💢 अंधश्रध्देच्या बाजारात क्रौर्याची परिसीमा

 💢 अंधश्रध्देच्या  बाजारात क्रौर्याची परिसीमा 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/10/2026 :

नुकतीच काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एर्नाकुलम जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि गुप्तधनाच्या लालसेपोटी दोन महिलांचा नरबळी दिल्याची अंगावर शहारे आणणारी,आणि मानवी क्रौर्याची,राक्षसी वृत्तीची प्रचीती आणून देणारी नृशंस घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच मिरज येथे अंधश्रद्धा आणि गुप्तधनाच्या हव्यासापोटी घडलेले याच प्रकारचे हत्याकांड ताजे असतानाच केरळमधल्या घटनेने अवघ्या समाजमनाचा थरकाप उडाला आहे.

एका डॉक्टर दाम्पत्याने मोहम्मद शफी* नामक भोंदू मंत्रिकाच्या नादी लागून गुप्तधन, संपत्ती मिळेल या असुरी अंधश्रद्धेतून दोन महिलांची हत्या करून,त्यांचे तुकडे तुकडे करून ते दफन केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. त्याचबरोबर क्रूरतेचा आणि विकृतीचा कळस म्हणजे हत्या केलेल्या मृतदेहांचे मांस सुध्दा या दाम्पत्याने खाल्ल्याचा पोलिसांचा दावा आहे.

केरळसारख्या, देशात साक्षरतेत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या आणि सुशिक्षित, प्रगत म्हणून ओळखल्या जात असलेल्या राज्यात सुध्दा जर असले अघोरी अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील तर आपला देश समाज २१ व्या शतकात सुध्दा जगाच्या तुलनेत अद्याप कुठे भरकटत चालला आहे ? असे खेदाने म्हणावेसे वाटते.

या मनोरुग्ण मांत्रिकावर या घटने अगोदरही नरबळी शी संबंधित आठ गुन्हे दाखल आहेत,तरीसुद्धा तो खुलेआम हे कसायाला लाजवेल असे नीच कृत्य करत होता,याचा अर्थ आपली कायदा आणि न्यायव्यवस्था ही किती कुचकामी* आणि कालबाह्य झाली आहे याचीच प्रचीती येते.

दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दोन महिलांचा बळी देण्यात आला त्या महिला आणि या भोंदूची फेसबुक वरून ओळख व परीचय झाला होता, यातूनच त्याने या दोन महिलांना वेगवेगळी आमिषे दाखवून, आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे हत्याकांड करण्यात आले. यावरून एकच गोष्ट प्रकर्षाने सिद्ध झाली आहे की समाजात निव्वळ साक्षरता प्रमाण* वाढले म्हणजे तो समाज सुशिक्षित झाला,सुज्ञ झाला ही निव्वळ भ्रामक समजूत आहे, उलट विज्ञानाने आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या अत्याधुनिक प्रगत साधनांचा वापर करूनही समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन मात्र अद्याप रुजायला तयार नाही,उलट याच अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर करून अंधश्रद्धांचा बाजार मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे.

टी व्ही, सिनेमा,सोशल मीडियावर सर्रास अंधश्रद्धांचा प्रसार* आणि प्रचार* करणारे सिनेमे, सिरीयल, व्हिडीओ* यांचा सुळसुळाट* आहे ,या माध्यमातून तथाकथित भोंदू, मांत्रिक,बाबा,महाराज,फादर,मुल्ला,मौलवी ज्योतिषी ,अम्मा,पौराणिक भाकडकथा सांगणारे, कपोलकल्पित कथा,कल्पना वापरनारे निर्माते, दिग्दर्शक, समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा प्रसार करत आहेत. पौराणिक भाकडकथा रचणारे तथाकथित चमत्कारि,दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करणारे,विज्ञानाला फाट्यावर मारणाऱ्या कथांचा,घटनांचा मारा भोळ्या भाबड्या,दर्शकावर टी व्ही सिनेमाच्या,सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे या सर्वांवर सेन्सॉरबोर्ड म्हणून कुठला अंकुश आहे की नाही ? हा संशोधनाचा विषय आहे.

यातून समाज मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला बळी पडून त्याचे आर्थिक,मानसीक शोषण,सामाजीक अधःपतन होत आहे.

यातूनच मग  केरळ, मिरज*सारख्या महाभयंकर* घटना घडत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन* आणि एकूणच सामाजिक सुधारणा* साठी आयुष्य वेचलेल्या थोर संत,समाजसुधारक*यांचे परिश्रम,प्रबोधन,कष्ट,समाजकार्य या सर्वांवर अशा घटनांमुळे आणी अंधश्रद्ध समाजामुळे पाणी फिरल्या सारखेच आहे.

©शिवाजी पाटील

दि १५ ऑक्टोबर २०२२ (चार वर्षापूर्वी चा लेख, रीपोस्ट)

===================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या