सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिन साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/11/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सागर फुले यांनी दिली.
भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाने करण्यात आली. प्रा. अंकिता फडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री क्षीरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विजय गायकवाड यांनी केले.
भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही मूल्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनात अंगीकारावीत आणि संविधानाप्रती आदर व बांधिलकी जपावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

0 टिप्पण्या