रानभाजी - नळी
शास्त्रीय : आयपोमिया ऍक्वेटिका
कुळ : कोन्वॉलव्हिलेसिई
स्थानिक : नाळ, नाळी
इंग्रजी : वॉटर स्पिनॅच
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क / वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे / आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/9/2024 : नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. ही भारतात सर्वत्र, पण गुजरात मध्ये मुबलक प्रमाणात आढळते. ही वनस्पती श्रीलंका तसेच आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांमधील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. महाराष्ट्रात ही वनस्पती सर्वत्र आढळते. नळीची भाजी ही वर्षायु किंवा द्विवर्षायु वेलवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात.
खोड - नाजूक, लांब, चिखलावर सरपटणारे किंवा पाण्यावर तरंगणारे, पोकळ असते. पेरांजवळ मुळे फुटतात.
पाने - साधी, एका आड एक, ५ ते १२.५ सेंमी लांब व ३.२ ते ७.५ सेंमी रुंद, अर्धवर्तुळाकार, आयताकृती किंवा साधारण लांबट त्रिकोणाकृती, लघुकोनी शल्याकृती, हृदयाकृती किंवा लांब, अरुंद, टोकदार. देठ ३.७ ते १२.८ सेंमी लांब, द्विकोनी, पोकळ.
फुले - द्विलिंगी, नियमित, १ ते ५ फुले असलेल्या पुष्पबंधाक्षात येतात. पुष्पअक्ष पानांच्या बेचक्यातून तयार होतो. १.३ ते १० सेंमी लांब. फुलांचे देठ २.५ ते ५ सेंमी लांब. पुष्पकोश ५ दलांचा. पाकळ्या ५, पांढऱ्या किंवा जांभळट पांढऱ्या, एकमेकास चिकटलेल्या नरसाळेकृती. पुष्पनलिका व कंठ फिकट जांभळे. पुंकेसर ५ असमान, तळाशी पाकळ्यांना चिकटलेले, केसाळ. बीजांडकोश दोन कप्पी, परागवाहिनी एक, पुष्पनलिकेपेक्षा किंचित लांब, परागधारिणी दोन, ग्रंथीयुक्त. या वनस्पतीला नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत फुले येतात.
फळे - बोंडवर्गीय, बिया २ ते ४, लोमश.
भाजीचे औषधी गुणधर्म
# या वनस्पतीचे संपूर्ण अंग (पंचांग) औषधात वापरतात. # ही वनस्पती दुग्धवर्धक व कृमीनाशक गुणधर्माची आहे. # पांढरे डाग, कुष्ठरोग, पित्तप्रकोप आणि तापात ही वनस्पती उपयुक्त आहे, तसेच कफ व वातवर्धक आहे. # ही वातानुलोमक असून, दाह कमी करते. # कावीळ, श्वासनलिका दाह व यकृत विकारात या वनस्पतीचा वापर करतात. # स्त्रियांना मानसिक आणि सामान्य दुर्बलता आलेली असल्यास ही वनस्पती शक्तीवर्धक म्हणून देण्याची प्रथा आहे. # आर्सेनिक आणि अफूच्या विषबाधेत वांतीकारक म्हणून या वनस्पतीचा वापर करतात. # पाने ज्वरातील प्रलापात निर्देशित करतात. # सुकविलेला अंगरस जुलाब झाल्यास देतात. # नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते.
पौष्टिक रानभाजी
शंभर ग्रॅम नळीच्या भाजीत ०.२ ग्रॅम मेद, ११३ मिलिग्रॅम सोडियम, ३१२ मिलिग्रॅम पोटॅशियम, ३.१ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २.१ ग्रॅम फायबर, २.६ ग्रॅम प्रथिने, १२६% व्हिटॅमिन-ए, ७% कॅल्शियम, ९१% व्हिटॅमिन-सी, ९% लोह, ५% व्हिटॅमिन-बी-६, १७% मॅग्नेशियम हे घटक आढळून येतात. १०० ग्रॅम भाजीचे सेवन केल्यास शरीरास सुमारे १९ कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. यामुळे नळीची भाजी एक महत्त्वाची पौष्टिक रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे.
पाककृती-१
# साहित्य - नळीची भाजीची पाने देठासहित व टोकांकडील कोवळी खोडे, कांदा, लसूण, बटाटा, तेल, मीठ, हळद, हिरवी मिरची इ.
# कृती - भाजी स्वच्छ धुऊन घ्यावी. भाजीची पाने चिरून घ्यावीत. पानांचे देठ व कोवळी खोडे यांचे छोटे व लांब तुकडे करावेत. कुकर मध्ये भाजी वाफवून घ्यावी. कांदा बारीक चिरावा. लसूण पाकळ्यांचे लहान तुकडे करावेत. बटाट्याचे गोलाकार पातळ तुकडे (वेफर्स प्रमाणे) करून ते तळून घ्यावेत. कढईत तेलामध्ये कांदा व लसूण लालसर होई पर्यंत परतवून घ्यावेत. हिरव्या मिरचीचे लांबट चिरलेले तुकडे टाकून परतावेत. नंतर वाफवलेली भाजी फोडणीत परतून घ्यावी. आवश्यकते प्रमाणे मीठ व हळद टाकून भाजी तयार झाल्यानंतर, त्यावर तळलेले बटाट्याचे तुकडे पसरावेत.
पाककृती-२
# साहित्य - देठासहित पाने व कोवळी खोडे, भिजवलेली मूगडाळ, कांदा, तेल, मीठ, हळद, तिखट इ.
# कृती - पाने, देठ, कोवळी खोडे बारीक चिरून घ्यावीत. कढईत कांदा लालसर होई पर्यंत तळून घ्यावा. चिरलेली सर्व भाजी घालून भाजी परतून घ्यावी. भिजवलेली मूगडाळ, तसेच तिखट, मीठ व हळद घालून भाजी परत चांगली परतून घ्यावी. मंद आचेवर ठेवून भाजी शिजवावी.
डॉ. मधुकर बाचूळकर
संदर्भ : विकासपीडिया/अॅग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या