" तुम्ही तुमचे थॅलेसेमिया स्टेटस तपासले का ? " डाॅ. मेधा शेटे एमडी (पॅथाॅलाॅजी)

 " तुम्ही तुमचे थॅलेसेमिया स्टेटस तपासले का ? " 

 डाॅ. मेधा शेटे एमडी (पॅथाॅलाॅजी)  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 05/05/2025 :

लोकमत(४मे)मध्ये डाॅ. मेधा शेटे एमडी (पॅथाॅलाॅजी)यांचा " तुम्ही तुमचे थॅलेसेमिया स्टेटस तपासले का ? " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला." ८ मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून ओळखला जातो. तद्अनुषंगाने या आजारासंबंधीची माहिती तपशीलात विशद करणार्‍या या ज्ञानवर्धक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—

        थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे.वारसा हक्काने येणारा हा आजार रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. या आजारात हिमोग्लोबिनमधील ग्लोबिन हे जे प्रोटीन आहे ते अबनार्मल असते. त्यामुळे तांबड्या पेशी तयार होताना त्या विकृत म्हणजेच डिफेक्टिव्ह तयार होतात. याला थॅलेसेमिया मेजर असे म्हणतात. या विकृत तांबड्या पेशी प्राणवायुशी संयोग करू शकत नाहीत. त्यामुळे या आजाराची सर्व लक्षणे दिसतात. भारतात थॅलेसेमिया आजाराची सर्वात अधिक म्हणजे सव्वा लाख मुले आहेत. म्हणून भारताला थॅलेसेमियाची राजधानी म्हणतात. शिवाय दरवर्षी दहा ते पंधरा हजार मुलांची यात भर पडते आहे.थॅलेसेमिया मेजर हा भयानक आजार आहे. या आजारासाठी रक्ताशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आजतागायत कोणतेही औषध निघाले नाही. दुसर्‍या व्यक्तिचे रक्त दर पंधरा ते वीस दिवसांनी घेणे व ते थॅलेसेमीया रूग्णाला चढवणे. दुसर्‍याचे रक्त घेतल्यामुळे अनेक नको ते हिपेटायटिस किंवा एचआयव्हीसारखे आजार होतात आणि लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात ते वेगळेच.अलीकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय निघाला आहे,पण तो खूप खर्चिक आहे.वीस ते पंचवीस लाख रूपये खर्च होतात. या सगळ्याचा ताण त्या कुटुंबावर आणि त्यायोगे सर्व समाजावर पडतो. घरातील एका व्यक्तिला झालेल्या या आजारामुळे कितीतरी घरे उद्ध्वस्त झालेली आहेत.

     जन्माला आल्यावर जसे आपण आपल्या रक्तगटाची तपासतो  करतो त्याचवेळेस त्याच्या बरोबरच थॅलेसिमियाची टेस्ट केली पाहिजे. समजा काही कारणांनी त्यावेळी नाही झाली तर महाविद्यालयात प्रवेश घेताना तरी ही तपासणी आवश्यक करावी. त्याशिवाय प्रवेशच देऊ नये.बरे तरीदेखील चाचणी केली नाही तर लग्नाआधी जसे हल्ली  'प्री-वेडिंग शुटिंग' करतात, त्या ऐवजी किंवा त्याबरोबर प्री-वेडिंग समुपदेशन देखील करून घ्यावे. लग्न पत्रिकेतील गुण जुळतात का नाही हे बघण्यापेक्षा आपली गुणसूत्रे (Genes) जुळतात का नाही,हे बघून घेणे फार महत्त्वाचे आहे. सर्व मॅरेज ब्युरोंनी ही तपासणी करण्याचा आग्रह धरला पाहिजे. तरीही नाही केली तर मॅरेज सर्टिफिकेट देताना ही तपासणी केल्याशिवाय ते सर्टिफिकेट देऊच नये.

       हा आजार आई- वडील दोघेही थॅलेसेमिया 'मायनर' असल्यामुळे होतो. २५ टक्के मुले 'मेजर'होतात.आई- वडिलांनी मुलाला जन्म देण्यापूर्वी ही तपासणी करणे अगदी गरजेचे आहे. ही रक्ताची अगदी साधी सोपी सरळ टेस्ट आहे.त्यालाच HPLC किंवा हाय परफाॅर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी* असे म्हणतात.ही तपासणी आयुष्यात एकदाच करायची आहे. जसा आपला रक्तगट बदलत नाही, त्याप्रमाणे आपले थॅलेसेमियाचे स्टेट्सही बदलत नाही. जवळजवळ सर्व पॅथोलाॅजी लॅबमध्ये ही टेस्ट होते.सरकारी हाॅस्पिटलमध्ये तर ही तपासणी मोफत होते. या रोगापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर प्रत्येकांने आपले थॅलेसेमिया स्टेट्स जाणून घेणे आवश्यक आहे.टेस्टमध्ये जर आपण थॅलेसेमिया 'मायनर' निघालो तर लग्न करताना आपल्या पार्टनरची ही तपासणी करून घ्यायला विसरायचे नाही. डाॅक्टरांच्याकडे गेल्यावर आपण थॅलेसेमिया 'मायनर'आहोत हे सांगायला विसरायचे नाही. कारण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोह किंवा आयर्न देऊनही उपयोग होणार नाही. खूप वेळा डाॅक्टरांना जेव्हा लोह देऊनही काहीजणांचे हिमोग्लोबिन वाढत नाही त्यावेळी मग ते ही थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यायला सांगतात. गर्भारपणात तर सर्वच बायकांची अगदी पहिल्या काही आठवड्यातच ही टेस्ट व्हायला हवी. थॅलेसेमिया स्टेट्स समजून घेतल्यावर तुम्ही नाॅर्मल तरी असाल नाही तर थॅलेसेमिया मायनर तरी असाल. थॅलेसेमिया मायनर हा काही आजार नाही. फक्त तुम्ही या गुणसूत्राचे वाहक आहात,इतकेच. ८ मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस जरी साजरा केला जातो असे म्हटले जात असले तरी यात साजरा करण्यासारखे काहीच नाही. या दिवशी या आजारासंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावी आणि त्यामुळे या आजाराचा संपूर्ण नायनाट व्हावा,जग थॅलेसेमिया मुक्त व्हावे तसेच या आजाराच्या विळख्यातून सर्वांची सुटका व्हावी यासाठी डाॅ.मेधा शेटे यांनी केलेला हा लेख प्रपंच खरोखरच उल्लेखनीय, विचारप्रवर्तक,ज्ञानवर्धक व संबंधितांना अंतर्मुख करून सोडणारा ठरतो हे मात्र तितकेच खरे!

पत्रकार अरूण दीक्षित. 

(८१६०१०५९४०/९४२२६९४६६६)



             संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या