संपादकीय पान..........✒️
✳️ गोपिचंद पडळकर, 'टिळे' वाल्या देवस्थानच्या जमिनी खरेदी करायच्या की 'गोल टोपी' वाल्या ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे.
अकलूज दिनांक 5/8/2025 :
भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी नाशिक येथे बोलताना 'सनातन' ला लाजवेल असे वक्तव्य केले आहे. उभी हयात 'सनातन' मध्ये घालवलेले कार्यकर्तेही जितके कट्टर बोलत नाहीत, जेवढी जातीयवादी गरळ ओकत नाहीत तेवढी गरळ आमदार गोपिचंद पडळकर यांनी ओकली आहे. ज्यांच्या तीन-तीन पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेल्या ते लोकही इतके विखारी बोलत नाहीत. गोपिचंद पडळकर सध्या अती कडवे हिंदूत्ववादी झाले आहेत म्हणे. कालपरवा ते कडवे वंचीतवाले होते. नितेश राणे आणि दोघांच्यात जणू कडवट गरळ कोण ओकतो ? याची स्पर्धाच लागली आहे. विटे शहरातील देवस्थानची जमीन विकल्याचा आरोप गोपिचंद पडळकरांच्यावर झाला होता. सदरचा आरोप निराधार नाही. या व्यवहारात पडळकरांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. देवाच्या जमिनी विकणा-या लोकानी हिंदूत्व शिकवावे का ? असे असेल तर पडळकरांना आमचा सवाल आहे, गोपिचंद पडळकर, 'टिळे' वाल्या देवस्थानच्या जमिनी खरेदी करायच्या की 'गोल टोपी' वाल्या देवस्थानच्या ? बेकायदेशीरपणे आपल्याच धर्मातील देवाला टोपी घालताना नेमकं काय करायचं ? याचेही मार्गदर्शन आमदार गोपिचंद पडळकरांनी करावे. देवाला टोपी घालताना टिळा लावून घातली ? गोल घातली की कसली ? याचाही खुलासा करावा. पडळकरांच्या जवळच्या खास माणसाने धनगर जातीतल्याच विधवा वृध्द महिलेची सतरा एकर जमीन फसवून घेतल्याचा आरोप केला गेला आहे. या आरोपात पडळकरांच्याकडे बोट दाखवले गेले आहे. कारण सदर व्यक्ती पडळकरांचे सर्व व्यवहार सांभाळतो. विशेष म्हणजे सदरची महिला हिंदूच आहे. एका निराधार हिंदू वृध्देला तुम्ही फसवणार, देवस्थानच्या जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार करणार आणि हिंदूत्वावर तुम्हीच भाषणं ठोकणार ? हि कुठली नैतिकता ? हे कसलं हिंदूत्व ? ही कसली धार्मिकता ?
विस्थापितांचा चेहरा घेवून राजकारणात प्रस्थापित झालेल्या गोपिचंद पडळकर यांच्यासारख्या नेत्याने अशी भाषा वापरावी हे दु:खद आहे. त्यांची भाषा, त्यांची सध्याची वाटचाल बहूजन समाजासाठी लाजिरवाणी आहे. त्यांनी राजकारणात जरूर मोठी उंची गाठावी, खुप मोठ-मोठी पदे उपभोगावीत. भविष्यात त्यांनी आमदार-खासदारच नव्हे तर मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व्हावे पण खाल्ल्या ताटात घाण करून नव्हे. जो विचार घेवून राजकारण सुरू केले त्या विचाराशी आणि ज्या माणसांनी त्यांच्या छातीत, पावलात बळ भरले त्यांच्याशी प्रतारणा करून नव्हे. ज्या लोकांनी त्यांना या उंचीवर नेले त्याच लोकांच्या छाताडात त्यांनी सुरा खुपसू नये. आपल्या राजकीय स्वार्थासाठी विस्थापितांच्या, उपेक्षितांच्या आशा-अपेक्षांना त्यांनी आग लावू नये. नगर येथे बोलताना त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की "ज्यांच्या कपाळावर टिळा असेल त्यांच्याकडूनच खरेदी करा. ज्यांच्या डोक्यावर गोल टोपी असेल त्यांच्याकडून खरेदी करू नका". तसेच हिंदू मुलींना त्यांनी मुलं जन्माला घालण्याचे मशिन म्हंटले आहे. पडळकरांची ही भाषा खुप विखारी आहे. राजकारणात गोपिचंद पडळकर आज ज्या उंचीवर उभे आहेत त्या उंचीच्या पायात टोपीवाल्यांचीही ताकद आहे. पडळकरांनी वंचीत बहूजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत त्यांना तीन लाख मते पडली होती. या तीन लाखात हजारो टोपीवाल्यांनीही त्यांना मतदान केले होते. कित्येक मुसलमान पदरमोड करून पडळकरांचा प्रचार करत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रमाण माणणा-या, लोकशाहीवादी, संविधानवादी हजारो बाैध्द बांधवांनीही त्यांना मतदान केले होते. या हजारो गोल टोपीवाल्यांनी मतदान करताना पडळकरांनी सुंता केली आहे का ? ते गोल टोपी घालतात का ? ते दाढी ठेवतात का ? नमाज पडतात का ? याची तपासणी केली नव्हती. पडळकर हा विस्थापित समाजातला चेहरा आहे. बहूजन समाजातलं प्रस्थापितांशी संघर्ष करणारं लेकरू आहे म्हणून लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. निखळपणे त्यांच्या पालख्या वाहिल्या. त्यांच्या राजकीय वाटचालीत धनगर बांधवांचे योगदान मोठे आहेच पण गाव-गाड्यातील अठरा-पगड जाती-जमातीचेंही योगदान मोठे आहे. त्यात इथला टोपीवाला मुसलमानही आहे याचे भान व जाणिव पडळकरांनी ठेवावी. स्वार्थासाठी समाज तोडणारी विष पेरणी करू नये. पडळकरांचा सध्या जो प्रकार सुरू आहे तो, "जिस थाली मे खाया उसी थाली मे छेद किया" अशातला आहे. त्यांनी जी भाषा वापरली आहे ती भाषा फडणवीस, गडकरी बोलले असते तर काहिच वाटलं नसतं. पण पडळकरांनी हे बोलावं ? याचं दु:ख होतं. अण्णासाहेब डांगेंनी संघात काम केले. भाजपा वाढवला. संघासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्यांना संघाने व भाजपाने काय दिलं ? त्यांच्या पदरात काय पडलं ? याचा विचार पडळकरांनी जरूर करावा. त्यांनी आजन्म भाजपात रहावे. तो वाढवावा, रूजवावा आमचा विरोध नाही पण ते जे विष ओकू लागलेत ते गैर आहे. या विषारी पिचका-या म्हणजे ज्यांच्या जीवावर उड्या त्यांच्याच कानात काड्या अशातला प्रकार आहे.
त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाची फसवणूक केली. आता त्यांची आरक्षणाची लढाई संपली आहे, कारण त्यांना आमदारकी मिळाली. ते स्वत:च सत्तेत आहेत. राज्यात व केद्रात त्यांचाच पक्ष सत्तेत आहे. तरीही ते धनगर समाजाला जे आरक्षण हवे आहे ते देवू शकत नाहीत. त्यामुळे धनगर आरक्षणावरही त्यांना बोलता येत नाही. या पुर्वी शरद पवारांना, अजित पवारांना शिव्या घालून प्रसिध्दी मिळवता येत होती. त्यांच्यावर कसेही बोलता येत होते. आता त्यांच्यावरही बोलता येत नाही. शरद पवारांच्यावर बोलल्यावर पक्षाने कानउघडणी केली आहे. अजित पवारांना चाैंडीच्या कार्यक्रमाला बोलवणार नाही असे मोठ्या तोंडाने सांगितले त्याच कार्यक्रमात अजित पवारांच्या मागे उभं राहून फोटोसेशन करावे लागले. अजित पवार सत्तेत सोबत आहेत त्यामुळे आता अजित पवारांच्यावरही बोलता येत नाही. त्यामुळे आता कुणावर बोलायचं ? काय बोलायचं ? प्रसिध्दीस कसं यायचं ? मिडीयात कसं झळकायचं ? हा यक्ष प्रश्न गोपिचंद पडळकरांच्यासमोर आहे. त्यामुळेच ते आता टोपी, टिळा, हिंदूत्वाचे प्रवचन देवू लागलेत. पडळकर खरंच कडवे हिंदूत्ववादी असतील तर देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहाराचं काय ? विधवा, निराधार वृध्द हिंदू मातेची त्यांच्याच माणसाने फसवणूक करून बळकावलेल्या जमिनीचं काय ? हे धर्माच्या चाैकटीत बसतं का ? पडळकरांचे हिंदूत्व देवाच्या जमिनी बेकायदेशीरपणे विकायला मान्यता देतं का ? याचा त्यांनी खुलासा करावा ? हिंदूत्व हे जगायची गोष्ट आहे की भाषण करायची ? याचेही मार्गदर्शन करावे. जर खरंच पडळकर कडवे हिंदूत्ववादी असतील तर त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेला जावे. शिकागोत स्वामी विवेकानंदांनी जगाला हिंदू धर्म सांगितला होता. आता पडळकरांनी शिकागोला जाऊन जगाला हिंदू धर्म सांगावा. पण त्या आधी स्वत:च्या अंत:करणात डोकावून पहावे. आपण खरंच हिंदू धर्म जगतो का ? खरंच हिंदू धर्माप्रमाणे वागतो का ? हे तपासावं मग हिंदूत्वावर बोलावं. पडळकरांच्या तथाकथित हिंदूत्वाची चिरफाड करणारे अजून शेकडो मुद्दे आहेत पण तुर्तास इतकं ठिक आहे.
दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, मो. 9561551006
0 टिप्पण्या