जिथे आपल्याला ठेच लागते, तिथेच सवय लागते सांभाळून चालायची,

 

जिथे आपल्याला ठेच लागते, तिथेच सवय लागते सांभाळून चालायची,

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/10/2026

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी ठेच लागतेच. कधी माणसांकडून, कधी परिस्थितीकडून, तर कधी स्वतःच्या अपेक्षांकडून पण गंमत अशी की, ज्या ठेचेने आपल्याला क्षणभरासाठी तोडलेलं असतं, तीच ठेच पुढे आपल्याला सावरून चालायला शिकवते.

सुरुवातीला आपण प्रत्येकावर मनापासून विश्वास ठेवतो. प्रत्येकाच्या शब्दांवर प्रेम करतो, प्रत्येकाच्या हास्यामागे आपुलकी शोधतो आणि प्रत्येक नातं आयुष्यभर टिकेल, अशी अपेक्षा ठेवतो. पण काळ जसजसा पुढे जातो, तसतसे काही चेहरे बदलतात, काही नाती दुरावतात आणि काही माणसं आपल्याला आपली किंमत शिकवून जातात.

एक वेळ अशी येते की, आपण पूर्वीसारखे प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाही आणि प्रत्येक माणसासाठी स्वतःला संपवतही नाही. कारण आता आपल्याला समजलेलं असतं की, प्रत्येकाला आपलं मन समजावून सांगण्याची गरज नसते आणि प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध करण्याचीही गरज नसते.

पूर्वी एखाद्याने बोलणं बंद केलं की मन अस्वस्थ व्हायचं. त्याच्या एका मेसेजसाठी तासन्तास वाट पाहिली जायची. एखाद्याच्या बदललेल्या वागण्याने संपूर्ण दिवस उदास जायचा. पण अनुभवांनी शिकवलं की, ज्याला आपली किंमत आहे तो आपल्याला गमावण्याची भीती बाळगतो; आणि ज्याला आपली किंमतच नाही, त्याच्यासमोर स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्यात काहीच अर्थ नसतो.

म्हणूनच आयुष्य आपल्याला कठोर बनवत नाही, तर समजूतदार बनवतं. आपण माणसांवर प्रेम करणं सोडत नाही, फक्त कुणावर किती विश्वास ठेवायचा हे शिकतो. आपण नाती जपणं सोडत नाही, फक्त नातं जपताना स्वतःला हरवायचं नाही हे समजून घेतो.

कारण प्रत्येक ठेच ही शिक्षा नसते; काही ठेचा आपल्यासाठी आयुष्याने दिलेले धडे असतात. त्या आपल्याला सांगतात की, मनाने चांगलं असणं ही आपली ताकद आहे, पण प्रत्येकाने आपल्या चांगुलपणाचा फायदा घ्यावा, ही आपली कमजोरी ठरू नये.

शेवटी एवढंच लक्षात ठेवा…

रस्त्यावर चालताना ठेच लागली तर आपण पाय सांभाळून चालतो; मग आयुष्यात ठेच लागल्यानंतर माणसं ओळखून चालायला काय हरकत आहे?

मनात प्रेम ठेवा, चेहऱ्यावर हसू ठेवा, नाती जपा; पण स्वतःचा स्वाभिमान आणि मनःशांती कधीही गहाण ठेवू नका.

कारण आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते प्रत्येकाच्या मनाप्रमाणे जगण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जपून जगता आलं पाहिजे.

जिथे आपल्याला ठेच लागते, तिथेच आपल्याला सांभाळून चालण्याची सवय लागते आणि जिथे अनुभव मिळतात, तिथेच जगण्याची खरी समज येते.

क्रेडिट : सुजित गांवकर,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या