💢 ‘शरीरावर अनेक जखमांमुळे शॉक ;‘ 🅾️ परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर

 


💢 ‘शरीरावर अनेक जखमांमुळे शॉक ;‘

🅾️ परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला 

समोर 

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव/

वृत्त एकसत्ता न्यूज 

 अनिल पाटील /आकाश भाग्यवंत नायकुडे

पेठ वडगाव /मुंबई दिनांक 17/12/2024 :

परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात वातावरण तापलं होतं. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत होता. मात्र, पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण ‘शरीरावर अनेक जखमांमुळे शॉक ‘ असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला होता. याठिकाणीही शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले. यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

*प्रकाश आंबेडकर आक्रमक भूमिका..

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण, शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोमनाथ सुर्यवंशी – एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होते. ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते. आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

*सुषमा अंधारेंचा पोलिसांवर आरोप

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसून येत होत्या. तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला आहे. पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे गोरगांड या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशाराही सुषमा अंधारे यांच्याकडून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या