संघाचे सामर्थ्य.. नव्हे संघ संमोहन

संघाचे सामर्थ्य.. नव्हे संघ संमोहन

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 27/11/ 2024 :

महाराष्ट्र विधानसभेला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला घवघवीत यश मिळाले. ते कसे मिळाले हा संशोधनाचा वेगळा विषय आहे. पण या घवघवीत यशाचे एक मानकरी म्हणून नव्हे तर विशेष मानकरी म्हणून काही तथाकथित राजकीय विचारवंत आर.एस.एस. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना मोठे क्रेडिट देत आहेत. संघाने ही निवडणूक मनावर घेतली म्हणून मतदान टक्केवारी वाढली इथपासून ते अगदी संघ स्वयंसेवकांनी घेतलेल्या अफाट मेहनतीचे हे फळ आहे असे सांगण्यापर्यंत ही मजल जाते. संघ जरी स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणून सांगत असला तरी संघ ही प्रत्यक्षात राजकीय संघटनाच आहे हे नोंद करावे लागेल. आजकाल अगदी संघातील काही लोक देखील हे उघडपणे बोलून दाखवतात. मग अशावेळी महाराष्ट्र विधानसभा बंपर जीत नोंदवण्यात संघाचा विशेष वाटा आहे असं वारंवार का सांगण्यात येते याची थोडी चिकित्सा आवश्यक ठरते. काही प्रश्न मनात उभे राहिले पाहिजेत.जेणेकरून या विषयातील नेमका अर्थ शोधला जाईल.

*संघ व त्यांचे स्वयंसेवक.... खूप मेहनत घेतली असे सांगण्यात येते. ही मेहनत तुम्ही उघड्या डोळ्यांनी कुठे पाहिली का ? महाराष्ट्रात संघ स्वयंसेवकांनी लावलेला एखादा विशेष बूथ तुम्ही पाहिलाय का ? संघ शिस्तबद्ध आहे असे सांगितले जाते मग संघाचा गणवेश घालून प्रचारात उतरलेला संघ स्वयंसेवकांचा थवा कुणी पाहिला का ? एरवी स्वतःचे गुणगौरव करताना भूकंप असो वा महापूर येथील मदतकार्यात संघ कार्यकर्ते आपल्या गणवेशासहीत दाखवले जातात. मग विधानसभा निवडणुकीत असे चित्र का दाखवले जात नाही? संघ स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली तर ती मेहनत त्यांनी अजित पवार गटांसाठी घेतलीय का ? अजित पवार गट दूर करा असे सल्ले देणारे संघाचे राजकीय तज्ञ यांचे उत्तर देतील का ? जो संघ विधानसभा इतक्या ताकदीवर जिंकण्यात विशेष वाटा उचलतो तो संघ लोकसभेवेळी गैरहजर होता यावर कुणाचा विश्वास बसेल का ? मग लोकसभेला मिळालेल्या कमी प्रतिसादाचे अपश्रेय घेण्यात संघाला कमीपणा वाटतो का ? संघ भारतभर पसरला आहे है वास्तव आहे. मग फक्त महाराष्ट्रातच संघ यशस्वी ठरला आणि झारखंडमध्ये अयशस्वी ठरला असे मानावे का ? तसे संघाने स्पष्ट करावे. महाराष्ट्र विधानसभेत संघाशी थेट संबंधित काही उमेदवार होते पण ते निवडून आले नाहीत.काही जणांचे डिपाॅझीट जप्त झाले असावे.याचे अपश्रेय कुणाच्या नावे नोंदवावे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येणे आवश्यक आहे.*

"यशाचे भागिदार अनेक असतात पण अपयशाला भागिदार नसतो" हे कटू सत्य आहे. महाराष्ट्र विधानसभेला घवघवीत यशाचे विशेष श्रेय जे तथाकथित राजकीय विचारवंत संघाला विशेषपणे बहाल करतात त्यांचा नेमका हेतू काय ?संघ छुप्या पध्दतीने अशी राजकीय यशस्वी उलाढाली घडवतो असे समर्थन असेल तर छुप्या कार्य पध्दतीनचे गुणगान यशस्वी झाल्यानंतर उघडपणे का केले जाते ? प्रश्न विचारला पाहिजे.संघ यशस्वी ठरतोय हे पाहून कित्येक जण संघाच्या वळचणीला लागून स्वतःची राजकीय गणिते बांधण्यात रांग लावतील हा हेतू आहे का? यातुन नक्की संघ विचारधारा बळकट होईल. पण याकरिता या लोकांसमोर जे तथाकथित वास्तव म्हणून ठेवलं जातय त्याचा नेमका पाया शोधला जावू नये का ? निवडणूक यशाची सगळी गणिते आकड्यावर चालतात. जातीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक असे आकडेवारी समोर ठेवून निवडणूक यशापयश मोजले जाते. संघ व शाखा यांची आकडेवारी उपलब्ध आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र विधानसभा यशात त्यांचा टक्का मोजणे कठीण नाही. पण तशी कोणतीही आकडेवारी समोर न ठेवता राजकीय विचारवंत जेव्हा अगदी सहजपणे व ठासून विशेष नोंद म्हणून संघाचा उल्लेख करतात तेव्हा त्यामध्ये असणारै काळेबेरे हेतू ध्यानात घेणे आणि विचारार्थ समोर ठेवणे आवश्यक ठरते... याकरिता हा लेखनप्रपंच!

उमेश सूर्यवंशी , कोल्हापूर

९९२२७८४०६५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या