⛳ राघवगडचा पाडाव ! ⛳ १५ ऑक्टोबर १७८५ !

 

⛳  राघवगडचा पाडाव !

⛳  १५ ऑक्टोबर १७८५ ! 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/10/2026 :

मध्य प्रदेशातील गुणा स्टेशनच्या दक्षिणेला २० मैलांवर राघवगड हे संस्थान होते. महंमद घोरीकडून पृथ्वीराज चौहानचा (चव्हाण) पराभव झाला तेव्हा या चव्हाण घराण्याची एक शाखा माळव्यात आली. याला 'खेचीवाडा' असे नाव पडले. राघवगड येथे गढी बांधून हे घराणे राज्य करू लागले. याच घराण्यातील बळभद्रसिंग हा जयाप्पा शिंद्यांबरोबर नागोरच्या लढाईत सहभागी होता. पुढे हे घराणे मराठ्यांविरुद्ध वागू लागले. तेथील राजा बलवंतसिंग याने महाराजा महादजी विरुद्ध इंग्रजांना मदत केली. त्यामुळे त्याच्यावर महादजींचे लक्ष होतेच. राघवगडची मोहीम त्यांनी हाती घेतली. प्रथम बाळाराव इंगळे नंतर गोपाळराव भाऊ, लखबादादा यांना पाठवले. एके काळचा शत्रू पण आता चाकरीत असलेला हमदानी यालाही पाठवले. त्याची इमानदारी कळणार होती. शेवटी डी. बॉयनलाही पाठवले. तसेच खंडोजी इंगळे, देवजी गौळी असे अनेक सरदार आणि ४०,००० फौज रवाना केली. युद्ध सुरू झाले. पण केवळ दोन महिन्यांत बलवंतसिंग शरण आला, रामजी पाटील याने आज्ञेनुसार तह केला. बलवंतसिंग व त्याचा मुलगा जयसिंग यांना कैद केले.

राघवगड व प्रदेश काबीज केला. पण आपला राजा कैद झाल्याने रजपूत संघटित झाले. त्यांना शेरसिंगचे नेतृत्व लाभले. त्यांनी दक्षिणी लोकांवर भयंकर अत्याचार केले. प्रत्यक्ष महादजींच्या राणी दक्षिणेतून येत असता छापा घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला. पण अहिल्याबाई साहेबांच्या मदतीमुळे वेगळ्या वाटेने त्या सुखरूप आल्या. दुर्जनसिंग हा या अगोदर बलवंतसिंगचा वकील म्हणून महादजीकडे होता. तोही या बंडखोरांना मिळाला. महादजीराव चिडले. त्यांनी अंबूजी इंगळे यांना आदेश दिला की, बलवंतसिंगास ठार मारावे किंवा कैद करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यात ठेवावे. त्याप्रमाणे त्यांनी त्याला बेड्या घालून ग्वाल्हेरला तर त्याची बायको व मुले यांना भेलसावर कैदेत ठेवले. या मोहिमेत एक वर्ष गेले, खर्चही फार झाला. प्राप्ती मात्र काही नाही.

रणजितसिंग जाठ याच्या विनंतीवरून दोन वर्षांनंतर बलवंतसिंग यास मुक्त करून त्याच्याकडून एक लाख रुपये दंड घेऊन त्यास विंचूरकरांच्या स्वाधीन केले. त्याचा मुलगा जयसिंगने नंतर त्रास दिला. परंतु महादजी जिवंत असे पर्यंत बलवंतसिंग याने कधीही त्रास दिला नाही. हे महादजींचे यशच होय. १७८५ हे वर्ष महादजींना त्रासाचे गेले. १५ ऑक्टोबर १७८५ रोजी हिंगणे यांनी लिहिले आहे की, महादजी पुढे चारी दिशांनी अनेक संकटे उभी होती. याच दरम्यान महादजींनी खंडेराव हरी भालेराव यांना ससैन्य बुंदेलखंडात रवाना केले. बादशाही राज्यकारभाराची घडी बसविण्यात महादजींचे सैन्य अनेक मोहिमा मध्ये गुंतले होते. संकटांना न घाबरता मोठ्या धाडसाने त्यांनी आपले कार्य सतत सुरू ठेवले.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या