पंढरीच्या पांडुरंगा, बिगी बिगी धाव रे..!

 


पंढरीच्या पांडुरंगा, बिगी बिगी धाव रे..!

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 28/06/2025 : पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारीची परंपरा सुमारे ७०० ते ८०० वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. वारकरी संप्रदायातील लोक वर्षातून एकदा पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही वारी भक्ती, एकता आणि समता दर्शवते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह  अनेक  संतानी या परंपरेला प्रोत्साहन दिले. वारीमध्ये श्रीमंत, गरीब, उच्च निच असा कोणताही भेदभाव मानल्या जात नाही. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पाहून पांडुरंग विटेवर आजपर्यंत उभा आहे. विठ्ठलाला आई वडिलांची सेवा करणारा भक्त प्रिय आहे. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन "याची देही याची डोळा" घेणे म्हणजेच वारी. 

डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे ।

पंढरीच्या पांडुरंगा, बिगी बिगी धाव रे ।।धृ।।

         राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले एक प्रसिद्ध भजन आहे. "पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे" या भजनात भक्त पांडुरंगाला लवकर येण्याची विनंती करत आहे. जणू काही त्यांची नाव (जीवन) पाण्यावर डगमगत आहे. (संकटात) आहे आणि  त्यांना पांडुरंगाच्या मदतीची गरज आहे. हे पांडुरंगा तू लवकर धावत ये आणि मला वाचव. या सांसारिक दुःखातून आणि मायाजालातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराची भक्ती हीच एकमेव नौका आहे. ती आपल्याला भवसागराच्या पलीकडे घेऊन जाऊ शकते. भवसागर म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलेली संसाररुपी सागराची कल्पना. या सागरात अनेक दुःख, अडचणी आणि मोह आहे. परमेश्वरावर श्रद्धा आणि भक्ती ठेवल्याने माणूस या भवसागरातून सुखरुप बाहेर पडू शकतो.

तुला पाहण्याशी देवा, जीव हा भुकेला ।

धीर नाही वाटे देवा, माझ्या मनाला ।

काय सांगू आता देवा, दूर तुझे गाव रे ।।१।।

      हे देवा तुला पाहण्यासाठी माझा जीव भुकेला आहे. एखाद्या व्यक्तीला देवाचे दर्शन व्हावे, त्याची भेट व्हावी अशी तीव्र इच्छा असते. त्याला देवाची ओढ लागली असते आणि तो आतुरतेने देवाची वाट पाहत असतो. ही ओढ केवळ देवाला भेटण्याची इच्छा दर्शवते. देवाला पाहण्यासाठी माझ्या मनाला थोडा सुद्धा धीर नाही. देवाला पाहण्याची ओढ वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली जाऊ शकते. "भेटीलागी जीवा लागलीसे आस" अशीच भावना व्यक्त झाली आहे. देव आपल्या उपासाचा, नवसाचा भुकेला नाही. तो फक्त भावाचा भुकेला आहे. "माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ।।" देवा माझे मन तुझ्या चरणाशी एकरुप होवो किंवा माझे मन तुझ्या भक्तीत लीन होऊ दे. देवा तुझे गाव खूप दूर आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात. "जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा । देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भुक ।।" या संसारातून मुक्ती प्रदान करुन घ्यावे असे वाटत असेल तर विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन त्याच्या गावी नाचत जाऊ या. विठ्ठला तू कृपाघन, दयानिधी आहेस. तूच कृपेचा सागर आहेस.

तुझ्या चरणाशी वाहे, भिमा चंद्रभागा ।

नाही देव पावला, मी झालो अभागा ।

आतातरी देवा मला, एक वेळ पाव रे ।।२।।

 हे पांडुरंगा तुझ्या चरणाजवळ भिमा चंद्रभागा वाहते. या भिमा नदीला पंढरपूर जवळ चंद्रकोरी सारखा आकार असल्यामुळे या भिमा नदीला चंद्रभागा म्हणतात. विठ्ठलाची भक्तीच केली नाही तर देव कसा पावेल. अभागा म्हणजे दुर्भागी, नशिब असा होतो. ज्या व्यक्तीचे नशिब चांगले नाही त्याला सतत वाईट अनुभव येतात किंवा जो नेहमी अडचणीत सापडतो त्याला अभागा म्हणतात. देव पावला नाही म्हणजे देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही किंवा तुमच्यावर देव प्रसन्न नाही असा होतो. तसेच तुमच्या भक्तीला अपेक्षित फळ किंवा प्रतिसाद मिळत नाही. देवा आतातरी मला एकवेळ नक्की पाव. तुझी वारी, तुझी भक्ती, तुझे नामस्मरण सतत मी करीन.

प्रल्हादासाठी नरसिंह झाला ।

दुष्ट मारण्याला देवा, तू सरसावला ।

वारकऱ्यासाठी देवा, ऐक ती हाक रे ।।३।।

       नरसिंह अवतार म्हणजे भगवंत विष्णूचा अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह रुपात घेतलेला अवतार होय. भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू कडून वाचविण्यासाठी भगवान विष्णूनी हा अवतार घेतला. हिरण्यकश्यपूला प्रल्हादाची विष्णू भक्ती अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे त्रास दिला आणि मारण्याचा प्रयत्न केला. भगवान विष्णूने प्रल्हादाला वाचविण्यासाठी खांबातून नरसिंह प्रगट झाले. देवा तू हाकेला धावून येतो. देवा तू वारकऱ्याची हाक ऐक आणि धावत ये. हा वारकरी तुझ्या दर्शनाची आस म्हणून तो पायदळ वारी करतो.

गोरा कुंभाराची, आळुवनी विनवणी ।

भक्त एकनाथा घरी, वाहिलेस पाणी ।

म्हणे दास तुकड्या देवा, गोकुळासी पाव रे ।।३।।

   गोरा कुंभार पांडुरंगाचे नामात मग्न असताना त्याचा मुलगा मातीत तुडविल्या गेला. विठ्ठलाची करुणा भाकली. पंढरीनाथाने त्याची विनवणी ऐकली आणि मूल रांगत रांगत आले. एकदा एक अनोळखी माणूस एकनाथ महाराज यांचे घरी आला आणि महाराजांना म्हणाला की, मला श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायचे आहे. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, श्रीकृष्ण येथे नाही. तो माणूस म्हणाला, महाराज तो तर तुमच्या घरी श्रीखंड्याच्या रुपात कावडीने पाणी भरुन सेवा करीत आहे. "द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरी कावडीने ।।" खरोखरच भगवान श्रीकृष्ण हे १२ वर्षे श्रीखंड्याचे रुपात पाणी भरत होते. देव कुणाच्या तरी रुपात आपल्या घरी येतो आणि सेवा करीत असतो. आपल्याला मदत करीत असतो आणि आपल्याला हे माहित पण नसते. जेव्हा कळते तेव्हा ती व्यक्ती निघून जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गोकुळासी पाव रे. हे विठ्ठला गोकुळात येऊन माझ्यावर कृपा कर किंवा मला मदत कर. पंढरपूरातील वारकरी वाळवंटात विठ्ठलाचे भेटीकरिता गोळा होतात. नामाचा गजर करतात. हेच तर खरे गोकुळ आहे. याच गोकुळात देवा मला भेट रे.

             पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ फोन 99 21 79 16 77              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या