🟢 वैयक्तिक शेततळे योजनेत सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 159 अर्जांची निवड
🔵 सुधारित तरतुदींमुळे योजना अधिक सुलभ व पारदर्शक; कागदपत्रांची प्रक्रिया होणार कमी
वृत्त एकसत्ता न्यूज
सोलापूर दि.26 (जिमाका):- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात ‘वैयक्तिक शेततळे’ घटकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी आयुक्तालयामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शासनाच्या ‘गव्हर्नमेंट प्रोसेस री-इंजिनिअरिंग’ (GPR) धोरणानुसार अनावश्यक कागदपत्रांची संख्या आणि अंमलबजावणीचे टप्पे कमी करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील एकूण 12 हजार 159 अर्जांची महाडीबीटी प्रणालीवर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
अर्जदाराची अॅग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टल अॅग्रीस्टॅकशी जोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे 7/12, 8-अ उतारा, आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची किंवा बँक पासबुकची प्रत सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
निवडक कागदपत्रांचीच तपासणी
सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत प्रामुख्याने ऑनलाईन प्रणालीपूर्वी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे. वन हक्क कायदा (FRA) अंतर्गत लाभार्थ्यांची फार्मर आयडी नोंदणी नसल्यामुळे त्यांची आवश्यक कागदपत्रे तपासली जातील. तसेच, जमिनीवर सामाईक खातेदार असल्यास संबंधितांचे संमतीपत्र (परिशिष्ट 8) जोडणे आवश्यक राहील.
अशिक्षित, वृद्ध व दिव्यांग शेतकऱ्यांना विशेष मदत
योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासह अशिक्षित, वृद्ध व दिव्यांग शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी सर्व टप्प्यांवर मदत करण्याची जबाबदारी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती पत्र
निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यारंभ आदेश अथवा पूर्वसंमती पत्र देण्यात येणार आहे. या पत्रावर स्वाक्षरीची आवश्यकता राहणार नाही. लाभार्थ्यांनी विहित मुदतीत शेततळ्याचे खोदकाम पूर्ण करून त्यासंबंधीचा दाखला ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे.
ग्राम कृषी विकास समितीचा सहभाग
गावपातळीवरील ग्राम कृषी विकास समितीच्या मासिक बैठकीत वैयक्तिक शेततळे योजनेची माहिती तसेच पूर्ण झालेल्या कामांचा आढावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि स्थानिक पातळीवरील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
तालुकानिहाय निवड झालेल्या अर्जांचा तपशील
महाडीबीटी प्रणालीवर सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या एकूण 12 हजार 159 अर्जांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 585, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 36 आणि इतर प्रवर्गातील 11 हजार 538 अर्जदारांचा समावेश आहे.
तालुकानिहाय अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : अक्कलकोट – 730, बार्शी – 1228, करमाळा – 1721, माढा – 2018, माळशिरस – 694, मंगळवेढा – 1331, मोहोळ – 1308, पंढरपूर – 1033, सांगोला – 1093, उत्तर सोलापूर – 217 आणि दक्षिण सोलापूर – 783.
अनुदानाच्या इतर तरतुदी कायम
वैयक्तिक शेततळे योजनेतील अनुदानाचे दर, कमाल मर्यादा, आकारमान तसेच महिला व दिव्यांगांसाठीच्या आरक्षणासंदर्भातील इतर सर्व तरतुदी पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात निवड झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून वैयक्तिक शेततळे योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
0 टिप्पण्या