📖✒️कट्टी बट्टी ते ब्लॉक लिस्ट : प्रवासातील एक वळण.!✍️
🟢 लहानपणी करंगळी उचलावी अन् कट्टी म्हणावं. पुढच्याच क्षणी बट्टी होऊन पुन्हा सोबत हसावं, केवढा तो निरागसता अन् आपुलकीचा काळ,
काळाच्या ओघात करंगळीची जागा मोबाईलच्या एका क्लिकने घेतली अन् कट्टीची जागा नकळत ब्लॉक लिस्टने व्यापली. बालपणी दोन मिनिटांत मिटणारे रुसवे फुगवे, आज एका क्षणात माणसांना आयुष्यातून अदृश्य करून टाकतात.
चला तर मग, आज श्रद्धा धनेश डायरीच्या या पानावर उलगडूया बालपणातील त्या मऊशार कट्टी-बट्टी पासून आजच्या डिजिटल ब्लॉक लिस्ट पर्यंतचा एक भावनिक प्रवास.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/10/2026 :
लहानपण म्हणजे काय? खेळ, सुट्ट्या, मस्ती आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेली आपली मित्रमंडळी. पण या मैत्रीच्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचे काही असेल, तर ते म्हणजे कट्टी आणि बट्टी आजच्या कॉर्पोरेट जगात आपण मतभेद किंवा पॅच-अप असे भारी शब्द वापरतो, पण बालपणीच्या त्या छोट्याशा करंगळीत जी ताकद होती, ती या मोठ्या शब्दांत कुठेच नाही.
काहीतरी बिनसलं की लगेच करंगळी दाखवून "जा, तुझी माझी कट्टी" असं म्हणण्यात एक वेगळीच ऐट होती. कट्टी झाली की मग एकमेकांकडे बघून नाक मुरडणे, मुद्दाम दुसऱ्या मित्राशी जास्त हसून बोलणे आणि आता मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही, असा आव आणणे. हे सगळं किती वेळ टिकायचं? फार फार तर मधल्या सुट्टीपर्यंत किंवा संध्याकाळचा खेळ सुरू होईपर्यंत.
कट्टी जितकी टोकदार असायची, 'बट्टी' तितकीच गोड असायची. अंगठ्यावर अंगठा घासून किंवा करंगळीत करंगळी अडकवून जेव्हा "बट्टी" व्हायची, तेव्हा जगातील सगळी युद्धं थांबल्यासारखा आनंद व्हायचा. त्या एका बट्टीने झालेला सगळा राग एका क्षणात विरघळून जायचा. तिथे कोणताही इगो नसायचा, असायचा तो फक्त पुन्हा एकत्र खेळण्याचा बालिश हव्यास.
आज आपण मोठे झालो आहोत. आता कट्टी झाली की ती बोटांवर राहत नाही, तर थेट सोशल मीडियाच्या ब्लॉक लिस्टमध्ये जाते. आता अबोला धरला की तो वर्षानुवर्षे संपत नाही. मोठेपणीच्या भांडणात बट्टी करण्यासाठी लागणारा तो निखळ मोठेपणा आणि मन मोठे करण्याची सवय कुठेतरी हरवली आहे असं वाटतं.
कट्टी-बट्टी ही केवळ मुलांची भांडणं नव्हती, तर ती मैत्री जपण्याची एक सुंदर रीत होती. समोरच्याला आपली किंमत कळावी यासाठी घेतलेला तो एक गोड आसावा होता.
कधीकधी वाटतं, पुन्हा एकदा लहान व्हावं. कुणाशी तरी छोट्याशा कारणावरून कट्टी करावी आणि थोड्या वेळाने स्वतःहून जाऊन बट्टी करण्यासाठी आपला हात पुढे करावा. कारण आयुष्याच्या या धावपळीत मैत्रीचे ते बोटांमधले नाते आजही आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत आहे.
©️श्रद्धा धनेश डायरी

0 टिप्पण्या