🟪 ‘ऑपरेशन सिंदूर’ गाजवणाऱ्या ‘ब्रह्मोस’ची जन्मकथा 🟩 पाकिस्तानला ब्रह्मोसच्या निर्मात्याने का देऊ केली होती ‘फुकट डिलिव्हरी’?

🟪 ‘ऑपरेशन सिंदूर’ गाजवणाऱ्या ‘ब्रह्मोस’ची जन्मकथा

 🟩 पाकिस्तानला ब्रह्मोसच्या निर्मात्याने का देऊ केली होती ‘फुकट डिलिव्हरी’? 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 04/07/2025 : 

आजवर चाचणी प्रक्षेपणांमध्येच ‘ब्रह्मोस’ची अचुकता सिद्ध झाली होती. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील धावपट्ट्या नष्ट करण्यासाठी याचा वापर केला.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची ताकद सगळ्या जगाने पाहिली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी तळ भारताने उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने कुरापती काढत सीमावर्ती भागांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे हल्ले केले. एकीकडे हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावतानाच पुन्हा असे हल्ले होऊ नयेत, याची तजवीज करण्यासाठी भारताने पाकिस्तानी लष्कराचे कंबरडे मोडले, ते याच ‘ब्रह्मोस’मुळे… ‘फादर ऑफ ब्रह्मोस’ म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई यांनी अलिकडेच या क्षेपणास्त्राची रंजक जन्मकथा विषद केली…

ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राविषयी…

‘पी-१०’ असे आणखी एक नाव असलेले हे लांब पल्ल्याचे, ‘रॅमजेट’ इंजिन असलेले, स्वनातीत (सुपरसॉनिक – ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाणारे) क्रूझ मिसाईल आहे. पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमान किंवा जमिनीवरील प्रक्षेपकावरूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. जमीन, पाणी किंवा हवेतून मारा करता येणारी सर्व प्रकारची ‘ब्रह्मोस' भारतीय सैन्यदलाच्या ताफयात आहेत. साधारणतः २०० ते ३०० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये अण्वस्त्र डागण्याचीही क्षमता आहे. प्रक्षेपणासाठी 'साॅलिड राॅकेट बुस्टर' आणि त्यानंतर 'लिक्विड राॅकेट रॅमजेट' इंजिनचा वापर यामध्ये केला जातो. 'माक ३' (ताशी ३,७०० किलोमीटर) वेगाने हे क्षेपणास्त्र मारा करु शकते. प्रचंड वेगामुळे शत्रूच्या रडारमध्ये दिसण्यापूर्वीच त्याचे काम फत्ते झालेले असते. आतापर्यंत २६ जानेवारीच्या संचलनात, शस्रास्त्र प्रदर्शनांमध्ये किंवा चाचण्यांवेळीच 'ब्रम्होस' बघायला मिळते असे... मात्र 'ऑपरेशन सिंदूर'नंतर झालेल्या युध्दात भारतीय सैन्याने अनेक हवाई तळ नष्ट करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, तेव्हा या क्षेपणास्त्राची खरी ताकद दिसली. त्यानंतर आता जगभरातून क्षेपणास्त्राला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली असतानाच त्याची जन्मकथा नव्याने चर्चिली जात आहे.

स्वप्नातील क्षेपणास्त्राची जन्मकथा...

ए. एस. पिल्लाई यांनी अलिकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या क्षेपणास्त्राची कल्पना कशी आली याची कहाणी सांगितली. ते १९९१ साली अमेरिकेच्या हावर्ड विद्यापीठात संशोधनासाठी गेले होते. या युध्दात 'टाॅमहाॅक' क्षेपणास्त्राची उपयुक्तता सिद्ध होत होती. भारताकडेही असे क्षेपणास्त्र असावे, असावे पिल्लई यांच्या मनात आले आणि त्यांनी अमेरिकेतूनच डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना फोन लावला. कलाम यांनादेखील कल्पना आवडली आणि पिल्लई परत आल्यानंतर त्यावर काम करायचे ठरले. त्यानंतर मायदेशी आल्यानंतर कलाम यांच्या सल्ल्याने पिल्लई रशियाला गेले.‌ माॅस्कोमध्ये रशियाच्या क्षेपणास्त्र विकास विभागाचे (एनपीओ - मॅशिनोस्ट्रोयेनिया) तत्कालीन महासंचालक डॉ. जी. ए. येफ्रेमोव्ह यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी स्वनातीत वेगाने वहन करण्याची क्षमता असलेले इंजिन केवळ रशियाकडे होते आणि येफ्रेमोव्ह यांनी ते तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दर्शविली. कालांतराने भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियाच्या 'एनपीओ'च्या भागिदारीतून 'ब्रम्होस एअरस्पेस' ही कंपनी अस्तित्वात आली. केवळ हे क्षेपणास्त्रच नव्हे, तर त्याचे नावदेखील भारत आणि रशियाच्या संस्कृतींचा मिलाफ होऊन तयार झाले आहे. भारतातील महानद 'ब्रम्हपुत्र' आणि रशियातील 'मोस्कवा' या नदीच्या नावांच्या संगमातून 'ब्रम्होस' हे नाव आकाराला आले आहे.

*'ब्रम्होस'चा प्रत्यक्ष वापर...

आजवर चाचणी प्रक्षेपणांमध्येच 'ब्रम्होस'ची अचुकता सिध्द झाली होती. मात्र 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील धावपट्ट्या नष्ट करण्यासाठी याचा वापर केला. पाकिस्तानने झालेल्या नुकसानीची कबुली दिली नसली, तरी त्यांना हवाई दलाच्या अनेक धावपट्ट्या दोन ते तीन आठवडे 'देखभाल आणि दुरुस्ती' साठी  बंद ठेवाव्या लागल्यामुळे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ दिसली. भारतीय लष्कराचे ८६१ मिसाईल रेजिमेंट, १८८९ मिसाईल रेजिमेंट, ३३४ मिसाईल रेजिमेंट, ८८१ मिसाईल रेजिमेंट, हवाई दलाचे तंजावर (तामिळनाडू) एअर बेस स्टेशन येथे 'ब्रम्होस' तैनात आहेत. नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस दिल्ली, आयएनएस रणवीर तसेच निलगिरी, शिवालिक आणि तलवार श्रेणीच्या युध्दनौकांच्या भात्यात ही क्षेपणास्त्रे आहेत. फिलिपिन्सने आपल्या नौदलासाठी मोठ्या प्रमाणात 'ब्रम्होस'ची आयात केली आहे. याखेरीज रशिया, ब्राझिल, व्हिएतनाम, इंडोनेशिया, ब्रुनेई, इजिप्त, मलेशिया, ओमान, दक्षिण आफ्रिका, व्हेनेझुएला यांनीही या क्षेपणास्त्रखरेदीत रस असल्याचे 'ब्रम्होस एअरोस्पेस'ला कळविले आहे. विशेष म्हणजे पूर्वी एकदा आपल्या शेजाऱ्यांनीही याची किंमत विचारली होती म्हणे... -

पाकिस्तानला 'फुकट' डिलिव्हरी...

दुबईतील एका संरक्षणविषयक प्रदर्शनामध्ये 'ब्रम्होसचे बाबा' ए.एस. पिल्लाई यांना एका पाकिस्तानी लष्कराच्या एका जनरलने "आपले ब्रम्होस क्षेपणास्त्र पाकिस्तानला विकण्यास भारत उत्सुक आहे का," असा प्रश्न विचारला. त्यावर पिल्लई यांनी "पाकिस्तानसाठी या क्षेपणास्त्राची डिलिव्हरी फुकट आहे," असा एक एका वाक्यात हजरजबाब दिला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पिल्लई यांनी स्वतःच अलिकडे एका 'पाॅडकास्ट' मध्ये हा किस्सा सांगितला. त्यावेळी त्यांनी केलेली भविष्यवाणी अखेर १० मे २०२५ रोजी खरी ठरली आणि भारताने 'ब्रम्होस' क्षेपणास्त्रांचा मोठा ताफा पाकिस्तानकडे 'फुकटात' धाडून दिला...सौजन्य : लोकसत्ता

संकलन : यशवंत वाघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या