रानभाजी - पेंढारी

 

रानभाजी - पेंढारी  

शास्त्रीय : तमिलनाडिया युलिजिनोसा

कुळ :  रुबिएसी

स्थानिक : पेंढारी, पेंढू, पेंढूर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 21/9/ 2024 : पेंढारी ही वनस्पती श्रीलंका, भारत, पाकिस्तान, म्यानमार या देशांतील जंगलात आढळते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आसाम येथील जंगला मध्ये प्रामुख्याने आढळते. महाराष्ट्रात पश्‍चिम घाट परिसरात तसेच कोकण, नांदेड या भागांत पेंढरीची लहान झाडे आढळतात. पेंढरचा लहानसा वृक्ष सुमारे २० फूट उंची पर्यंत वाढतो.

खोड - खोडाचा घेर लहान असतो. साल तांबूस तपकिरी रंगाची, साधारण खडबडीत.

फांद्या - फांद्या अनेक, कठीण, चार कोनी, फांद्यांच्या पेरा पासून २ ते ४ टोकदार १.४ सेंमी लांब तीक्ष्ण काटे तयार होतात. 

पाने - साधी १० ते १२ सेंमी लांब व ६ ते ७ सेंमी रुंद. प्रत्येक पेरा पासून तीन पाने तयार होतात. पाने गुळगुळीत, चकाकणारी, लंबगोल परंतु देठाकडे निमुळती. पानांवर ६ ते ८ शिरांच्या जोड्या, पानांचे देठ आखूड. 

फुले - फुले पांढरी, आकर्षक, द्विलिंगी, नियमित, ३ ते ४ सेंमी व्यासाची, सुवासिक, एकांडी, पानांच्या बेचक्‍यातून येतात. फुलांचे देठ अगदी आखूड, पुष्पमुकुट पाच दलांचा, हिरवा, साधारण जाडसर. पाकळ्या ५ ते ७ एकमेकांस चिकटलेल्या, पुष्पनळी आखूड, पुष्पनळीच्या मुखावर केसांचे वलय. पाकळ्या गोलाकार, जाड, बाहेरून गुळगुळीत, आतील बाजू लोमश. पुंकेसर ५ ते ७ केसर तंतूरहित. बीजांडकोश दोन कप्पी, परागवाहिनी आखूड, टोकाकडे मोठी व जाड. 

फळे -  फळे गोलाकार अंडाकृती, लंबगोलाकार, लहान लिंबाएवढी, पेरू सारखी दिसतात. फळे पिकल्यावर पिवळी. बिया अनेक, गरात लगडलेल्या. फळे खातात. या वनस्पतीला मे जून महिन्यात फुले येतात. त्यानंतर फळे तयार होतात.

औषधी गुणधर्म

# पेंढरीचे कच्चे फळ औषधात वापरतात. # पेंढरीचे पिकलेले फळ मधुर, शीतल, मूत्रजनन गुणधर्माचे आहे, तर कच्चे फळ स्तंभन आहे. # जुलाब, अतिसार व आंवेत कच्चे फळ भाजून देतात. # फळाचे फक्त टरफल व गर देतात. बिया देत नाहीत.

भाजीचे औषधी गुणधर्म

# पेंढरच्या कच्च्या फळांची भाजी बिया न घेता करतात. फळांच्या टरफलाची व गराची भाजी करतात.

# पेंढरीची भाजी ग्राही व थंड गुणधर्माची आहे. # पोटात कळ मारून जुलाब होत असल्यास, आंव पडत असल्यास पेंढरीच्या कच्च्या फळांची भाजी दिल्याने लक्षणे त्वरित कमी होतात. # लघवी कमी होत असल्यास, लघवीची जळजळ होत असल्यास पेंढरीच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.

पाककृती

# साहित्य - पेंढरीची कच्ची फळे, तिखट, मीठ, हळद, तेल, जिरे, मोहरी, साखर, काळ्या तिळाचे कूट इत्यादी. 

# कृती - पेंढरीची कच्ची फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत व कुकर मध्ये वाफवून घ्यावीत. नंतर उकडलेल्या बटाट्याप्रमाणे फोडी कराव्यात व त्यातील बिया काढून टाकाव्यात. कढईत तेल तापवून जिरे मोहरीची फोडणी करावी. मग त्यावर उकडून घेतलेल्या फळांच्या फोडी फोडणीत घालाव्यात. नंतर तिखट, मीठ, हळद, थोडी साखर व काळ्या तिळाचे कूट घालून भाजी वाफवून घ्यावी.

डॉ. मधुकर बाचूळकर

9730399668

लेखक श्री. विजयसिंग यादव कला आणि शास्त्र महाविद्यालय, पेठवडगाव, जि.कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत

स्त्रोत: अ‍ॅग्रोवन

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या