अण्णाभाऊ साठे यांच्या लाडक्या लेकीचे, शांताबाईंचे मुंबईत निधन

अण्णाभाऊ साठे यांच्या लाडक्या लेकीचे, शांताबाईंचे  मुंबईत  निधन 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 05/05/2025 :

अण्णाभाऊंच्या जगप्रसिद्ध “फकीरा” कादंबरीच्या लेखन साक्षीदार शांताबाई यांचे काल वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईमध्ये दुःखद निधन झाले.  

    घाटकोपरच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीत 1958  च्या दरम्यान अण्णा “फकीरा” कादंबरी लिहित होते. सतत तीन महिने अहोरात्र लेखन करून शेवटी अण्णाभाऊ त्या बेहोषीत  अतिश्रमाने खाली कोसळले होते. तेव्हा याच शांताबाईंनी त्यांना सावरले होते. 

         अण्णाभाऊंच्या द्वितीय पत्नी  जयवंताबाई दोडके यांच्या शांता आणि शकुंतला या दोन लेकी.   चिरागनगरच्या झोपडपट्टीत अण्णाभाऊंनी एकाहून एक अशा अप्रतिम कादंबऱ्या आणि कथा लिहिल्या. तेव्हा अण्णाभाऊ आणि जयवंताबाईंच्या सहचर्यामध्ये अण्णाभाऊंची साहित्यगंगा जशी काही दुधडी भरून वाहत होती. त्याच दिवसात अण्णांनी “माकडीचा माळ”, “बरबाद्या कंजारी”, “चित्रा”, “चंदन” “वारणेचा वाघ” , “आवडी” अशा अनेक कथा व कादंबऱ्या  लिहिल्या होत्या. 

     अण्णाभाऊंच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या.  त्यांनी प्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी, कॉम्रेड रेड्डी व शाहीर अमर शेख, कॉम्रेड गव्हाणकर व इतरांच्या सोबत तुरुंगवासही भोगला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 15 ऑगस्टला छोट्या शांता  आणि शकुंतला यांना घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाची आरास बघून  आले होते.

        21 नोव्हेंबर 1955 ला जेव्हा मोरारजीच्या पोलिसांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज देणाऱ्या 15 हुतात्म्यांचा बळी घेतला. त्या रात्री अण्णाभाऊ आपल्या झोपडपट्टीच्या दारात रात्रभर “माझी मैना गावावर राहिली” ही प्रसिद्ध रणलावणी लिहीत  होते. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या साक्षीदार शांता आणि शकुंतला ह्या दोघी बहिणी होत्या. अण्णांसोबत त्या रात्रभर जागल्या होत्या.

        अविवाहित शांताबाई आपल्या भाच्यांकडे म्हणजेच शकुंतला सपताल यांच्या मुलांकडे राहत. संजय, राजेश आणि प्रशांत ह्या  सपताल  बंधूनी आपल्या मातेसमान मावशीची ,शांताबाईंची खूप काळजी घेतली होती. 

कालच वार्धक्याने शांताबाईंचे  वयाच्या  90 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.  गेले काही दिवस त्या  सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. पण लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्यांनी अखेरचा  श्वास घेतला. बोरवली दौलत नगरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. 

     शांताबाईंची व  माझी शेवटची भेट मला आठवते. जेव्हा त्यांनी आपल्या संग्रही असलेला रशियाचा श्रेष्ठ लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा शुभ्र पुतळा मला अभिमानाने दाखवला होता. तो पुतळा अण्णाभाऊ साठे यांना रशियन जनतेने 1960 मध्ये भेट दिला होता. अण्णाभाऊंची स्मृती म्हणून शांताबाईनी  तो जीवापाड जपला होता. 

       दोनच महिन्यापूर्वी शांताबाईंशी  दूरध्वनीवर बोलणे झाले होते. मी  त्यांच्या भेटीसाठी  बोरवलीला निघालो होतो. मात्र त्याचवेळी त्यांना नातेवाईकाकडे जेजुरी येथे जायचे असल्यामुळे त्यांची माझी ती भेट अपूर्णच राहिली. पण शांताबाईंच्या मुखातून अण्णाभाऊंची जी जीवन कहाणी आणि त्यांच्या लेखन समाधी संबंधीच्या अस्सल कथा  मी अनेकदा ऐकल्या आहेत. ज्यातील काही कथा मी माझ्या “अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान” या पुस्तकात प्रकाशित केल्या  आहेत.

       कोरोनाच्या काळात सुद्धा सपताल बंधूंनी आपल्या मातेसमान मावशीला म्हणजेच शांताबाई यांना ज्या ममत्वाने जपले होते. ते मी आणि कॉम्रेड सुबोध मोरे यांनी जवळून पाहिले होते. 

         असो, एवढ्या महान साहित्यिकाच्या ह्या गरीब व स्वाभिमानी लेकीने कधीही शासकीय मदतीची किंवा सहानुभूतीची अपेक्षा केली नाही.  मराठी भाषेच्या नावाने आज-काल कोटी कोटीच्या गुलालाची उधळण सुरू आहे. दुर्दैवाने त्यांच्यामार्फत  अण्णाभाऊंच्या ह्या वारसदारांपर्यंत कोणी कधी पोहोचलेही नाही. अण्णाभाऊंच्या आणि दलित वाङ्मय व संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एका  बलदंड साक्षीदाराचा , माय मराठीच्या लाडक्या लेकीचाच आता दुःखद अंत झाला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 

      आपल्या सहवेदना व्यक्त करण्यासाठी अण्णाभाऊ प्रेमींनी शांताबाईंचे भाचे संजय व राजेश सपताल  यांच्याशी 8828421706 या क्रमांकावर जरूर संपर्क करावा.  

               - विश्वास पाटील

#vishwaspatil #AnnabhauSathe #ShantabaiSathe

#MarathiLiterature #DalitLiterature #Fakira

#Annabhau #IndianLiteraryHistory #RestInPeace

#RIPShantabai #RIP #author #authorvishwaspatil

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या