ते खरोखरच पुन्हा आले होते. पुन्हा पुन्हा आले होते.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25 डिसेंबर 2024 :
१७ एप्रिल १९९९. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातले सरकार अविश्वासदर्शक प्रस्तावावर झालेल्या मतदानात २७० विरुद्ध २६९ अशा केवळ एका मताने पराभूत झाले.
गिरिधर गमांग हे काँग्रेसचे खासदार या तारखेच्या एक महिना आधी ओडिशाचे मुख्यमंत्री बनले होते. तरी त्यांनी अद्याप लोकसभेचा राजीनामा दिलेला नव्हता. तेव्हा सरकार पडणारे एक मत त्यांचे धरायचे की अन्य कोणाचे, हे सांगता येत नसले तरी हे सरकार पडले ही वस्तुस्थिती. शिवाय सोनियाम्मांनी नंतर 'अंतरात्म्याचा आवाज' वगैरे नौटंकी करत स्वतः पंतप्रधानपदाचा त्याग करत स्वतःऐवजी मौनीबाबा या स्वतःच्या खेळण्याला त्या पदावर बसवले, यावर ज्यांचा विश्वास असतो, त्यांना हे माहीत नसते की याच सोनियाम्मांनी वाजपेयी सरकार पडल्यावर त्यांच्या जागी बसण्याचा प्रयत्न केला होता. वाजपेयींचे सरकार पाडण्यात शरद पवार यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांची स्वतः सत्तेचे नेतृत्व करण्याची भूक या प्रयत्नांमधून न भागल्यामुळे त्यांनी सोनियाम्माविरुद्ध बंड केले आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यामुळे त्यातून त्यांच्यासाठी काहीच निष्पन्न झाले नाही. पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत एक तरी देशहिताचे काम केल्याचे आढळले तरच आश्चर्य वाटावे अशी स्थिती.
त्यापूर्वी म्हणजे १९९६मध्ये वाजपेयी सरकार केवळ तेरा दिवस टिकले. बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी काही पक्षांनी ऐनवेळी विश्वासघात केल्यामुळे त्यांनी मतदानापूर्वीच राजीनामा दिला. आज राजीनामा द्यावा लागत असला तरी आपण नव्या ताकदीने परत येऊ, असा आत्मविश्वास मात्र त्यांनी दाखवला होता. ते आजच्या भाषेतले "मी पुन्हा येईन"च होते. ते भाषण आजही ऐकण्यासारखे आहे. देशाच्या इतिहासात कदाचित या दोनच वेळी; म्हणजे १९९६मध्ये आणि नंतर १९९९मध्ये सरकार पडण्याचे दुःख देशातील सर्वसामान्य जनतेला झाले असेल.
'इतरांपेक्षा वेगळा पक्ष' ही भाजपची ओळख. वर उल्लेख केलेल्या वाजपेयींच्या ऐतिहासिक भाषणातून आणि त्यांच्या कृतीमधून ती अधोरेखित झाली. काँग्रेसने आधीही व यावेळीही देशहिताचे राजकारण करणाऱ्या जनसंघ व भाजपविरुद्ध नेहमीच खुनशी भूमिका घेतल्याचे दिसेल. धर्मांध मुसलमानांनी गोध्रा रेल्वे स्थानकात ट्रेनचा डबा जाळून साठएक कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या घटनेमुळे गुजरातमध्ये जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यावरून गुजरातचे नूतन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व नंतर गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांना काँग्रेसने ज्या खुनशीपणे लक्ष्य केले, तसे उदाहरण ब्रिटिश गेल्यानंतर भारतात क्वचितच सापडेल. मात्र त्यामुळे मोदी यांची लोकप्रियता वाढत गेली आणि काँग्रेस आणखी गर्तेत गेली.
एक बाजू सातत्याने खुनशीपणा करेल, त्यांचे बहुतेक राजकारणी देशासाठीची कोणतीही दृष्टी नसताना केवळ सत्ता उपभोगण्यासाठी विधिनिषेधशून्य राजकारण करत कोणत्याही थराला जातील; भाजपने मात्र आक्रमक भूमिका घेऊ नये, अशा मताचे असलेले लोक कोणत्या आत्मघातकी मानसिकतेचे आणि डिप्रेशनखाली असतात हे वेगळे सांगण्याची गरज नसते.
या देशातील राजकीय सकारात्मकतेचा अंत झाल्याचा जिवंत अनुभव अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला. खुनशी बाजूशीदेखील मवाळपणे वागण्याचे त्यांचे धोरण त्यांच्यासोबत संपले. 'जशास तसे' हे खमकेपणाचे शिवाजीराजांचे धोरण भाजपला माहीत नव्हते असे नाही. कारण इंदिरा गांधी या शब्दशः देशद्रोही पंतप्रधानांच्याही आधी त्यांचे पिताश्री जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असलेले जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी श्रीनगरमधील कैदेतून जिवंत परत येणार नाहीत याची पुरती दक्षता घेतली होती. याच नेहरू-गांधी कुटुंबाने मुखर्जीच नव्हे, सरकारमध्ये राहून आपल्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या इंदिरा गांधींना ब्रिटनमध्ये राजदूत म्हणून पाठवण्याचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ठरवल्याचे कळल्यावर त्यांना ताश्कंदहून भारतात जिवंत परत येऊच दिले नव्हते. अशा देशघातकी, स्वयंकेंद्री आणि देशहिताची कोणतीही दृष्टी नसलेल्या काँग्रेसी सरकारविरुद्ध मवाळपणाने वागण्याबद्दल वाजपेयींना दोष देण्यात अर्थ नाही. परंतु हा मवाळपणा त्यांच्यासोबतच संपला हेही त्याच्याबरोबर लक्षात घ्यावे लागेल.
अटलबिहारी असोत, जगन्नाथराव जोशी असोत किंवा भाजपचा अन्य कोणी वक्ता; त्यांच्या देशप्रेमाने ओथंबलेल्या भाषणांनी थरारून जाणार नाही असा क्वचितच कोणी श्रोता सभेत असेल. परंतु नेहरूंच्या काळापासूनच काँग्रेसने निवडणुका भ्रष्ट केलेल्या असल्यामुळे निवडणुकीचा निकाल वेगळा लागत नसे. या संदर्भात अटलबिहारींच्या कोल्हापुरातील एका सभेचे उदाहरण देता येईल. त्यांच्या सभेला आलेले बायाबापडे त्यांच्या वक्तृत्वाने भारावून गेले होते. देशाच्या भल्यासाठी काय काय व्हायला हवे हे ते अतिशय आत्मीयतेने सांगत असत. त्यांनी आपल्या देशाचा गौरवशाली वारसा रंगवून सांगितल्यावर आज आपल्या देशाची अवस्था कशी झाली आहे, हे अतिशय कळकळीने सांगितले की श्रोत्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होत असे. त्यांच्या एका सभेला हजर राहिलेल्या एका काँग्रेसी पैलवानाने बोलून दाखवले होते. "या लोकांना राजकीय जोर कसा लावायचा हे समजत नाही हे आपले नशीब. यांचे भाषण ऐकून त्यांचे सगळेच हिंदी समजत नसले तरी डोळ्याला पदर लावणाऱ्या आपल्या बाया पहा. यांना आपल्याकडेच आणखी एखादी सभा घेण्याचे सुचत नाही म्हणून; नाही तर निवडणुकीच्या दिवशी आपण आपले नेहमीचे कितीही धंदे केले तरी आपल्या या 'शीट'चे काही खरे नव्हते."
आज अटलबिहारींचा शंभरावा जन्मदिन.
राजेश कुलकर्णी
२५ डिसेंबर २०२४
0 टिप्पण्या