संपादकीय..............✍️
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/01/2025 : २६ जानेवारी हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला गेला असता. १९३० मध्ये लाहोरच्या पं. नेहेरुंच्या अध्यक्षतेखालील अधिवेशनात किमान वसाहतीना स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली. जर वर्षभरात ही मागणी पूर्ण झाली नाही तर २६ जानेवारी १९३१ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले. याप्रमाणे कोलकत्त्यात सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा ध्वजासह विराट मोर्चा काढला. त्यावर झालेल्या लाठीहल्यात सुभाषबाबू जखमी झाले. त्यांना अटक झाली. त्यानंतर इंग्रजाकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले ते १५ ऑगस्ट १९४७ ला पण २६ जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. १९५० साली या दिवशी स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य.. समता, बंधुता, मानवता.. लोकशाही या मुल्यावर आधारित राज्य घटनेनुसार राज्यकारभार सुरू झाला.जगातील सर्वात मोठी आणि उत्तम अशी ही भारतातील लोकशाही. कायद्याचे राज्य निर्माण झाले. शेवटच्या माणसाच्या हक्काचे रक्षण होत आहे. ही सर्वोत्तम राज्यघटना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेत देशाला बहाल केलीय. स्वतंत्र भारतात ५६० अधिक ५ अशी ५६५ संस्थाने विलीन झाली होती. तसेच लवकरच पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्या ताब्यातील प्रदेश पण भारतात आले. या सर्वच लोकांना लोकशाही लाभल्याने त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. प्रत्येक नागरिकाला देशाच्या राज्य कारभारात सहभाग घेता येवू लागला. प्रत्येक मतदाराला राजा म्हणून सन्मान प्राप्त झाला. हे सारे घडले ते संपूर्ण भारतातील लोकांच्या मनात भारत मातेविषयी असलेल्या प्रेमामुळे. केवळ भारतमातेच्या कुशीतच आम्ही सुरक्षित आहोत. भारत हा आमच्यासाठी एकमेव देश आहे जिथे आम्ही आजन्म जगण्याचे स्वातंत्र्य उपभोगू शकतो.. इथेच मानवता आहे, ही जाणीव सर्वांना आहे. राजधानीत उद्या होणाऱ्या प्रदर्शनात महाराष्ट्राने 'मधाचे गाव' संकल्पना मांडून शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य केले आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्य लोक खादीचे एकतरी वस्त्र खरेदी करतात. आपल्या देशात वेदमंत्र प्रिय आहेतच. पण पारतंत्र्यापासून मुक्ती होण्यासाठी मुक्ती मंत्र म्हणला गेला होता. आज आम्ही स्वतंत्र आहोत. आता या स्वातंत्र्याचे मोल जाणून भारतमातेवर निस्सिम प्रेम करणारा मंत्र हा वेदमंत्रापेक्षाही श्रेष्ठ ठरणार आहे. काया.. वाचा.. मनाने भारतमातेला वंदन करतांना ही देशभक्ती व्यक्त व्हावी. निस्सिम स्वदेश प्रेम हाच आजचा वेद मंत्र आहे.
🇮🇳 ध्वजारोहण व ध्वजवंदन यामधील फरक
भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तो आपला स्वातंत्र्य दिन होय. त्यादिवशी झेंडा खालून वर नेला जातो व मग फडकावला जातो. दिल्लीत लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते.
२६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारले गेले. त्या दिवसाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजवंदन केले जाते. झेंडा ध्वजाच्या वरच्या टोकाला असतो तो तिथेच फडकावला जातो. दिल्लीत राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. या दिवशी परदेशी पाहुणे आमंत्रित केले जातात.
0 टिप्पण्या