अकलूज येथे भव्य लेझीम स्पर्धेला प्रारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 9 जानेवारी 2025 : संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ते 11 जानेवारी 2025 या कालावधी साठी आयोजित केलेल्या 19 व्या भव्य लेझीम स्पर्धेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.
विजयचौक अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर)येथे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मैदान पूजन व अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,सह निरीक्षक विश्वास साळुंखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली.यावेळी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, संग्रामसिंह मित्र मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, दीपक खराडे पाटील, प्रदीप खराडे पाटील, रामचंद्र सावंत,ॲड. प्रकाश पाटील, महादेव अंधारे, रावसाहेब पराडे, अभिजीत रणवरे, हर्षवर्धन खराडे पाटील यांचे सह सहकार महर्षि कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ व परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले,जयसिंह मोहिते पाटील यांनी लेझीम खेळाला प्रोत्साहन दिले.ही ग्रामीण खेळाची परंपरा जतन करून वाढवण्याची भूमिका घेतली. मोबाईल आणि टीव्ही मुळे मुले मैदानावर खेळत नाहीत. परंतु संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळांने मागील 19 वर्षापासून लेझीम स्पर्धेच्या माध्यमातून ही परंपरा सुरू ठेवली आहे. हे कौतुकास्पद आहे. लेझीम मुळे शारिरीक तंदुरुस्ती वाढते. अकलूजचा लेझीम खेळ व स्पर्धा राज्याला आदर्शवत आहे. संग्रामसिंह मोहिते पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील व सयाजीराजे मोहिते पाटील हे या स्पर्धेसाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सह. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे म्हणाले, मित्र मंडळांने स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे 60 हजार खेळाडू तयार केले. या खेळाची गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली. येणाऱ्या पिढीला हा सांस्कृतिक वारसा प्रेरणादायी ठरेल.
स्पर्धेचा प्रारंभ प्राथमिक गटातील सहकार महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला वेळापूर संघाने आपला खेळ सादर करुन झाला. तीन दिवसात या स्पर्धेमध्ये प्राथमिक 5, मुले 23 व मुली 27 असे एकूण 55 संघ आपला खेळ सादर करणार आहेत. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, शकील मुलांनी यांनी केले.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये ५ हजार, द्वितीय क्रमांक ४ हजार, तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार व सन्मान चिन्ह याचबरोबर उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट हलगी वादक, उत्कृष्ट घुमके वादक, उत्कृष्ट सनई वादक यांना देखील स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहेत. मंडळाच्या वतीने प्रत्येक संघास मोफत भोजनाची सुविधाही देण्यात आली आहे.
लेझीम स्पर्धा प्राथमिक विभागातील बक्षीस वितरण संपन्न
15 पैकी 15 गुण मिळवून सदाशिवराव माने विद्यालय अकलूज ने प्राथमिक विभागातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 15 पैकी 12 गुण मिळवून महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर प्राथमिक विभागाने जिंकले. तर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे प्राथमिक विभागाने 15 पैकी 8 गुण मिळवून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे हस्ते प्राथमिक विभागातील बक्षीस वितरण झाले.
0 टिप्पण्या