रात्री पुरेशी झोप होत नसेल तर सावधान, थेट हृदयावर होऊ शकतो परिणाम; काय काळजी घ्याल?

 🩺हेल्थ मंत्रा |आरोग्य मंत्र |🩺

रात्री पुरेशी झोप होत नसेल तर सावधान, थेट हृदयावर होऊ शकतो परिणाम; काय काळजी घ्याल? 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/10/2026 : आजकालची बदलती जीवनशैली, उशिरापर्यंत मोबाईलचा वापर, ऑफिसच्या कामाचा ताण आणि अभ्यासाचा दबाव यामुळे अनेक लोकांची झोप अपुरी राहत आहे. रोज केवळ 5 ते 6 तास झोपून अनेक लोक त्याला सामान्य मानतात आणि वीकेंडला ही झोप भरून काढू असा विचार करतात. मात्र, झोप ही केवळ शरीराला विश्रांती देण्याचे माध्यम नाही. झोपेत असताना आपले शरीर अनेक महत्त्वाची कामे करत असते आणि हृदयालाही विश्रांती मिळते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (AHA) मते, अपुरी आणि अस्वस्थ झोप थेट हृदयाचे आरोग्य, रक्तदाब आणि मेटाबॉलिझमवर गंभीर परिणाम करते.

रोज किती तास झोप आवश्यक आहे?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक प्रौढ व्यक्तीला दररोज रात्री किमान 7 तासांची गाढ झोप मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या दिवशी कमी झोपणे वेगळे, पण रोजच 7 तासांपेक्षा कमी झोपण्याची सवय झाल्यास शरीरात अनेक गंभीर आजार घर करू लागतात. केवळ तासांची गणना करण्यापेक्षा झोपेची गुणवत्ता (Sleep Quality) आणि दिवसभरात शरीराला कसे वाटते, यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

अपुऱ्या झोपेचा रक्तदाबावर कसा होतो परिणाम?

आपण जेव्हा गाढ झोपेत असतो, तेव्हा नैसर्गिकरीत्या आपला रक्तदाब (Blood Pressure) कमी होतो, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांना विश्रांती मिळते. परंतु जर झोप अपुरी असेल किंवा रात्री वारंवार मोडत असेल, तर रक्तदाब कमी होण्याची ही प्रक्रिया विस्कळीत होते. दीर्घकाळ अपुरी झोप राहिल्याने हाय ब्लड प्रेशरचा (High BP) त्रास सुरू होतो. हाच उच्च रक्तदाब पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका अनेक पटींनी वाढवतो.

Sleep Quality Matters : केवळ तास नाही, झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची

7 ते 8 तास अंथरुणावर पडून राहणे म्हणजे उत्तम झोप असा होत नाही. जर तुम्हाला खालील लक्षणे जाणवत असतील, तर तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब आहे:

रात्री वारंवार जाग येणे.

झोप लागण्यासाठी खूप वेळ लागणे.

सकाळी उठल्यानंतरही थकवा आणि आळस जाणवणे.

उत्तम आणि गाढ झोपेसाठी सोप्या सवयी

वेळापत्रक ठरवा : रोज झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित ठेवा.

स्क्रीन टाईम कमी करा : रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर पूर्णपणे थांबवा.

शारीरिक व्यायाम : दिवसभरात थोडा वेळ व्यायाम करा आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात वेळ घालवा.

शांत वातावरण : तुमची बेडरूम शांत, अंधारी आणि हवेशीर ठेवा.

♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या