डॉ.अभिजीत सोनवणे लिखित ऑगस्ट महिन्याचा लेखाजोखा ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एक सत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 8 सप्टेंबर 2024 :
या महिन्यात बरेच सण येऊन गेले नागपंचमी पतेती, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी ... वगैरे वगैरे...! परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे 15 ऑगस्ट ! आयुष्याच्या सुरुवातीला भेटलेल्या भीक मागणाऱ्या आजोबांनी मला मदत केली होती, यानंतर मी आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करत होतो, परंतु या आजोबांसाठी किंवा ज्या समाजाने मला त्यावेळी मदत केली, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी करावे या भावनेने ; 15 ऑगस्ट 2015 रोजी मी आंतरराष्ट्रीय संस्थेचे राजीनामा देऊन रस्त्यावर आलो.
आज नवव्या वर्षातून दहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत. मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्या विषयी 15 ऑगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन या लेखात स्वतंत्रपणे सर्व काही लिहिले आहे. याचा ऑडिओ मी काही दिवसात आपणास पाठवून देईन. या नऊ वर्षात 3000 पेक्षाही जास्त स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. माझ्या कामावर आणि माझ्यावर लोकांनी इतकं भरभरून प्रेम केलं, आशीर्वाद दिले आणि स्तुती केली... ती क्वचितच एखाद्या माणसाला त्याच्या जिवंतपणी मिळते ! हा भाग्यवान मीच आहे...!!!
पण गेल्या नऊ वर्षात मात्र एक शिकलो... स्तुती ही सोन्याच्या अलंकारासारखी असते... अंगभर घातलेले सोन्याचे दागिने एखाद्या सण समारंभात ठराविक वेळी छान दिसतात.... पण ते कितीही छान दिसले आणि मौल्यवान असले; तरी रात्री झोपण्या अगोदर मात्र हे दागिने उतरून ठेवावे लागतात... नाहीतर ते टोचतात... बोचतात ! स्तुतीचंही तसंच, एखाद्या समारंभात "स्तुती अलंकार" तेवढ्यापुरते घालून मिरवायचे असतातच ; परंतु एका क्षणी ते स्वतःच उतरून सुद्धा ठेवायचे असतात... नाहीतर ते आपल्यालाच टोचतात आणि बोचतात सुद्धा. सतत हे स्तुती "अलंकार" घालून फिरलं की त्याचा "अहंकार" निर्माण व्हायला सुध्दा वेळ लागत नाही.आणि मग हा "स्तुती अहंकार", अलंकार न राहता, आपल्यालाच टोचायला आणि बोचायला लागतो...तेव्हा तो योग्य वेळी काढणं हेच बरं... ! असो.... ! तर, जो समाज आपल्याला मदत करत आहे, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावे, त्यांनी दिलेल्या मदतीतून आपण काय दिवे लावले, हे त्यांनाही कळवावे, आपण योग्य रस्त्यावर आहोत का, हे पडताळून पाहावे, चुकत असेन तर सल्ले घ्यावे, आपल्याला जे समाधान मिळत आहे ते सर्वांना थोडेसे वाटावे...
दर महिन्यात आपल्याला "लेखाजोखा" सादर करण्याचा फक्त हाच हेतू असतो !
गेली नऊ वर्षे सातत्याने, दर महिन्याला केलेल्या कामाचा आढावा, 31 किंवा 1 तारखेस न चुकता समाजाला देत आहे, यात मला मनस्वी आनंद आहे ! आज आमच्या नवव्या वर्षातल्या, शेवटच्या महिन्याचा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर ! तर, ऑगस्ट महिना नुकताच सुरू झाला आणि आषाढातली "अमावस्या" समोर आली. अनेकांची आयुष्यं सुद्धा अशीच असतात. आत्ता कुठे आयुष्य सुरू झालं म्हणता म्हणता, "भाकरीचा चंद्र कुठेतरी हरवून जातो.... काळोख्या त्या रात्रीत भुकेल्या पोटी चाचपडत बसण्याशिवाय दुसरा मग त्यांना कोणताही पर्याय नसतो.
कोणाचाही आधार नसलेल्या, उजेड हरवून बसलेल्या तीन ताई... यांना या महिन्यात हातगाड्या घेऊन दिल्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल दिले. जीच्या डोळ्यातलाच सूर्य हरवला आहे... अशा अंध ताईला रक्षाबंधनाच्या अगोदर राख्या विकायला दिल्या. श्वास चालू आहेत म्हणून जिवंत म्हणायचे... असा एक जण रस्त्याकडेला एक्सीडेंट होऊन पडून होता, मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले, पूर्ण बरा झाला. निराधारांसाठी चालत असलेल्या एका वृद्धाश्रमामध्ये "सेवक" म्हणून त्याला रुजू करून दिला आहे. वृद्ध निराधार आजी आजोबांची सेवा करत स्वतःचं पोट पाणी आता तो सन्मानाने भरेल.
अशाच एका मृत म्हणून घोषित झालेल्या, युवकाला आपण उचलून आणले... ऍडमिट केले... आमच्या या प्रयत्नाला आशीर्वाद म्हणून निसर्गाने त्याच्यामध्ये "प्राण फुंकले"... पूर्णपणे खडखडीत बरा होऊन, आज तो एका चांगल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत आहे... अशा वरील सहा जणांना, या महिन्यात व्यवसाय टाकून दिले आहेत / नोकरी मिळवून दिली आहे, ते आता प्रतिष्ठेने जगू लागले आहेत... ! आपण प्राण कोणाला देऊ शकत नाही; परंतु भीक देणे बंद करून एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करून, प्रतिष्ठा नक्की देऊ शकतो... ! प्रतिष्ठा नसेल; तर प्राण काय महत्त्वाचे ?
अमावस्या सरली म्हणता म्हणता, पतेतीची पहाट उगवली.... पारशी नववर्षाचा आदला दिवस म्हणजे "पतेती" ... ! पतेती म्हणजे "पश्चात्तापाचा दिवस"...! पतेती म्हणजे केलेल्या चुका मान्य करून "कबुलीजबाब" देण्याचा दिवस...!!पतेती म्हणजे आत्मनिरीक्षणाचा दिवस...!!!
शेपूट लपवून, माणूस असल्याचे ढोंग करत समाजात फिरणारी अनेक माकडं मला भेटतात. आपल्या आई-वडिलांना रस्त्यावर सोडून, या फांदीवरून त्या फांदीवर कोलांट उड्या मारत स्वतः मस्त मजेत जगत असतात. या माकडांनी, अशा रस्त्यावर सोडलेल्या वृद्ध आई-बाबांना आम्ही रस्त्यावरच आंघोळ घालतो, नवीन वस्त्र देतो आणि एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्यांना दाखल करतो. जेव्हा या आई-बाबांना आम्ही रस्त्यात आंघोळी घालतो; त्यावेळी आता आम्हाला कुठेही "अभिषेक" करण्याची गरज उरली; असं मला वाटत नाही...! आमचा अभिषेक तोच... आमची पूजा तीच...! अशा 75 आई बाबांना आजपर्यंत सुरक्षित स्थळी ठेवले आहे. आयुष्यात अशा 75 पूजा मांडल्या... !
जे जगले त्यांचे सून आणि मुलगा झालो... जे गेले त्यांचे सून आणि मुलगा होऊन अंत्यसंस्कार केले...!
अशा 75 आई-बाबांना आपण उचलून कुशीत घेऊ शकलो, याचे भाग्य समजू ? आनंद मानू ? हे सर्व करण्याची मला संधी मिळाली, यात समाधान मानून हसू ? .... की; सुकलेल्या पालापाचोळ्यासारखे कितीतरी वृद्ध आई-वडील अजूनही रस्त्यावर पडून आहेत, याचे दुःख मानू ? कधीतरी सुगंधी असणारे, धगधगते आई बापाचे हे जीव, कापरासारखे वाऱ्याबरोबर उडून जातात... परत कधीही न येण्यासाठी...!
त्यांनी आयुष्यात पाहिलेली स्वप्नं मग, चिते मधल्या अग्नीत जळूनतरी जातात किंवा कायमची जमिनीत दफन तरी होतात...!!!धुरासारखी जळून गेलेली स्वप्नं, मग आकाशातले ढग होतात... त्या आई-बाबांचे अश्रू आकाशातून कधीतरी असह्य होऊन, धो धो कोसळू लागतात... आणि घराच्या खिडकीतून आपण डोकावून, कॉफीचा मग हातात घेऊन म्हणतो, 'यंदाचा पाऊस जरा जास्तच आहे नाही का'... ???हा...हा.. पाऊस नसतो हो...! पूर नदीला येतंच नाही.... हा पूर असतो गेलेल्या आई बापाच्या डोळ्यातला...! ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ?
करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? येईल का त्यांच्याही आयुष्यात "पतेती"...???मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे...!!!कॅलेंडर प्रमाणे पारशी नववर्ष सुरू झाले... तो दिवस होता 15 ऑगस्ट !
15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन !
वर्दी मधली माणसं जेव्हा देशासाठी शहीद होतात, तेव्हा त्यांच्याभोवती तिरंगा गुंडाळला जातो....!हा सन्मान मिळायला तेव्हढं भाग्य असावं लागतं.... ! तरीही त्यापुढे जाऊन मी धाडसाने म्हणेन... देशभक्ती करायला फक्त वर्दीची गरज नसते... ज्याला जे काम नेमून दिलं आहे, त्यांनं ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे देशभक्ती... ! विद्यार्थ्याने गुरुजन आणि आई-वडिलांचे ऐकून शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या भल्यासाठी करणे म्हणजे देशभक्ती !डॉक्टरने, रुग्णसेवेला महत्त्व देऊन... Allopathy, Homeopathy, Naturopathy यासोबतच Sympathy आणि Empathy या पॅथींचाही वापर करणे म्हणजे देशभक्ती ! इतर कोणत्याही सरकारी / खाजगी सेवेत असलेले अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्वांचे बाबतीत सुद्धा हेच सांगता येईल.... !
रस्त्यावर न थुंकणे म्हणजे देशभक्ती...चिरीमिरी न घेणे म्हणजे देशभक्ती... मुली महिलांचा आदर करणे म्हणजे देशभक्ती...आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, ते मनोभावे करणं म्हणजे देशभक्ती.... अशा प्रकारची देशभक्ती केली तर, अंगावर घातलेलं कुठलंही वस्त्र, हे मग युनिफॉर्मच होईल ! वर्दी / युनिफॉर्म.... हि अंगावर घालायची गोष्टच नाही मुळी... ती मनात घेऊन मिरवायची गोष्ट आहे...! फक्त दहा ते पाच नाही.... जन्मलेल्या तारखेपासून, मृत्यू होईपर्यंत सांभाळायची ती गोष्ट आहे...!
पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता, शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांना या महिन्यात आपण युनिफॉर्म घेऊन दिले आहेत.... शाळेच्या फिया भरल्या आहेत... ! उद्या हिच मुलं मोठी होतील.... पुढे इतर कोणत्याही क्षेत्रात जातील, देशाची भक्ती करतील.... आणि म्हणून, याच मुलांना, "भारत" समजून, युनिफॉर्म मधल्या पोरांकडे पाहून मी त्यांना कडक सॅल्यूट ठोकला .... जय हिंद... वंदे मातरम... असं म्हणत मग आम्ही झेंडावंदन केलं..!!! आधार हरवलेली... अंधारात चाचपडणारी ही माणसं, जेव्हा स्वयंपूर्ण होऊन... स्वतःच प्रकाशित होतात, तो क्षण पौर्णिमेचा !
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मदतीने माझी अनेक माणसं या महिन्यात "प्रकाशित" झाली.... कदाचित यांच्याच प्रकाशाने रात्र उजळली... आणि मग 15 ऑगस्ट नंतर, श्रावणातली पौर्णिमा उगवली... आली पौर्णिमा आली....अल्लड, अवखळ धाकली बहीण म्हणून धावत आली, हातात राखीचे बंधन घेवून आली... रक्षाबंधन...!!! रस्त्यावरील शेकडो आजी आणि ताईंनी मला राख्या बांधल्या. "जगात ज्याला जास्त बहिणी, तो खरा श्रीमंत", अशी श्रीमंतीची व्याख्या ठरली; तर आज सगळ्या जगातला मीच एक श्रीमंत ! सर्वात श्रीमंत मीच असलो तरीही एका टप्प्यावर याचक सुद्धा मीच आहे... इतक्या साऱ्या बहिणींना मी ओवाळणी तरी काय देऊ ? माझी पात्रता ती काय ? मग, कमरेत वाकलेल्या आजीला कमरेचा पट्टा देवून तिचा आधार झालो... गुडघ्याच्या त्रासामुळे चालता येईना, त्या आजीला गुडघ्याचा पट्टा बांधून देवून, तीचा गुडघाच झालो...आधाराशिवाय उभेच राहता येत नाही, अशा आजीला हातात काठी देऊन तीची काठीही झालो... डोळ्याला दिसत नाही ? मग ऑपरेशन करून तीचा नेत्र झालो...सुकलेल्या, वाळलेल्या, वठलेल्या झाडांवर पुन्हा पालवी फुटत नाही असं म्हणतात...आईशपथ सांगतो, मी या झाडांवर त्यादिवशी हिरवीगार नाजूक पालवी उमललेली पाहिली आहे...! हसताना यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मला, समुद्रातल्या एका संथ पण फेसाळलेल्या लाटेसारख्या भासतात...! रक्षाबंधनाच्या दिवशी, मी ही संथ लाट झालो... त्यांच्या काळजावर पडलेली मी एक छोटीशी सुरकुतीच झालो.... ! "नारळी भात" आमच्या नशिबात नसला, तरी अनेक याचकांना, कामाला लावून त्यांच्याकडून, जेवणाचे डबे तयार करून घेऊन; रस्त्यावरील गोरगरिबांना आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या याचकांना आमच्या "अन्नपूर्णा प्रकल्पाच्या" माध्यमातून देत आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणीव झाली, श्रावण मास आत्ता चालू झाला गड्या....!पण, हरलेल्या या चेहऱ्यांकडे पाहून मग माझ्या तोंडून शब्द निघाले ...
श्रावणमासी हर्ष नसू दे
नसू दे हिरवळ चोहीकडे
सरसर शिरवे, भिऊ नको तू
आपोआप ते ऊन पडे
झालासा तो वाटतो सूर्यास्त
सूर्याला रे, अंत नाही गडे
तूच सूर्य हो, तूच प्रकाश हो
हो तु रे गरुड राजा, जो आकाशाशीं भिडे
(आदरणीय बालकवींची माफी मागून)
श्रावणातल्या पौर्णिमेचा चंद्र मनामध्ये जागा ठेवत, मग "श्रीकृष्ण जयंती" आली.
जे भिक्षेकरी; भीक मागणे सोडून देऊन काम करायला लागले आहेत; त्यांचा नवीन जन्म झाला असंच मला वाटतं.... माझ्यासाठी मग हेच बाळकृष्ण ! माझेच काही याचक लोक; आम्ही भिक्षेकरी (भिकारी) हाय, अजूनही असं काही वेळा उघडपणे सांगतात... मला त्यावेळी वाईट वाटतं... ! पण ज्या भिक्षेकर्यांनी भीक मागणं सोडून दिलं आहे; असे माझे "बाळकृष्ण" मग हा "कंस" फोडतात... तोडतात... भेदतात...कंसातल्या भिकारी या शब्दाचा वध करून, स्वतःच तयार केलेल्या "बंदीशाळेतून" जेव्हा "गावकरी" म्हणून जन्माला येतात, तोच माझ्यासाठी जयंती सोहळा असतो... ! आम्ही दहीहंडी सुद्धा मांडली... नव्हे रोज मांडत आहोत... आमची दहीहंडी तीनच थरांची... भिक्षेकरी - कष्टकरी - गावकरीतीनच थर आहेत, त्यामुळे वरवर दिसायला सोपी दिसते पण फोडायला त्याहून अवघड... ! हि दहीहंडी फोडायला आपण सर्वजण आम्हाला प्रोत्साहन देत आहात, पाठीमागून टेकू देऊन वरवर ढकलत आहात, सर्वतोपरी मदत करत आहात.... आम्ही ऋणी आहोत आपले ! आता आपल्याकडून एक वचन हवे आहे...आपण सर्वांनी भिक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देणे बंद करूया... स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला मदत करूया... !
भीक आणि मदत या दोन शब्दा मध्ये खूप फरक आहे...
आपल्या काहीही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर परावलंबी होत असेल तर ती भीक...पण, आपल्या कोणत्याही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर स्वावलंबी होत असेल तर ती मदत ! पुण्य कमावण्याच्या नादात भीक देऊन एखाद्याला खड्ड्यात ढकलण्यापेक्षा, स्वावलंबी होण्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्याला खड्ड्यातून बाहेर काढूया... तरच हि तीन थरांची, दहीहंडी खऱ्या अर्थाने फुटेल... !!! जेव्हा हि दहीहंडी कायमची फुटेल, त्यावेळी मी रस्त्यावर येऊन जल्लोष करेन... नाचेन... गाईन आणि म्हणेन .... गोविंदा आला रे ....आला.... !
1 सप्टेंबर 2024
डॉ अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे
9822267357
.jpg)
1 टिप्पण्या
खुप सुंदर shubheccha
उत्तर द्याहटवा