापना करून तिचे मनोभावे पूजन करण्यात येते. ज्येष्ठा गौरीचे आवाहन वाहत्या पाण्यातून करण्याची प्रथा आहे. तसेच तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. ज्येष्ठा गौरी आवाहन वेळी दोन गौरी बसवण्याची पद्धत आहे. त्यापैकी एक गौरी घरातच असते ती लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणतात तिला ज्येष्ठा गौरी असे म्हणतात. या गौरीचा उल्लेखही लक्ष्मी याच नावाने केला जातो. जमिनीवर आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर थोडी थांबवून लक्ष्मीच्या विविध प्रकारच्या उल्लेख केला जातो. त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी,भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी या अष्टलक्ष्मींचा समावेश केला जातो. दोन स्त्रिया गौर आणताना गौर आली गौर कशाच्या पावलांनी आली....? असे म्हणून आपल्या गरजेनुसार दूधदुभते, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, विद्या, प्रगती आदी कामनांचा उल्लेख करतात.
गौरी आणण्याच्या विविध पद्धती आहेत चांदीच्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात वाहत्या पाण्यातील पाच सात किंवा अकरा खडे घेऊन त्यावर वस्त्र पांघरून गौरी घेणार्या स्त्रीने न बोलता दरवाजात आल्यानंतर जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने पाण्याने धुऊन कुंकवाचे स्वस्तिक काढून आरती ओवाळून घराच्या दरवाजापासून देवखोलीपर्यंत किंवा गौरी बसविण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे वाजत गाजत स्वागत केले जाते.
गौरी स्थापित होण्यापूर्वी त्यांना घर,तिजोरी,धान्यखोली,दुधाचे ठिकाण इ. गोष्टी दाखवून घरात ऐश्वर्य व सुबत्ता नांदावी यासाठी प्रार्थना करतात. गौरीचे पूजन करून महानैवेद्य दाखवला जातो. यामध्ये खिरपुरी, कानवले व पुरणपोळी आवर्जून असते. त्यानंतर आरती केली जाते. सवाष्ण बोलवून तिला खणानारळाची ओटी भरून तिला भोजन वाढले जाते. सायंकाळी हळदी-कुंकू करून मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन केले जाते. काही जणांकडे गौरी सोबतच गणपतीचे विसर्जन होते तर काहीजणांकडे गौरीचे विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसांनी गणपतीचे विसर्जन होते. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे गौरी आणि गणपती भेटच होत नाही.
तेव्हापासून स्त्रिया करतात गौरीची पूजा
हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवशक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेले स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले. तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
0 टिप्पण्या