‼️ ऑक्सिजन बाबा ‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/10/2026
दररोज सकाळी वाराणसीच्या रस्त्यांवर एक व्यक्ती ५०० लिटर पाण्याची टाकी घेऊन निघते. ना नोकरीसाठी, ना व्यवसायासाठी; तर त्या झाडांना जगवण्यासाठी, जी लावल्या नंतर अनेकदा विसरली जातात. लोक त्यांना प्रेमाने 'ऑक्सिजन बाबा' म्हणून ओळखतात.
भदोही जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे ५२ वर्षीय गोपालजी व्यवसायाने कुंभार आहेत. मातीची भांडी बनवून ते पत्नी आणि तीन मुलांचा उदरनिर्वाह करतात. पण कौटुंबिक जबाबदारीत त्यांनी निसर्गाशी असलेलं नातं कधी तुटू दिलं नाही. गेली १२ वर्षे ते आपल्या कमाईचा, वेळेचा आणि श्रमांचा मोठा वाटा झाडांच्या सेवेसाठी अर्पण करत आहेत. या प्रवासाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी ररस्त्याच्या कडेला लावलेली रोपं पाण्याअभावी सुकताना पाहिली. तेव्हा त्यांना जाणवलं की; झाडं लावणारे अनेक असतात, पण त्यांची काळजी घेणारे फारच कमी असतात.
त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की, ते फक्त झाडं लावणार नाहीत, तर ती वाचवण्याचंही काम करतील. सुरुवातीला ते बादल्यांमधून पाणी वाहून रोपांपर्यंत पोहोचवत असत. मग त्यांनी स्वतः एक ट्रॉली तयार केली. आज ते दररोज ५०० लिटर पाण्याची टाकी घेऊन बाहेर पडतात आणि वाटेत भेटणाऱ्या झाडांना पाणी घालतात. कधी सार्वजनिक नळातून, तर कधी विहिरीतून ते पाणी भरतात.
मात्र, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. काहींनी त्यांना वेडा म्हटलं, तर काहींनी पाणी भरू देण्यासही नकार दिला. तरीही ते प्रत्येक सकाळी त्याच जिद्दीने पुन्हा उभे राहिले. तीच पाण्याची टाकी घेऊन, त्याच झाडांकडे ते पुन्हा निघाले. आता वर्षानुवर्षांच्या सेवेनंतर त्यांनी बनवलेली ट्रॉलीही कमकुवत होऊ लागली होती.
अशा वेळी The Better India मार्फत त्यांची प्रेरणादायी कहाणी जगासमोर आली. त्यानंतर नगर निगमने त्यांच्या या कार्यासाठी त्यांना एक Toto रिक्षा भेट दिली. त्यामुळे त्यांचं काम अधिक सुलभ झालं, आणि त्यांनी जपलेलं एकही झाड पाण्याअभावी कोमेजू नये, यासाठी त्यांना मोठी मदत मिळाली. अशी माणसं आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवून जातात: झाडं लावणं ही चांगली सुरुवात असते; पण ती जगवणं ही खरी जबाबदारी असते.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या