विचारधारा


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/10/2026 :

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे घट बसले. नऊ दिवसांचा हा पवित्र उत्सव झाला आणि आज दहावा दिवस म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा! आज घरोघरी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवला जातो.

दसरा हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुख्य आणि अत्यंत शुभ मुहूर्त आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लोक आवर्जून सोने-चांदी व नवीन वाहनांची खरेदी करतात. नामकरणविधी, वास्तुशांती यांसारखे विधीही करतात. कोणतीही मंगल कार्ये करण्यासाठी या दिवशी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही.

मुलांनो, या दिवशी परंपरेनुसार पाटीपूजन करतात; विद्येचा श्रीगणेशा करतात. विद्यार्थी आपली पुस्तके-वह्या यांचे भक्तिभावाने पूजन करतात. व्यापारी लोक त्यांच्या हिशेबाच्या नवीन वह्या व पंचांग यांचे पूजन करतात. आजच्या दिवशी शस्त्रे, हत्यारे व शेतीची अवजारे यांचेही विधिवत पूजन केले जाते.

संध्याकाळी आपट्याची पाने एकमेकांना देऊन प्रेमाने सोने लुटतात. खरोखरच,

'दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा!'

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या