संपादकीय पान.................
🔹अरण्यऋषी हरपला! मारुती चितमपल्ली यांचं निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : अनिल पाटील
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर/
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 19/06/2025 :
महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ख्याती असलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी भाषेमध्ये सुमारे लाखभर नव्या शब्दांची भर घालणारे वन्यजीव संशोधक मारुती चित्तमपल्ली यांचं वृद्धापकाळानं बुधवारी सोलापुरात निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारी आणि रुग्णालयात उपचार घेत होते. तीन चार दिवसांपूर्वीच त्यांना (पुतण्याच्या) घरी आणले होतं. नुकताच ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांचा 'पद्मश्री' हा नागरी किताब देऊन गौरव करण्यात आला होता.
वनविभागात काम करत असताना, त्यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपदा याविषयी खूप सखोल संशोधन केलं आणि त्यावर अनेक पुस्तकंही लिहीली. तसंच पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्सकोशाचे लेखन करुन त्यांनी मराठी शब्दकोशात अनेक नवीन शब्दांची भर टाकली. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेत, केंद्र सरकारनं त्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. मारुती चित्तमपल्ली यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळं सोलापूरचं नाव देशभर पोहोचलं.मारुती भुजंगराव चितमपल्ली हे सोलापूरचे सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, लेखक आणि वन्यजीव अभ्यासक आहेत. १२ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूरमध्ये एका गिरणी कामगार कुटुंबात त्यांचा झाला. चितमपल्ली यांच्या कुटुंबातील वाचनाची परंपरा होती. तसंच पूर्वजांकडून त्यांना निसर्गाच्या जवळ जाण्याची शिकवण मिळाली. त्यांच्या अरण्यविद्येतले गुरू हे लिंबामामा होते.
मारुती चितमपल्ली यांचं शालेय शिक्षण सोलापूरच्या टी. एम. पोरे स्कूल आणि नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून झालं. नंतर, सोलापूरमधील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर, वनविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र यामध्ये विशेष शिक्षण घेतले.
चितमपल्ली यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोयमतूर आणि बंगलोर तसंच दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि डेहराडून येथील विविध संस्थांमध्ये वनशास्त्र आणि वन्यजीवविषयक ज्ञान मिळवलं. त्याचबरोबर, संस्कृत साहित्य आणि भाषेचे अध्ययन नांदेड आणि पुणे येथील पंडितांकडून केलं. त्यांना जर्मन आणि रशियन भाषांचंही ज्ञान होतं.
मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र राज्याच्या वनविभागात ३० वर्षे सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून ते १९९० मध्ये सेवानिवृत्त झाले. तसंच कर्नाळा पक्षी अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या विकासामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
0 टिप्पण्या