रानभाजी - शेंदळी

 

रानभाजी - शेंदळी  

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज ष

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/9/ 2024 : खानदेशात शेंदळी नावाने प्रचलित असलेल्या या काकडी वर्गीय फळभाजीला प्रदेशनिहाय वेगवेगळे नाव आहे. काळी भागात शेंदाड म्हणूनही याला ओळखले जाते आणि खरबुजा प्रमाणे खाल्ले जाते. परंतु कच्चे फळ कडू लागते तर पिकल्यावर कडवट पणा कमी होवून आंबट पणा येतो. आधीच्या वर्षी पडलेले बीज पावसाळ्यात निसर्गतः उगवन होवून उगवणारी रान फळभाजी आहे. क्वचितच बाजारात दृष्टीस पडणारी शेंदळी खेड्यातल्या शेतकरी कुटुंबाच्या भोजनात अधून मधून आढळते. पावसाळा सरता सरता पक्व झालेल्या शेंदळी फुटून बी शेतात पडते व पुढच्या पावसाळ्यात पुन्हा उगवून येते. अलीकडे तणनाशकांच्या वापरामुळे पूर्वी सहज नजरेस पडणारे शेंदळीचे वेल आता दिसत नाहीत. ज्वारी ,बाजरी, मका , तूर, कापूस या सारख्या पिकात पावसाळा संपूनही शेंदळीचे वेल दिसतात. अंतर मशागत करतांना हे वेल जपले जातात. 

शेंदळीचे वेल सावलीतही चांगले पसरत असल्याने कोणत्याही उंच वाढणार्‍या पिकात चांगले येते, पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप हंगामातील इतर पिकांची पेरणी करतांना शेंदळीची लागवड करावी. तसेच फळबागांमधे पण शेंदळी चांगली येते व सजीव आच्छादन होते. फळबागेत एकदा शेंदळी लावली कि पुढे दरवर्षी ती नैसर्गिकरीत्या उगवून उपलब्ध होत राहते. शहरात ही उपलब्ध होत नसल्याने शेंदळी ला चांगली मागणी आहे. त्यामुळे तीची पेरणी करून एका रानभाजीची उपलब्धता होत रहाते. तसेच शेंदळी कापून तिला मीट व दही लावून उन्हात किंवा ड्रायर मधे वाळविल्यास ती अधिक चविष्ट बनते व वर्षभर व्यवस्थित राहून तीचा आहारात समावेश करता येतो. ह्या वाळवलेल्या शेंदळीला तळून खाल्ली जाते. शेंदळीचे संवर्धन झाल्यास शेतकर्‍यांना कमी खर्चाच्या आंतरपिकातून उत्पन्न मिळेते. यावर विशेष असे कुठले रोग किड येत नाही. फळमाशीचा पण तेवढा प्रादुर्भाव दिसत नाही. आंतरपिक असल्याने मुख्य पिकासोबत शेंदळी चे उत्पादन येते.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या