खरच आम्ही नातेपुतेकर, अहो भाग्यवान!

 

खरच आम्ही नातेपुतेकर, अहो भाग्यवान!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक27/9/ 2024 : आमच्या गावात दरवर्षी संतश्रेष्ठ श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराजांचा "देवांचा" पालखी सोहळा मुक्कामी येतो. हा सोहळा गावासाठी अत्यंत सन्मानाचा आणि भक्तिभावाचा क्षण असतो. वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावात एक अद्वितीय चैतन्य पसरतं, जणू माऊली स्वतःच आमचं गाव पावन करत आहेत. देवांचा मुक्कामी येणारा हा पालखी सोहळा म्हणजे गावकऱ्यांसाठी परमोच्च आनंदाचा आणि भक्तिरसात चिंब होण्याचे क्षण असतो. विशेष म्हणजे दरवर्षी माऊलींच्या सोहळा स्वागतासाठी वरूणराजा न चुकता हजरच असतो.

गावकरी आपल्या घरोघरी वारकऱ्यांची सेवा करतात.. अन्नदान, चहा, दूध, नाश्ता, पिण्याचं पाणी, पायांना तेल मालिश, पहाटे आंघोळीची व्यवस्था अशा सेवा करून माऊलीं प्रती आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करतात. प्रत्येक वारकऱ्यामध्ये जणू माऊलींचं रूपच दिसतं, आणि त्यांच्या सेवेत सर्व गावकरी समर्पित भावनेने सामील होतात. मुक्कामाच्या आधीपासूनच संपूर्ण गावात एक वेगळंच उत्साही वातावरण असतं. माऊलींच्या स्वागताची तयारी, गावातील स्वच्छता, सजावट या गोष्टींमध्ये प्रत्येकाचं योगदान असतं.

पालखी गावातून प्रस्थान करत असताना, गावकरी त्या क्षणाचाही आनंद लुटतात... भरपूर सेवा देतात, बरेच लोक निरोप देण्यासाठी सोबत चालत जातात. पण प्रस्थानानंतर गावात एक प्रकारची गंभीर शांतता पसरते. एक पोकळी निर्माण होते..शून्यता जाणवते..एका "देवा" शिवाय काही नाही असा संदेश असतो.

परतीच्या पालखीचं स्वागत करण्यासाठीही गावकरी तितक्याच भक्तिभावाने व आनंदाने सज्ज असतात. माऊलींचं दर्शन घेण्यासाठी दाते प्रशालेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.

खरंच, आम्ही नातेपुतेकर किती भाग्यवान आहोत, की वर्षातून दोन वेळा साक्षात "देव" माऊली आमच्या गावात येतात आणि गावाला त्यांचं दर्शन घेण्याचं, सेवा करण्याच भाग्य लाभतं. माऊलींच्या सोहळ्यासमोर अनेक अडचणीही आहेत मुख्य समस्या मुक्काम ठिकाणी असणारी अपुरी जागा पण यावरही माऊली गावातील जेष्ठांच्या माध्यमातून मार्ग काढतील ह्यात शंका नाही. 

देवांची कृपा अशीच आमच्यावर आणि आमच्या गावावर सदैव राहो, आणि दरवर्षी हा सोहळा आम्हा गावकऱ्यांना सेवेसाठी लाभत राहो, अशीच आम्हा सर्वांची माऊलींच्या चरणी प्रार्थना!

माऊली, माऊली, गुरु माऊली रामकृष्ण हरी

लेखन सेवा : 

नंदन पंढरीनाथ दाते.

मोबाईल नंबर:७७२०९९१००७.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या