स्टेटलाइन -
दडपशाहीला झुरळे ऐकतील का ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/10/2026 :
दिल्लीत झानेशकुमार हटाव या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाची झलक कॉक्रोच जनता पार्टीने मुंबई व बंगळुरूमधे दाखवली होती. चार महिन्यापूर्वी याच झुरळांच्या पार्टीने दिल्लीत जंतरमंतरवर छत्तीस दिवस ठिय्या मांडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा घेऊन दाखवला होता. त्यांची एकजूट, जिद्द, चिकाटी व कल्पकता साऱ्या देशाने बघितली . पोलिसांच्या दडपशाहीला देशातील तरूणाई घाबरत नाही हे कॉक्रोच जनता पार्टीने दाखवून दिले आहे. मतदार नोंदणी सर्वेक्षणात ( एसआयआर ) मधे फार मोठा घपला झाला असल्याचा गवगवा मोठा झाला, देशातील तेरा कोटीपेक्षा जास्त नावे मतदार यादीतून बाद झाल्यानंतर देशात होणाऱ्या निवडणुकांविषयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले. मुख्य निवडणूक आयुक्त हे मनमानी कारभार करीत आहेत व निवडणुक आयोगाची यंत्रणा भाजपाच्या विजयासाठी राबत आहे, असे जाहीरपणे आरोप होऊ लागले. दोन आयुक्तांना विश्वासात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त कसे मनमानी वागतात याचा इंडियन एक्स्प्रेसने पोलखोल केल्यावर विरोधी पक्षाच्या संशयाला पुष्टी मिळाली. भाजपाला विजय मिळतो तो मोदींमुळे नव्हे तर निवडणूक आयोगाच्या मदतीमुळे, हा आरोप तर भाजपाला जिव्हारी लागला. एकीकडे राहुल गांधी मोदी, शहा, ज्ञानेशकुमारांना या देशाचे खलनायक ठरवत आहेत तर भाजपा राहुल गांधींना नालायक म्हणून हिणवत आहेत. खलनायक विरूध्द नालायक अशा संघर्षात कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेशकुमार हटवो मोहीम सुरू केली ही भाजपाला आणखी डोकेदुखी ठरू लागली.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके , सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी त्यांच्या दंडाला खेचून ताब्यात घेतले. अटक केलेले तिघेही उच्च शिक्षित आहेत. ते जणू कोणी अट्टल गुन्हेगार, गँगस्टर किंवा अंडरवल्डशी संबंधित आहेत, अशा आविर्भावात पोलिसांनी त्यांना विमानातून खेचून बाहेर काढले. हे तिघे देशातील लक्षावधी विद्यार्थी- तरूणांचे नेतृत्व करीत आहेत पण आम्ही त्यांना कसे गुन्हेगारासारखे वागवू शकतो, हाच संदेश दिल्ली पोलिसांनी दिला. त्यांना कुठे नेले, रात्रभर कुठे ठेवले याविषयी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. त्याच दिवशी अभिजीतच्या आजीचे त्यांच्या गावी निधन झाले, पण त्याला तिच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही. वीस जुलै रोजी दिल्लीत पोलिसांनी विद्यार्थी मोर्चावर खिळे ठोकलेल्या काठ्यांनी जसा निर्घृण लाठीमार केला होता, तीच मानिसकता आजही कायम आहे हे त्यांच्या कारवाईतून दिसले. दुसऱ्या दिवशी या तिघांनाही दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी हजर केले व एक वर्षभर शांतता भंग न करण्याच्या अटीवर पन्नास हजाराच्या जामिनावर सोडले. त्यांनी दिल्लीत येऊन काहीही केलेले नसताना पोलिसांनी त्यांची वरात काढली.
कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी दिल्लीची नाकेबंदी केली होती. दहा तास नवी दिल्ली व हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनकडे देशाच्या विविध भागातून येणाऱ्या अडिचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या. दिल्लीतील सत्तावन्न मेट्रो स्टेशन्स बंद ठेवली. जंतरमंतरच्या चार किमी परिसरात इंटरनेटसेवा खंडीत करण्यात आली. दिल्लीतील जंतरमंतरवर किती तरूणाई येईल, दोन लाख , पाच लाख की दहा लाख? याचा अंदाज पोलिसांना येईना म्हणून जंतरमंतर भोवती दहा फूट उंचीचे ब’रिकेटसचे सहा थऱ लावले होते. कोणत्याही परिस्थितीत झुरळे जंतरमंतरवर पोचता कामा नयेत यासाठी हा सारा आटापीटा होता. रात्री उशीरा नि पहाटे मुलामुलींच्या घरी जाऊन , वसतीगृहाचे दरवाजे खटखटावून विद्यार्थ्यांना बाहेर पडू नका अशी तंबी दिली गेली. उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाबकडून दिल्लीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली. ज्यांनी जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला, त्या मुलामुलींना बकोटीला धरून किंवा फरफटत पोलीस व्ह’नमधे नेण्यात आले. सोळा ते पंचवीस वयोगटातील मुले मुली ही काय गुन्हेगार आहेत काय ? या देशाचे ते नागरीक आहेत. विद्यार्थी आहेत. देशाचे भविष्य घडविणारी नवीन पिढी आहे. पण वरिष्ठांकडून जसे आदेश येतात ते पोलिसांना पाळावे लागतात. दिल्ली महानगराची लोकसंख्या दोन कोटीवर आहे, या महानगरात रोज ऐंशी लाख वाहने ( मोटारी, बसेस, टेम्पो, ट’क्सीज, रिक्षा ) प्रवाशांना घेऊन फिरत असतात. शेजारी राज्यातून रोज हजारो वाहने ये – जा करीत असतात. पण मेट्रो बंद, रेल्वे बंद आणि नाकाबंदीचे आदेश देऊन आपण कोणाचे जनजीवन विस्कळीत करीत आहोत याचेही भान वरिष्ठांना नसावे याचे आश्चर्य वाटते. झुरळांचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी चाळीस हजार पोलीस तैनात होते. सीमा सुरक्षा दलाच्या फौजा नि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होत्या. हजारो मुलांना पकडून नेण्यासाठी नव्या कोऱ्या बसेसची रांग तयार ठेवली होती. हे सर्व कोणासाठी ? कशासाठी ? एका संविधानात्मक पदावर बसलेल्या सर्वोच्च नोकरशहाला वाचविण्यासाठी की विरोधातील आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत व रस्त्यावर सरकारविरोधात जिद्दीने लढत आहे. राहुल यांना राजकारण समजत नाही, परिपक्वता नाही, विरोधी पक्षनेत्याचे महत्व व मर्यादा त्यांना कळत नाहीत, त्यांचा अभ्यास नाही आणि आता तर ते नालायक आहेत इथपर्यंत भाजपा त्यांच्यावर हल्ले चढवत आहे. ज्ञानेशकुमार हटाव आंदोलनात त्यांना दिल्ली पोलिसांनी कसे फरफट नेले किंवा पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर त्यांना कसे उचलून नेले हे सर्व देशाने बघितले आहे. विरोधी पक्षनेता हा श’डो प्राइम मिनिस्टर ओळखला जातो. पण राहुल गांधी या पदावर आल्यापासून सरकारला मोठी डोकेदुखी झाली आहे.
ज्ञानेशकुमार हटाव, आंदोलनात ममता ब’नर्जी ( पश्चिम बंगाल ), अरविंद केजरीवाल ( दिल्ली ), पिनराई विजयन ( केरळ ), माणिक सरकार ( त्रिपुरा ) या चार माजी मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉक्रोच जनता पा्र्टीचे अभिजीत दीपके, सौरभ दास , अशुतोष रांका, रत्ना सिंग यांना उचलले. तसेच डेरेक ओ ब्रायन, जॉन बिटास, संजय सिंह, डोला सेन, समीरूल इस्लाम, प्रतिमा मंडल, साकेत गोखले या खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याखेरीज मुंबईत तुषार गांधी, गुरूग्रामधून ध्रुव राठी, दिल्लीत नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, गोपाल राय, वृन्दा करात, केके शैलजा, एमए बेबी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीत आठ हजार, मुंबईत सहाशे तर देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या वीस हजार जणांना तरी आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आंदोलनाला परवानगी देत नाहीत, दिली तर खंडिभर अटी घालून मर्यादीत काळासाठी देतात. सरकारला आंदोलने, मोर्चे आवडत नाहीत. मग लोकशाहीत विरोधी पक्षाने आंदोलन करायचे कसे व कुठे ? सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतरमंतर , बोट क्लब, येथे वर्षानुवर्षे आंदोलने होत आहेत. काँग्रेस, इंडिया आघाडी नि कॉक्रोच जनता पार्टी पोलिसांची परवानगी नसताना ज्ञानेशकुमार हटाव आंदोलन आणखी किती दिवस चालू ठेवणार ?
- डॉ. सुकृत खांडेकर
================
0 टिप्पण्या