"नृत्यरंगम कलामंदिर" आयोजित "भरतनाट्यम नृत्य" सादरीकरण महोत्सव रविवारी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क / वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/9/2024 : यशवंतनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील नृत्यरंगम कला मंदिर च्या वतीने"भरतनाट्यम नृत्य" सादरीकरण महोत्सवाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती संस्थापक संचालक सच्चिदानंद नारायणकर आणि कला संचालक सोनम नारायणकर या उभयतांनी अकलूज वैभव व वृत्त एकसत्ता बरोबर संवाद साधताना सांगितली.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकरनगर अकलूज येथे रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सलग दोन सत्रांमध्ये कार्यक्रम सादर होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये (पूर्वार्धात) नृत्यरंगम कला मंदिर चे विद्यार्थी पारंपरिक भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण करतील. दुसऱ्या सत्रामध्ये (उत्तरार्धात) मुंबई येथील सांख्य डान्स कंपनीचे कलाकार पंचतंत्र बोधकथा या नृत्य नाटिकेद्वारे भरतनाट्यम नृत्याविष्कार सादरीकरण करणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वांना या भरतनाट्यम नृत्य कलाक्षेत्रातील नवनवीन माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने पंचतंत्र बोधकथा या नृत्य नाटिकेचे सादरीकरण होणार आहे.
प्राचीन कला आणि संस्कृती च्या संवर्धना बरोबरच या कलेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्याचबरोबर पालक, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यां मध्ये भरतनाट्यम ची जागरूकता निर्माण होऊन गोडी लागावी, महत्व वाढावे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 14 शाळांमधील 40 विद्यार्थी विद्यार्थिनी या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत असेही यावेळी नारायणकर उभयतांनी सांगितले. कोणतीही गोष्ट मोफत उपलब्ध झाल्यास त्याची किंमत होत नाही, त्यामुळे या कार्यक्रमासाठी दर्दींची गर्दी व्हावी म्हणून नाममात्र दरामध्ये प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. असेही त्यांनी म्हटले.
सोनम आणि सच्चिदानंद नारायणकर पती-पत्नी नृत्यरंगम कला मंदिर च्या माध्यमातून गत बारा वर्षापासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांचे हे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे असे मत याप्रसंगी नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी अर्थात एन. यु. बी. सी. दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी व्यक्त केले.
# भरतनाट्यम ही आपली प्राचीनकाळा पासूनची संस्कृती व सर्वोत्कृष्ट कला आहे. या कलेचे अनुकरण जगभर होत असताना आपण त्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याची खंत यावेळी श्री व सौ नारायणकर यांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या