'डेटा बोलेना, डेटा चालेना, डेटा खंत करी...' ऐकताय ना मोदीजी

 

'डेटा बोलेना, डेटा चालेना, डेटा खंत करी...' ऐकताय ना मोदीजी

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 27/11/2026 :

२१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या डिजिटल प्रशासनातील एका मोठ्या अडचणीकडे लक्ष वेधले होते. सरकारी विभागांकडे माहितीचे प्रचंड साठे आहेत, पण वेगवेगळ्या फॉरमॅटमुळे आणि प्रणालींमुळे हा डेटा एकमेकांशी संवाद साधू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांना हे म्हणणे खरेच इतके महत्वाचे वाटते तर सध्या देशात जो मोठा विरोधाभास त्यांच्याच सरकारच्या आणि निवडणूक आयोगाच्या प्रत्यक्ष कृतीतून समोर येतो आहे तो येता ना !

एकीकडे पंतप्रधान 'डेटा इंटरऑपरेबिलिटी' म्हणजेच माहितीच्या देवाणघेवाणीच्या गप्पा मारतात, तर दुसरीकडे त्यांच्याच राजवटीत निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था माहितीला बंदिस्त ठेवण्याचे काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील मतदारयाद्यांच्या SIR मोहिमेदरम्यान आयोगाने ४०३ मतदारसंघांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली, पण ती अत्यंत क्लिष्ट अशा स्कॅन केलेल्या PDF स्वरूपात ठेवली. (मुद्दामच केले असावे!) परिणामी, जुन्या आणि नव्या मतदारयाद्यांमधील डेटा एकमेकांशी बोलणे तर दूरच, सामान्य नागरिकाला त्यातील साधे नाव शोधणेही अशक्य झाले होते.

निवडणूक आयोगाचा हा तांत्रिक आडपडदा पारदर्शकतेच्या मूलभूत तत्त्वालाच हरताळ फासणारा होता. कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अद्ययावत तंत्रज्ञान हाताशी असतानाही, आयोगाने मतदारयाद्या 'मशीन-रीडेबल' स्वरूपात का दिल्या नाहीत? 

जे काम निवडणूक आयोगाने स्वतःहून करायला हवे होते, ते आता अठरा वर्षांच्या सार्थक सिद्धांत या तरुणाने करून दाखवले.उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्या आयोगाने केवळ छायाचित्रांसारख्या स्कॅन केलेल्या PDF स्वरूपात दिल्याने त्यातून लाखो नावांची तुलना करणे अशक्य होते; मात्र सार्थक आणि त्याच्या टीमने ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (OCR) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सुमारे ६.८ लाख PDF फाइल्सचे रूपांतर संगणकाला वाचता येणाऱ्या मजकुरात केले. 

यातून त्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते २०२७ च्या प्रारूप यादीपर्यंतच्या चार वेगवेगळ्या कालखंडांतील तब्बल १५.३६ कोटी मतदार नोंदी आणि ५४.८ कोटी डेटा रोजचे एक सुसूत्र जाळे तयार केले, तसेच नागरिकांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी 'कीड-हॅश टोकन्स' या सुरक्षित प्रणालीचा वापर केला. या एका कृतीमुळे केवळ सरकारी माहितीवरील संस्थांची मक्तेदारी मोडीत निघाली नाही, तर पत्रकार, संशोधक आणि सामान्य नागरिकांना मतदारयाद्यांतील संभाव्य त्रुटी आणि वगळलेली नावे तपासण्याचे एक प्रभावी लोकशाही साधन उपलब्ध झाले आहे.

सार्थक सिद्धांतच्या या कामामुळे राजकीय पक्ष, पत्रकार आणि सामान्य नागरिकांसाठी मतदारयाद्यांची पडताळणी करणे नक्कीच अधिक सोपे झाले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे सातत्याने मशीन-रीडेबल (संगणकावर शोधता येण्याजोग्या) मतदारयाद्या देण्याची मागणी केली होती. पण कितीही विनंत्या केल्या तरी, निवडणूक आयोगाकडून याद्या स्कॅन केलेल्या PDF स्वरूपातच दिल्या जात असल्याने त्यांची व्यापक तपासणी करणे कठीण होते. सार्थकने ६.८ लाख फाइल्सवर OCR प्रक्रिया करून हा तांत्रिक अडथळा दूर केला आहे. ब्राव्हो !

ही कामगिरी एका अठरा वर्षाच्या मुलाला जमली पण निवडणूक अयोग नावाच्या बलाढ्य यंत्रणेला का जमली नाही असे प्रश्न तुम्हाला सुचतील ? पण उत्तर मिळणार नाही. कारण यात पंतप्रधानांच्या आणि एकूणच आपल्या देशाचा कारभार जसा हाकला जातो आहे त्या धोरणांमधील दुटप्पीपणा धडधडीत दिसतो. 

सार्थक मोठा बुद्धिमान. त्याचे कौतुक करावे तितके थोडे. त्यानेच केंद्र सरकारच्या खरेदी पोर्टलवरील १.६६ कोटी नोंदी आणि सीबीएसईच्या मूल्यमापन प्रक्रियेतील त्रुटीही अशाच प्रकारे मागे उघड केल्या होत्या. जर सरकार खरोखरच माहितीच्या पारदर्शकतेबद्दल आणि 'डेटा कनेक्टिव्हिटी'बद्दल गंभीर असते, तर एका अठरा वर्षांच्या तरुणाला सरकारी फाइल्सचे कुलूप तोडून माहिती बाहेर काढण्याची वेळच आली नसती.

भाजपला आणि त्याच्या ताटाखालचे मांजर झालेल्या निवडणूक आयोगाला केवळ असाच डेटा हवा आहे जो त्यांच्या राजकीय सोयीचा असेल; जिथे सामान्य नागरिक किंवा संशोधक व्यवस्थेचे स्वतंत्र परीक्षण करू शकतील, तिथे माहिती जाणीवपूर्वक 'मृत' 'मूक' आणि असंबद्ध ठेवली जाते.

सार्थक सिद्धांतने निवडणूक आयोगाच्या त्या बंदिस्त डेटाला खऱ्या अर्थाने 'बोलते' केले आहे. प्रधानमंत्र्यांनी त्याकडे खरे तर त्यांचे म्हणणे प्रत्यक्षात आले यादृष्टीने बघायला हवे. पण ते होणे नाही ! 

जोपर्यंत मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ भाषणातील शब्दांऐवजी प्रत्यक्ष कृतीतून माहितीचे दरवाजे खुले करत नाहीत, तोपर्यंत 'डिजिटल इंडिया'च्या या घोषणा केवळ पोकळ आश्वासनेच ठरतील.

अमिता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या