जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया झाली सोपी; आता सर्व काही ऑनलाइन!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/11/2026 :
शिक्षणातील प्रवेश, सरकारी नोकरी किंवा निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर आता अर्जदारांची कार्यालयीन धावपळ कमी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन परिपत्रक जारी केले. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार असून, ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या तांत्रिक मदतीने ही डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे जोडणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यकतेनुसार सुनावणीला उपस्थित राहणे या सर्व सुविधा एकाच प्रणालीत उपलब्ध होणार आहेत.
प्रिंट काढण्याची गरज नाही
नव्या प्रक्रियेत अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. जातीच्या नोंदीचा आणि रहिवासाचा किमान प्रत्येकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. हे पुरावे उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त कागदपत्रेही मागवू शकते.
मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करावी लागतील. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून समितीच्या कार्यालयात जमा करण्याची गरज राहणार नाही. आधार क्रमांकाशी अर्ज जोडलेला असल्याने एका व्यक्तीला एकच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरताना आणि कागदपत्रे अपलोड करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
अर्ज सादर झाल्यानंतर सर्वप्रथम कार्यालयातील लिपिक कागदपत्रांची तांत्रिक तपासणी करेल. त्यानंतर संशोधन अधिकारी आणि जात पडताळणी समिती अर्जातील माहिती व पुराव्यांची छाननी करतील. आवश्यकतेनुसार संबंधित संस्थांकडून कागदपत्रांची खातरजमा केली जाईल किंवा दक्षता पथकामार्फत चौकशी केली जाऊ शकते.
अर्जदाराला सुनावणीची गरज भासल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाईल. विशेष आणि अपवादात्मक परिस्थितीतच प्रत्यक्ष सुनावणीची परवानगी दिली जाऊ शकते. अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
६० दिवसांत निर्णय; शुल्कातही बदल
जात पडताळणी समितीने शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेणे अपेक्षित आहे. अर्जात त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराला सूचना दिल्या जातील. पुढील दोन महिने एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे त्याची आठवण करून दिली जाईल. पाचव्या महिन्यात अंतिम सुनावणीची संधी दिली जाईल. त्यानंतरही अर्जदाराने प्रतिसाद दिला नाही किंवा आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर प्रकरण निकाली काढले जाऊ शकते.
नव्या प्रणालीत प्रयोजनानुसार शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शैक्षणिक कारणासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ११ हजार रुपये, तर नोकरी आणि इतर शासकीय प्रयोजनांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्जदारांना मंजूर झालेले जात वैधता प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीसह मिळणार असून, ते ई-मेल आणि व्हॉट्सॲपद्वारेही पाठविण्याची सुविधा असेल. या नव्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी आणि निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या नागरिकांची कार्यालयीन धावपळ कमी होणार आहे.
0 टिप्पण्या