असे कर्मचारी अशा कथा

 

असे कर्मचारी अशा कथा 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज

संग्राहक: आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई  दिनांक 25/9/2024 : आमच्या न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे आमचे न्यायालयीन कर्मचारी. हे न्यायालयीन कर्मचारी या यंत्रणेतील इतका महत्त्वाचा घटक आहेत. त्यांची कार्यक्षमता, त्याचा प्रामाणिकपणा ,त्यांचे कौशल्य यामुळेही ही सगळी यंत्रणा उभी आहे. 

पण उडदा माजी काही गोरे काही काळे असतातच पराकोटीचे चांगले कर्मचारी व पराकोटीचे वाईट कर्मचारी हे असतातच. पण जे चांगले आहे ते समाजापुढे ठेवायचे. ते वाचून आणि कोणास चांगले वागावे वाटले तर या लेखाचा फायदा झाला असे मला वाटते. 

 मित्रासाठी काही पण 

मी वकीली सुरू केली त्यावेळी इचलकरंजीला पहिल्या दोन वर्षात कोल्हापूरचे इनामदार  म्हणून नाझर इचलकरंजीत होते. ऊंच व भरभक्कम शरीरयष्टी, बोलण्यात, वागण्यात तडफदारपणा. कामाचा प्रचंड उरक व निस्पृहपणा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे इनामदार साहेब होय. आम्ही वकील लोक आदराने त्याना बाबासाहेब म्हणून म्हणत होतो. मी हिंदू एकताचे जे काम करतो ते त्यांना आतून आवडत असे पण त्यांच्या नोकरीतील मर्यादामुळे ते कधी स्पष्ट बोलून दाखवत नव्हते. पण मला सतत चिडवत असत. ते मला म्हणत तुम्ही अकरा वाजता कोर्टात आलात याचा अर्थ कालच्या मारामारीमध्ये तुम्हाला अटक झाली नाही असे मी समजतो. 

नवीन वकीलाना आथार व मार्गदर्शन 

त्यांच्याकडे दावा दाखल करायला दावा घेऊन गेला की ते दावा ठेवून घेत माझ्या हातातले काम झाल्यावर पंधरा मिनिटांनी या असे सांगत. पंधरा-वीस मिनिटांनंतर गेल्यानंतर त्यांनी तो दावा पूर्ण वाचलेला असे त्यातील दुरुस्त्या सांगायचे चुका सांगायचे कायदेशीर तरतुदी सांगायचे मग दावा दाखल करून घ्यायचे. वास्तविक हे त्यांचे काम नव्हते. पण नवीन वकिलाचे नुकसान होऊ नये व पर्यायाने पक्षकारांचे नुकसान होऊ नये असा त्याचा प्रयत्न असे.

 न्यायालयात काम करत करत ते निवृत्ती आधी चार वर्षे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य प्रबंधक म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली. सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वर त्यांचा वचक होता व प्रेमही होते. जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश त्यांना सन्मानाने वागवत.

 असा त्याग अशी मैत्री 

 जिल्हाप्रबंधक म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या नंतर ज्या ज्यांना संधी होती असे मंत्री साहेब म्हणून एक अधिकारी होते पण वयाच्या फरकामुळे ते दीड वर्षात निवृत्त होणार होते इनामदार बाबासाहेब मनाने इतके मोठे. आपण चार वर्षे जोपर्यंत जिल्हाप्रबंधक आहोत तोपर्यंत मंत्री साहेब निवृत्त होणार त्यांना त्यांच्या आयुष्यात जिल्हा प्रबंधक म्हणून काम पाहायला मिळणार नाही म्हणून इनामदार साहेबांनी दीर्घ मूदतीची रजा काढली. ते रजेवर गेल्यामुळे पर्यायाने मंत्री साहेबांना जिल्हाप्रबंधकांचा कार्यभाग सांभाळण्याची संधी मिळाली ती त्यांनी सुमारे वर्षभर घेतली. 

 स्वतःची जिल्हा प्रबंधक म्हणून निवड झाली जरी इनामदार साहेबांनी दीर्घ मुदतीची रजा घेतली असली तरी ते कामावर असल्यासारखे 11 ते 6 कोर्टात येऊन बसत.  जिल्हाप्रबंधकांच्या शेजारच्या खुर्चीवर बसत. मंत्री साहेबांना त्यांच्या कामात मदत करत इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करत. म्हणजे  ते वर्षभर बिन पगारी पूर्ण अधिकारी अशी जगले.

 अशा मोठ्या मनाची माणसे मला पहायला मिळाली त्यांच्याबरोबर बोलायला मिळाले हे माझे पूर्वसंचितच.

 मला सरकार पगार देते 

असे एक कर्मचारी माझ्या कायमच्या लक्षात राहिलेले आहेत ते  सी एम पाटील. सेशन कोर्ट यांच्या कोर्टात बेंच क्लार्क होते  उंच, काटक व वर्णानी काळे असलेले हे कर्मचारी. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्याचे नाव माझ्या स्मरणाप्रमाणे मिसाळ असे होते. ते बरोबर दहा वाजता कोर्टात यायचे  व आपले कामकाज सुरू करायचे. ते आपले काम पूर्ण केलेशिवाय कोर्ट हॉल अगर कोर्ट कॅम्पस सोडून  जात नसत. इतर कर्मचारीवर्गासारखा गप्पागोष्टी चहा पान यात वेळ काढत नसत. त्यांच्याजवळ जर वेळ असेल तर ते आपल्या पिशवीतून छोट्या छोट्या ख्रिश्चन धर्मातील  पुस्तीका घेऊन येत व वाचन करत शांतपणे बसत.

 काही न्यायालयीन कर्मचारी नुसते तारीख द्यायला, माहिती द्यायला, कागद दाखवायला चिरीमीरीची अपेक्षा करतात पण मिसाळ साहेबांनी कधीही कोणाकडून एक रुपयाची चिरीमीरी स्वीकारलेली नाही. त्यांना कोणी पैसे देऊ केले तर ते नम्रपणे हात जोडून 'मला सरकार पगार देत आहे' मला असे पैसे चालत नाहीत असे सांगत.

 असे कर्मचारी  आहेत म्हणून ही सगळी यंत्रणा का चालली आहे हे समजून येते.

 "वकिली कथा   व व्यथा" या आगामी पुस्तकातील 'असे कर्मचारी व असे काम' या प्रकरणातील संक्षिप्त भाग. 

 ॲड अनिल रुईकर 

इचलकरंजी

 98 23255049

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या