⏹️ जेवल्यावर झोप का येते ?

 ⏹️  जेवल्यावर झोप का येते ? 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/10/2026 :

आपलं जेवण झालं की आपली पचनसंस्था खाल्लेल्या अन्नपदार्थांचं पचन करून शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचं काम करते. जेवण पोटात पडलं की रक्तातल्या शर्करेचं नियंत्रण करण्यासाठी ‘इन्सुलिन’ हे संप्रेरक स्त्रवायला लागतं. भोजनात असलेल्या दूध, अंडी, मांस, मासे, डाळी अशा प्रथिनयुक्त पदार्थात असलेल्या ‘ट्रिप्टोफॅन’ या अमिनो आम्लाचं रूपांतर ‘इन्सुलिन’ हे संप्रेरक, ‘सेरेटोनिन’ व ‘मेलॅटोनिन’ या रसायनात करतं. सेरेटोनिन हे पचनासाठी आवश्यक अशा पोट व आतड्यांच्या हालचाली घडवून आणतं, तर मेलॅटोनीन हे संप्रेरक शांत झोप लागण्यासाठी मदत करतं. ही दोन्ही संप्रेरकं, मेंदूला आराम करण्याचा संदेश देतात, त्यामुळे झोप येते.

जेवल्यावर, स्वायत्त चेतासंस्थेचा भाग असलेली ‘पॅरासिम्पॅथेटिक’ चेतासंस्था कार्यान्वित होते आणि मेंदूला, ‘आता पचन करणं महत्वाचं आहे, तेव्हा बाकी आराम कर’ आणि ‘इंधन आलंय, त्याचं पचन करून ऊर्जा मिळव’ असे संदेश देते. त्यासाठी सगळी ऊर्जा आणि रक्तप्रवाह, अन्नपचनासाठी पोट व आतड्यांकडे वळवते. झोपल्यामुळे शरीराची ऊर्जा पचनासाठी वापरली जाते. पचनासाठी रक्तप्रवाह पोटाकडे वळल्याने सुस्ती येते.

जर आपण जेवणात जास्त कर्बोदकयुक्त पदार्थ, मैद्याचे पदार्थ, भात, गोड पदार्थ घेतले असतील तर त्यांच्या पचनासाठी अधिक ऊर्जा लागत असल्यानं जास्त झोप येते. आपण अती जेवण केलं की ते पचवायला अधिक ऊर्जा लागते; त्यामुळे जास्त गुंगी येते. भजी, पुरी, पिझ्झा यांसारखे तेलकट आणि स्निग्धयुक्त पदार्थ पचायला जड असतात. ते खाल्ल्यावर पचन होण्यासाठी कित्येक तास आणि खूप ऊर्जा लागते. रात्री जास्त स्निग्धपदार्थयुक्त आहार घेतल्यास झोपेची गुणवत्ता ढासळते.

दैनंदिन जीवनात जास्त क्रियाशील राहण्यासाठी, जेवणानंतर येणारी सुस्ती टाळण्यासाठी जास्त कर्बोदकयुक्त आहार टाळून, प्रथिनयुक्त, तंतूमय पदार्थयुक्त आहार घेतला पाहिजे, जेणेकरून पचन हळूहळू होऊन शर्करेचं प्रमाण नियंत्रित होऊन ऊर्जा स्थिर राहते.

शरीराचं स्वत:चं असं, एक २४ तासांचं नैसर्गिक घड्याळ आहे. दुपारी १ ते ४ या वेळात जेवण झाल्यावर तर आपल्याला झोप येतेच, पण आपण जेवलो नाही तरीही आपल्याला नैसर्गिक घड्याळामुळे सुस्ती येते. जेवण झाल्यानंतर लगेचच आडवं होणं टाळावं, हालचाल करावी, जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटं सावकाश चालल्यास रक्तातली शर्करा वापरली जाते; तसंच पचन सुधारतं, मेलॅटोनिन कमी होतं आणि झोप येत नाही. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत आहार घेणं, हे दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत घेतलेल्या आहारापेक्षा अधिक परिणामकारक ठरतं; कारण शरीराचं घड्याळ सकाळी जास्त कार्यप्रवण असल्याने त्यावेळी इन्सुलिन चांगलं काम करतं.

प्रीती बेंद्रे

मराठी विज्ञान परिषद

सकलन : मिलिंद पंडित, कल्याण

=================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या