🟣 मन इंद्रधनू
🟢 जिंदगी तो बेवफा है
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 30/06/2025 :
"जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी |
मौत मेहबूबा है अपनी साथ लेकर जाएगी" ||
किशोर कुमार चे हे गाणे ऐकायला येत होते आणि माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग उभे राहिले.
मध्यंतरी दीड महिन्यापूर्वी सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येची बातमी मनाला विलक्षण चटका देऊन गेली होती. "आत्महत्या"..!!! जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चिला जाणारा विषय आणि खरंतर खूप गहन असा विषय..!! आत्तापर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञ , मानसोपचार तज्ञ , ख्यातनाम मनोविश्लेषक इत्यादी लोकांनी या विषयावर बरच काही लिहिलं आहे. हे लक्षात घ्या की सर्वसामान्य माणसं सहसा आत्महत्येची शिकार होत नाहीत. आतापर्यंत मी जी सर्वसामान्य माणसं पाहिली, या माणसांमध्ये दडपणांना, ताण तणावांना निभावून नेण्याची सवय असते, ओझे बाळगण्याची सवय असते. सर्वसामान्य माणसे ही अतिशय बेसिक म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच धडपडतात. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाची जी असतात ती स्वप्ने पाहतात आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी धडपडतात.
त्याच्या पुढचा जो वर्ग असतो म्हणजे मध्यमवर्गीय लोक.. त्यांची स्वप्नेही मोठी असतात, धडपड देखील मोठी असते आणि गरजा तर प्रचंड असतात.. अर्थात त्या त्यांनीच वाढविलेल्या असतात. या सर्वांच्या मागे धावताना कितीही नाही म्हटलं तरी शरीर आणि मन.. दोन्हीही थकतात. कधीकधी अशा मोठ्या स्वप्नांची ओझी बाळगणाऱ्या माणसांची घुसमट होते.
उच्चवर्गीय म्हणजे उच्चभ्रू समाजातील लोक.. यांची तर बातच अलग असते. *वरकरणी सगळ काही जरी गुडी गुडी दिसत असलं तरी ते तसं असतंच असं नाही*. पैसा जवळ आहे याचा अर्थ सर्वकाही छान आहे असा होत नाही. किंबहुना *पैसा हे सर्व समस्यांचे उत्तर नाही*. ही अशी काही विशिष्ट क्षेत्रातील यशस्वी माणसे ..अर्थात हे त्यांचं बाहेरचं व्यक्तिमत्व असतं असू शकतं. प्रत्यक्षात त्यांना काही मानसिक ताण-तणाव असतील, त्यांच्या काही मानसिक गरजा देखील असू शकतात. कधी कधी काय होतं की या अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना आपला दुःख हलकं करायला कुठेही जागा मिळत नसावी. आपण सर्वसामान्य लोक आपलं दुःख कुठेही व्यक्त करतो..मन हलकं करून टाकतो. आपल्या मनावरचं ओझं, दडपण यांना हर प्रकारे आपण काढून टाकतो. पण ज्याला आपण *हाय प्रोफाईल* व्यक्तिमत्व म्हणतो, अशा लोकांवर मात्र याबाबतीत कळत नकळत अन्याय होतो आणि तो म्हणजे हे लोक सर्वसामान्य लोकांप्रमाणे जास्त कुठे मिसळू शकत नाहीत किंवा समजा ते मिसळले तरी देखील त्यांच्या व्यक्त होण्याला कुठेतरी मर्यादा येतात.
हे सगळं तसं लिहिणं देखील अवघडच आहे, कारण मी ज्या हाय प्रोफाईल व्यक्ती बघितल्या आहेत,त्यांना पाहिल्यानंतर समाजात वावरताना हा मुखवटा घातल्यासारखा वाटतो. प्रत्यक्षात ते कसे असतील, काय असतील आपल्याला माहित नसतं आणि बऱ्याचदा अज्ञानामध्ये सुखच असतं ..नाही का?
आता प्रश्न असा आहे की हे लोक स्वतःला का संपवून टाकतात..? कदाचित माणसाच्या सहनशक्तीला कुठेतरी अंत असतो. कौटुंबिक कलहामुळे ते त्रस्त झालेले असू शकतात. काही अपेक्षा असतात.. अपेक्षाभंगाचं दुःख असतं. त्यामुळे आलेलं नैराश्य पचवता येत नाही.. ना कुणाला दाखवता येत.. ना कोणाशी बोलता येत..!! मग एकदा अशी घुसमट झाली की कधीकधी खूप शहाणा हुशार मनुष्य देखील मौत ला मेहबूबा बनवून अशा पराकोटीच्या निर्णयाला बळी पडतो.
दिवसेंदिवस आत्महत्या होण्याचं म्हणजे करण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे. आता त्याची कारणे खूप आहेत. एकच छोटंसं उदाहरण देते. अगदी मी ज्यांना ओळखते अशापैकीच एक आहे. मध्यंतरी म्हणजे आता त्याला बारा वर्षे उलटून गेली. म्हणजे जवळजवळ एक तपाचा काळ पाठीमागे पडलेला आहे. एका मुलीचं लग्न झालं. मुलगा आता सध्याच्या ट्रेंड प्रमाणे एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर म्हणजे अगदी सहा आकडी पॅकेज वगैरे घेणारा..!! लग्न झाल्यानंतर साधारण एका वर्षाभरातच ज्या कंपनीत तो नोकरीला होता त्या कंपनीने यांना नोकरीतून कमी करण्यासाठी नोटीस दिली. याबद्दल त्याने त्याच्या पत्नीशी देखील चर्चा केली नाही. तो घरीच बसून राहू लागला. ती देखील नोकरी करत होती. एके दिवशी संध्याकाळी कामावरून ती घरी आली. लॅच की लावून तिने फ्लॅटचे दार उघडले आणि जे दृश्य दिसले ते पाहून तिला एकदम शॉक बसला. तिच्या पतीने सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या वेळी त्याचे वय किती तर अवघे २७, तर तिचे वय २५ ..!! आता तिच्यावर काय प्रसंग आला असेल त्यावेळी याची तुम्हीच कल्पना करा. मला ज्यावेळी ही गोष्ट कळली त्यावेळी मला सुद्धा शॉक बसला होता. प्रचंड धक्कादायक बातमी होती ती. तिच्यावर ओढवलेल्या या हृदयद्रावक प्रसंगातून तिला सावरताना किती गोष्टी सांगाव्या लागल्या, काय काय करावे लागले हे मला माहितीये.. आणि म्हणूनच डिप्रेशन अक्षरशः कोणालाही येऊ शकते आणि सध्याचा जो काळ आहे किंवा सध्याच्या काळात जी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये कोणीही डिप्रेशन मध्ये जाऊ शकते आणि आत्महत्या या डिप्रेशन मुळेच होतात. म्हणूनच मनावर दडपण ठेवून जगू नका. वर्तमानात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा.
म्हणूनच म्हणावेसे वाटते की
गम की अंधेरी रात में
दिल को न बेकरार कर |
सुबह जरूर आयेगी
सुबह का इंतजार कर ||
फोटो सौजन्य गुगल
राजश्री (पूजा) शिरोडकर
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर
0 टिप्पण्या