मनकी तरंग मार ले, बस हो गया भजन !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/11/2026 :
भजन हे देवाला जवळ करायचे साधन आहे, साध्य नाही. देव जवळ येणे, देव भेटणे, मन शांत होणे ते साध्य आहे आणि भजन हे तिथे जाण्याचे साधन आहे. भजन काय करतं? "मी मोठा" हा अहंकार कमी करतं. जसं भजन वाढतं, तसं तसं "मी"पणा कमी होतो आणि "मी"पणा कमी झाला की देव जवळ येतो. आपलं मन घाणेरड्या आरशासारखं आहे. राग, द्वेष, लोभाने भरलेलं. त्यात देवाचं प्रतिबिंब दिसत नाही. एखाद्या माणसाची रोज आठवण काढली की तो जवळचा वाटतो. तसंच देवाचं आहे. रोज भजनाने देवाची आठवण काढली की, हळूहळू देव परका वाटत नाही, घरचाच वाटायला लागतो. मनातून घेतलेले नाम त्याला लवकर ऐकू जातं. "देवा मला हे दे, ते दे" हे भजन नाही, तो व्यवहार झाला. "देवा तू आहेस म्हणून मी आहे" ही भावना ठेवून केलेलं भजन, देवाला सगळ्यात जास्त जवळ करतं. आपण समजतो की, हार्मोनियम, टाळ, तबला घेऊन मोठ्याने गाणे हे भजनाचं बाहेरचं रूप आहे. संतांनी सांगितलेलं आतलं रूप वेगळं आहे. तोंडाने देवाचं नाव घेणे हे सगळ्यात सोपं भजन. भजन करताना अहंकार नसावा.
मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोर ।।
किती हाकला हाकला । फिरी येते पिकावर ।।
आपलं मन हे मोकाट सुटलेल्या ढोरासारखं आहे. जसं उभ्या पिकात शिरलेलं ढोर. त्या मनरूपी ढोराला कितीही हाकला तरी ते पुन्हा फिरून फिरून त्याच पिकावर येतं. तसंच माझं मन आहे. त्याला कितीही आवरलं तरी ते पुन्हा पुन्हा विषय, वासनेच्या, मोहाच्या पिकावरच जातं. ढोराला बांधण्यासाठी खुंटा लागतो. तसा मनाला बांधण्यासाठी नामाचा, विठ्ठलाचा खुंटा लागतो. चंचल मनाला रिकामं ठेवू नका. त्याला काहीतरी चांगलं काम द्या. भजन, नामस्मरण, चांगलं वाचन, चांगलं बोलणं. मन हे चंचल जाईल पळोन. म्हणून मनाला बाहेर मोकाट फिरु देऊ नका.
आदत बुरी सुधार ले, बस हो गया भजन |
मनकी तरंग मार ले, बस हो गया भजन ||धृ||
हे भजन संत सूरदासजी यांचे आहे. सूरदास हे कृष्णभक्त होते, पण त्यांनी भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही, तर आचरण सुधारणं हीच खरी भक्ती आहे हे या दोन ओळीत सांगितलं आहे. तुझ्यात जी वाईट सवय आहे, खोटं बोलणं, राग करणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, निंदा करणं, व्यसन करणं ती सोड. ती सोडलीस की समज तुझं भजन झालं. मनात उठणाऱ्या लाटा मारून टाक, शांत कर. मनात सारखे विचार येतात, मी मोठा, तो लहान, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. या लाटा थांबवल्यास, मन शांत केलंस की समज तुझं भजन झालं. संत सूरदासजी सांगतात, देवाला प्रसन्न करण्यासाठी तुला हिमालयात जायची गरज नाही. आपण समजतो की तासभर बसून टाळ वाजवणे, माळ ओढणे. पण सूरदास म्हणतात ते बाहेरचं भजन आहे. खरं भजन आतलं आहे. देव मंदिरात नाही, तुझ्या वागण्यात आहे. तू जर रोज कोणाला तरी दुखावत असशील आणि मग तासभर भजन म्हणत असशील, तर ते भजन नाही. पण तू जर तुझा राग, तुझं खोटं बोलणं, तुझी वाईट सवय एक जरी सुधारलीस, तर तोच तुझा जप झाला. समुद्रात जशा लाटा येतात, तशा मनात वासना येतात. उदा- शेजाऱ्याची गाडी बघून जळणे ही एक तरंग आहे. कोणी काही बोललं की सूड घ्यायचा विचार येणे ही तरंग आहे. मनातील हे तरंग मारणे म्हणजे त्या विचाराला तिथेच थांबवणे. "नको, हा विचार वाईट आहे" म्हणून सोडून देणे. हेच ध्यान आहे, हाच योग आहे. देवाला तुझं सुधारलेलं मन पाहिजे.
नेकी सभी के साथ कर, जितनाभी बन सके |
मत कर बदी के भार को, बस हो गया भजन ||1||
संत सूरदास म्हणतात तुझ्याने जेवढं होईल तेवढं, सगळ्यांशी चांगलं वाग. चांगलं काम कर. वाईट कामांचं ओझं, पापाचं ओझं आपल्या डोक्यावर, मनावर घेऊ नकोस. एवढं जरी केलंस तरी तुझं भजन झालं. भजन म्हणजे फक्त देवासाठी काही करणे नाही, तर देवाच्या लेकरांसाठी म्हणजे माणसांसाठी काही करणे हेच भजन आहे. नेकी म्हणजे इमानदारीने, सत्याने वाग. देव तुमच्याकडून तुझ्या ताकदीपेक्षा जास्त अपेक्षा करत नाही. तुझ्याकडे वेळ नाही तर फक्त दोन गोड शब्द बोल. पण कर. "माझ्याकडे काहीच नाही म्हणून मी काहीच करत नाही" हे कारण सांगू नकोस. कोणाला तरी सुख देणे हाच देवाला हार घालणे आहे. कोणाला तरी दुःख न देणे हाच उपवास आहे. तुम्ही कोणाचीही निंदा न करता, द्वेष न करता, जेवढं जमेल तेवढं चांगलं वागत असाल तर तुम्ही मंदिरात गेला नाहीत तरी तुमचं भजन झालं.
दृष्टी में तेरी दोष है, दुनिया निहारती |
समता का आंजन आंजले, बस हो गया भजन ||2||
संत सूरदास म्हणतात, तुझ्या पाहण्याच्या दृष्टीतच दोष आहे, आणि तू जगाला न्याहाळून न्याहाळून पाहतोय. "समता" म्हणजे सगळ्यांना सारखं मानणे, याचं अंजन आपल्या डोळ्यात घाल. एवढं केलंस की तुझं भजन झालं. आपली सगळी भांडणं, दुःख, द्वेष याचं मूळ आपल्या "दृष्टी"त आहे. आपण पाहतो की हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे. हा आपला आहे, हा परका आहे. हा सुंदर आहे, हा कुरूप आहे. हा माझ्या जातीचा आहे, हा नाही. या भेदभावाच्या चष्म्यातून आम्ही जगकडे पाहतो. त्यामुळे आम्हाला सगळीकडे दोष दिसतात. "दुनिया खराब आहे" असं आम्ही म्हणतो. पण सूरदास म्हणतात, दुनिया खराब नाही, तुझ्या डोळ्यात दोष आहे. आंजन म्हणजे काजळ. जसं काजळ लावलं की डोळे स्वच्छ दिसतात, तसं "समता" हा गुण डोळ्यात घातला की जग स्वच्छ दिसतं. समता म्हणजे राजा आणि भिकारी दोघांतही तोच देव आहे, हे बघणे. शत्रू आणि मित्र दोघांशीही माणुसकीने वागणे. चांगला आणि वाईट दोघांनाही सुधारण्याची संधी देणे. जेव्हा तुम्ही समतेच्या नजरेने बघता, तेव्हा तुम्हाला कोणाचा राग येत नाही, कोणाचा मत्सर वाटत नाही. मन शांत होतं आणि शांत मन हेच खरं भजन आहे.
आया है तू कहा से, और जायेगा कहा? |
इतना हृदय बिचार ले, बस हो गया भजन ||3||
संत सूरदासांनी माणसाला जीवनाचा सगळ्यात मोठा प्रश्न विचारला आहे. अरे माणसा, तू कुठून आलास आणि कुठे जाणार आहेस एवढा विचार जरी तू तुझ्या हृदयात, मनात केला तरी बस झालं. तेच तुझं भजन होऊन जाईल. आपण आयुष्यभर दुसऱ्याचे विचार करतो. पण स्वतःचा विचार कधीच करत नाही. सूरदास म्हणतात, एकदा स्वतःला हा प्रश्न विचार मी कोण आहे? तू आईच्या पोटातून जन्माला आला आहेस, हे शरीराने खरं आहे. पण आत्म्याने तू कुठून आलास? देवाच्या घरातून आलास. परमात्म्या पासून तू वेगळा झालास आणि या जगात आलास. हे विसरू नकोस. तू इथला कायमचा नाहीस, तू पाहुणा आहेस. माणूस घर बांधतो पणक्षघर येथेच ठेऊन जावे लागते. सूरदास आठवण करून देतात. सोबत काय नेणार? फक्त तुझं कर्म. माणूस जन्माला येताना मुठ बंद करून येतो, मला सगळं पाहिजे म्हणून, आणि मरताना मुठ उघडी ठेवून जातो, काहीच नेता येत नाही. फक्त एवढा विचार जरी तू रोज 2 मिनिटे केलास -
"मी कुठून आलो? मी कुठे जाणार? मी इथे काय करतोय?" तर तुझा अहंकार आपोआप गळून पडेल. देव शोधायला मंदिरात जावं लागत नाही. देव तुझ्या हृदयातच भेटतो.
दुनिया बुरा बुरा कहे, अब सूर कर क्षमा |
बाणी का स्वर सुधार ले, बस हो गया भजन ||4||
संत सूरदास स्वतःलाच आणि आपल्यालाही क्षमा मागायला आणि वाणी सुधारायला सांगतात. जग तुला वाईट म्हणत असेल, निंदा करत असेल, तरी सूरदास म्हणतात, तू त्यांना क्षमा करून टाक. तुझ्या बोलण्याचा सूर, तुझी वाणी सुधारून घे. एवढं केलंस की तुझं भजन झालं. आपली वाणी कशी असते? कधी कडू असते, दुसऱ्याला टोचून बोलणे. कधी खोटी असते. स्वार्थासाठी खोटं बोलणे. कधी व्यर्थ असते दिवसभर बडबड, निंदा करणे. ज्याने वाणी सुधारली, त्याला वेगळं भजन करण्याची गरज नाही. कारण त्याचं प्रत्येक बोलणं हेच भजन बनतं. दोघांनीही बोलण्याचाच वापर केला. एकाने वाणी बिघडवली, दुसऱ्याने सुधारली. ज्याने सुधारली, त्याचं बोलणं हेच भजन झालं. म्हणून शेवटी सूरदास म्हणतात - तुला मंदिरात जाऊन घंटा वाजवायची गरज नाही. तू फक्त माणूस म्हणून चांगला वागलास, तरी तुझं भजन झालं.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9921791677


0 टिप्पण्या