"चेस केवळ एक खेळ नाही, तर तो जीवनातील रणनीती शिकवणारा महत्त्वपूर्ण खेळ आहे"- खा. धैर्यशील मोहिते-पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 2 जानेवारी 2025 : "चेस केवळ एक खेळ नाही, तर तो जीवनातील रणनीती शिकवणारा महत्त्वपूर्ण खेळ आहे". असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. माळशिरस तालुका चेस असोसिएशनची वार्षिक बैठक चेस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीत क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना, "मला आनंद आहे की, माळशिरस तालुका चेस असोसिएशनने बुद्धिबळ खेळाचे महत्व वाढवण्यासाठी प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यापुढे देखील माळशिरस तालुक्यातील चेस संघटना मेहनतीने तालुक्यात चेस खेळाचा अधिक प्रसार करतील व खेळाडू घडवतील" असे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माळशिरस तालुका असोसिएशनतर्फे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील क्रीडा आणि बुद्धिबळ क्षेत्राला प्रोत्साहन मिळाल्याचे विशेषतः अधोरेखित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळवणाऱ्या चि.श्रीराम राऊत याचा सन्मान
श्रीराम राऊत याने बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरीने आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले. या यशाबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.याच बरोबर महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे घेतलेल्या प्रशिक्षक परीक्षेत यश मिळवलेल्या अभिजित बावळे,अनिता बावळे आणि कार्नाक्षी जाधव यांना गौरविण्यात आले. या नव्या प्रशिक्षकांनी बुद्धिबळ प्रचार आणि प्रोत्साहनासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी तालुक्यात बुद्धिबळ खेळाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाने सर्व उपस्थितांना प्रेरणा देऊन सकारात्मक ऊर्जा प्रदान केली.यावेळेस संजय राऊत, सरतापे, संग्राम भांगे, राम गाडे, प्रभावती लंगोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या